- सचिन जवळकोटे
आपल्या सोलापूरचा टापू भलेही दुष्काळी असला तरी इथं कमळं फुलली चिक्कार; मात्र गटबाजीच्या राड्यात पाकळ्यांची अवस्था जाहली लय बेक्कार. एकीकडं जिल्ह्यात जास्तीत-जास्त आपले आमदार निवडून आणण्यासाठी मुंबईचे ‘देवेंद्रपंत’ कामाला लागले असताना दुसरीकडं अक्कलकोटमधील त्यांचीच मंडळी देऊ लागली ‘भाजपमुक्त तालुका’ची घोषणा. विशेष म्हणजे ‘दुधनी’च्या ‘सिद्धूअण्णां’ना पक्षात घेण्यास कडाडून विरोध करणाºया ‘सुभाषबापू’ गटावरच सोपविली गेलीय ‘माढ्या’च्या ‘बबनदादां’ची जबाबदारी. त्यामुळं इकडं ‘पंतांचे आण्णा’ पेचात सापडलेले असतानाच ‘बापूंचे दादा’ही पडलेत बुचकळ्यात...कारण जो न्याय एका आमदाराला, तोच असू शकतो दुस-याही आमदाराला नां ! लगाव बत्ती..
‘सचिनदादा’ वेटिंगवर... ‘सिद्धूअण्णा’ आत...!
साºयांनाच चक्रावून टाकणारी ही घटना असावी दोन आठवड्यांपूर्वीची. मुंबईच्या मंत्रालयात ‘देवेंद्रपंतां’च्या केबीनबाहेर अक्कलकोटचे ‘सचिनदादा’ कामासाठी ‘वेटींग’मध्ये थांबलेले. एवढ्यात सोलापूरच्या ‘विजूमालकां’सोबत ‘दुधनी’चे ‘सिद्धूअण्णा’ गेले थेट आत. सोबतीला ‘तानवडेंचे आनंद’ही...बराच काळ रंगली आतमध्ये चर्चा. यावेळी म्हणे ‘पंतां’नी स्पष्ट सांगितलेलं, ‘आनंदाऽऽ तुम्ही किंवा सचिनदादा किंवा स्थानिक कुणालाही तिकीट दिलं तरी तुम्ही बाकीचे सारे त्याला ठरवून पाडणार. एक चांगली जागा फुकटची जाणार. त्याऐवजी ‘सिद्धूअण्णां’ना आपल्यात घेऊन पार्टीचा एक आमदार वाढवू. तुम्हाला झेडपीचा अध्यक्ष करण्यासाठी ‘अण्णा’च घेतील पुढाकार. मग तर झालं समाधान ?’
...या नव्या ‘आॅफर’मुळं आतमध्ये ‘तानवडें’ना किती ‘आनंद’ झाला माहीत नाही; परंतु बाहेर ताटकळत बसलेल्या ‘सचिनदादां’च्या राजकीय भवितव्याचं पुरतं ‘कल्याण’ झाल्याची ‘शिट्टी’ त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांच्या डोक्यात वाजली...म्हणूनच की काय कालच्या मेळाव्यात झाली ‘अक्कलकोट तालुका भाजपमुक्त’ करण्याची भाषा... लोकांना वाटू शकते ‘सचिनदादां’ची ही नवी भूमिका ‘अवसानघातकी’...मात्र राजकीय तज्ज्ञांच्या मते ‘सुभाषबापूं’साठी ठरू शकते ‘आत्मघातकी’...कारण ‘भुकटी’ प्रकरणापासून ते काल-परवाच्या मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ‘देवेंद्रपंतां’नी ठेवलाय ‘बापूं’च्यांच पाठीवर हात. एखादं-दुसरं खातं कमी केलं तरी मूळ ‘लाल बत्ती’ला नाही लागला धक्का, या समाधानात असणाºया ‘बापू’ गटाला ‘सचिनदादां’ची बंडखोरीची भाषा ठरू शकते त्रासदायक. विशेष म्हणजे ‘घरातला उंदीर मारण्यासाठी बाहेरचा नाग’ आणून ठेवणा-या ‘विजूमालकां’च्या या अचाट कृत्याबद्दलही मूळचे प्रामाणिक कार्यकर्ते झालेत अचंबित. लगाव बत्ती...
एकीकडं अक्कलकोटमध्ये ‘कमळा’च्या ‘आयारामां’ना कडाडून विरोध करणारा हाच ‘सुभाषबापू’ गट दुसरीकडं माढ्यात ‘घड्याळ्या’च्या ‘गयारामां’शी कुजबुजण्यात रमलाय. ‘बबनदादां’ना ‘एन्ट्री’ दिली तर पार्टीतले इतर कार्यकर्ते कसे हॅण्डल करायचे, याची सारी जबाबदारी ‘देवेंद्रपंतां’नी दिलीय ‘सुभाषबापूं’वरच...कारण ‘कोकाटें’सह अनेकजण नेहमी ‘बापूं’च्याच संपर्कात. मिटींगची पहिली राऊंड झालीय. आता दुसरी बैठक लवकरच.
ही तर खुर्च्यांची ठेकेदारी...
असो. ‘कोकाटें’च्या नावावरून पंढरपूरचे ‘भारतनाना’ आठवले. साठ दिवसांचं जलसंधारण खातं मिळाल्यापासून ‘धनुष्यबाणा’लाही दिसू लागलेत अनेक निशाणे. त्यातलेच एक म्हणजे ‘नाना’. लवकरात लवकर ‘कोकाटें’नी ‘भारतनानां’ना ‘शिवबंधन’ बांधण्यासाठी तयार करावं, अशी सुपारी दिलीय चक्क ‘तानाजीरावां’नी. बघा किती गंमतऽऽ ‘कोकाटे’ हे ‘कमळ’वाले, ‘नाना’ हे ‘हात’वाले, ‘सावंत’ हे ‘धनुष्यबाण’वाले... तरीही फुटतात अशी धम्मालऽऽ राजकीय टेंडरं. जाऊ द्या सोडा...शेवटी ‘तानाजीराव’ काय अन् ‘सुभाषबापू’ काय... दोघेही मूळचे कॉन्ट्रॅक्टर. राजकारणात येऊन या मंडळींनी सुरू केली ‘खुर्च्यांची ठेकेदारी’ परंपरा, यात काय आता नवल ?
दिल्लीत शिंदे... गल्लीत वांदे !
सोलापूरच्या लाडक्या सुपुत्रानं आजपावेतो अनेक मोठ-मोठी पदं भूषविली. गेल्या काही दिवसांपासून पार्टीच्या ‘राष्टÑीय अध्यक्ष’ पदासाठीही त्यांचं नाव जोरात चर्चेत आलं. खरं तर, सोलापूरसाठी अन् त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट. खूप कौतुकाची घटना...मात्र ‘दिल्लीत शिंदे’ चर्चेत असताना त्याचवेळी त्यांच्या कार्यकर्त्यांचे ‘गल्लीत वांदे’ झालेले. पालिकेला कुलूप लावण्यावरून ‘मेंबर’ मंडळींमध्ये गटबाजीची किल्ली खळखळलेली. सोलापूरच्या ‘गोल्डन वुमन’ अर्थात् ‘श्रीदेवी तार्इंनी’नी पालिकेला परस्पर कुलूप कसं काय लावलं, याचा ‘चेतनभाऊं’ना राग आलेला. हा मान (कायमचंच कुलूप लावण्याचा !) त्यांना मिळाला नाही म्हणून ‘टक्केबहाद्दर’ फेमस ‘भाऊं’नी आपल्याविरुद्ध मोहीम उघडलीय, असा गंभीर आरोप या ‘तार्इं’नी केलाय. लोकसभेच्या पराभवानंतरही ही मंडळी सुधारण्याचं नाव काही घेईनात... खरंतर, यांनी आता आपल्या तोंडालाच कुलूप लावायला हवं. कदाचित, या वाचाळवीरांच्या कर्तृत्वाला (!) कंटाळूनच ‘प्रणितीतार्इं’नी या मंडळींशिवाय त्यांच्याच वॉर्डात फिरण्याचा निर्णय घेतला असावा; परंतु काही कार्यकर्ते खाजगीत कुजबुजताहेत की, ‘तार्इंच्या या थेट संपर्क अभियानामुळेच काही मेंबर मंडळींची माथी भडकलीत. त्यापायीच चिडून जाऊन पार्टीची प्रतिमा वेशीवर टांगण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू झालाय’. लगाव बत्ती...
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)