- सचिन जवळकोटे
कोरोना काळात पोलिसांची ‘खाकी’ जेवढी रस्त्यावर दिसलेली, तेवढीच नेत्यांची ‘खादी’ गायब झालेली. मात्र इतके दिवस ‘चिडीचूप’ होऊन बसलेल्या राजकारणाचा पुन्हा एकदा ‘गलबला’ सुरू झालाय. सोलापूर जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाची नांदी ठरू पाहणाºया गाठीभेटींना ऊत आलाय. होय...पंढरीत पंतांचा वाडा, तर टेंभुर्णीजवळील मामांचा बंगला पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांचा साक्षीदार ठरू लागलाय.. म्हणूनच लगाव बत्ती !
‘रणजितदादां’ची दर्शनवारी !
एकीकडं पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन मिळेना म्हणून महाराष्टÑातल्या लाखो वारकºयांचा जीव आसुसलाय. दुसरीकडं अकलूजचे ‘रणजितदादा’ मात्र अनेकांचं ‘दर्शन’ घेत सुटलेत. विशेष म्हणजे त्यांना वडीलधाºयांच्या आशीर्वादाचा प्रसादही मिळत चाललाय. असं काय घडलं की, २००९ साली ज्या वाड्यातून ‘मोहिते-पाटील व्हर्सेस परिचारक’ युद्धाला तोंड फुटलं होतं...तिथंच आज हेच ‘रणजितदादा’ आशीर्वाद घेण्यासाठी ‘सुधाकरपंतां’ना भेटायला आले. खरंतर आमदारकी मिळाल्यानंतर रणजितदादा दोनवेळा ‘क्वारंटाईन’ झाले होते. तसं तर गेली काही वर्षे ‘पॉलिटिकल क्वारंटाईन’ होतेच म्हणा ते...
सांगोल्यात ‘गणपतआबां’ना भेटून त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर ‘दादां’नी पंढरपूरच्या धाकट्या पंतांना कॉल केला. ‘दर्शनासाठी पंढरपूरला येतोय. कुठाय तुम्ही ?’ हा प्रश्न कानावर पडल्यानंतर पंतांना वाटलं, दादा बहुधा विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येताहेत; मात्र ते मोठ्या पंतांच्या भेटीला येताहेत म्हटल्यावर क्षणभर तेही चमकले.. ‘आम्ही श्रीपूरच्या कारखान्यावर आहोत, या इथंच’ असं इकडून सांगितलं जाताच ‘दादा’ घाईगडबडीनं उत्तरले, ‘नको...नको...घरीच भेटू. पंढरपूरच्या वाड्यावर येतो.’
मग काय.. ‘दादां’ची गाडी वाड्यासमोर थांबली. आतमध्ये आशीर्वाद घेतला. दर्शनही घेतलं. हे पाहून कार्यकर्ते धन्य-धन्य जाहले. याच वाड्यातला अकरा वर्षांपूर्वीचा प्रसंगही अनेकांच्या डोळ्यासमोर तरळून गेला. ‘कालाय तस्मै नम:’ म्हणत पंतांचा चहा ‘दादां’ना गोड लागला. चहापानाच्या या सोहळ्यात ‘भारतनानांची दाढी’ कुठं चर्चेत आली नसली तरीही भविष्यातल्या राजकारणाची चाहूल वाड्याच्या ऐतिहासिक भिंतींनाही कळून चुकली.
नव्या इनिंगची सुरुवात वडीलधाºयांच्या आशीर्वादानं करणाºया ‘रणजितदादां’च्या राजकीय प्रगल्भतेची चुणूक या भेटीतून दिसून आली; कारण एकेकाळी जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनाही एकेरी बोलणाºया याच व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेकांनी खाजगीत नाराजीही व्यक्त केलेली. असो. राजकारणात मोठं होण्यासाठी वाररदार होण्यासोबतच अशा ‘पॉलिटिकल मॅच्युरिटी’चीही नितांत गरज असते; एवढं जरी सांगोल्याच्या ‘दीपकआबां’पासून ‘लोकमंगल’च्या ‘मनीषदादां’पर्यंत अनेकांनी ओळखून घेतलं, तर दुधात साखरच म्हणायची. तोपर्यंत लगाव बत्ती...
आजी-माजी मंत्र्यांची कोपºयात कुजबूज !
पुण्यातून निघतानाच ‘देशमुख होम मिनिस्टरां’नी थेट बार्शीच्या ‘दिलीपरावां’ना कॉल केला. ‘मी उद्या तुमच्या तालुक्यात येणारंय, घरी चहाला येतो. भेटू नक्की’ मग काय.. बºयाच महिन्यांनी आंधळगाव रस्त्यावरील बंगल्याला लाल दिव्याच्या गाडीचं दर्शन झालं. फाटकाला सत्ताधाºयांचे पाय लागले. दोन जुने मित्र मोठ्या आवेगाने एकमेकांना भेटले. चहा-पान झाल्यानंतर देशमुखांनी हळूचपणे दिलीपरावांना बाजूला घेतलं. कोपºयात जाऊन दोघं दोन-तीन मिनिटं कुजबुजले.उपस्थित कार्यकर्त्यांनाही शेवटपर्यंत तो गुप्त संवाद समजलाच नाही; मात्र आम्हा पामरांच्या शोधक कानाला ती ‘बत्ती’ लागलीच. ‘आपली सत्ता असतानाही आता आमदारकी नाही. खूप हळहळ वाटतेय आम्हालाऽऽ’ असं भावूकपणे देशमुख बोलून गेले. ‘दिलीपराव’ मात्र काहीच बोलले नाही यावर...कारण बोलण्यासारखं होतंच काय; पार्टी बदलून स्वत:हून पायावर दगड मारून घेतला होता की रावऽऽ.. लगाव बत्ती...
‘अजितदादां’नीच दिला सल्ला....जाता-जाता ‘संजयमामां’ना भेटा !
‘आर.आर. आबां’नंतर लोकप्रिय होम मिनिस्टर कधी बघायलाच मिळाला नव्हता. नाही म्हणायला दुधनीच्या ‘सिद्धूअण्णां’नी आपल्या कैक अचाट प्रयोगातून ‘होम मिनिस्ट्री’चा टीआरपी तेव्हा वाढविला होता, हा भाग वेगळा. शुक्रवारी नव्या सरकारमधील होम मिनिस्टर सोलापूरला येणार होते. खरं तर ‘देशमुख मिनिस्टर’ हा शब्द तसा जिल्ह्याला गेली पाच वर्षे ‘डबल’ सवयीचा झाला होता. असो. होम मिनिस्टरच्या दौºयासाठी जिल्ह्याची यंत्रणा चार-पाच दिवसांपासून कामाला लागली होती. चुकीचे का होईना; परंतु रोजचे आकडे जाहीर करायलाही अधिकाºयांना वेळ नव्हता. ‘वन डे लेट’ पुण्याहून ‘होम मिनिस्टर’ आले; मात्र ‘भीमेची बाऊंड्री’ ओलांडताच त्यांचा ताफा थेट ‘संजयमामां’च्या ‘फार्म हाऊस’वर गेला. सकाळचा ब्रेकफास्ट त्यांनी तिथंच केला. ‘मामां’नी त्यांना स्वत:च्या हातानं लाडे-लाडे साजूक तुपातला चारोळे-बेदाणा-खिसमिस-बदाम-काजूवाला शिरा खाऊ घातला. खरंतर ‘मामां’नी आजपावेतो कैकजणांना खाऊ-पिऊ घातलेलं; मात्र त्यांचं मीठ अळणी का ठरलं, हे ‘घाटण्याच्या पाटलांपासून ते बारलोणीच्या पाटलां’पर्यंतच्या मंडळींनाच ठावूक. अरे बापरेऽऽ विषय भलतीकडंच चाललाय. तर काय म्हणत होतो आपण...‘मामां’च्या हिरव्यागार ‘फ्रेश फार्म’मधून खूष होऊन ‘देशमुख मिनिस्टर’ बार्शीकडं निघाले. अख्ख्या दौºयात ‘मामा’ही त्यांच्यासोबत राहिले. हे पाहून ‘घड्याळ’वाले कट्टर कार्यकर्तेही क्षणभर बुचकळ्यात पडले. अपक्ष ‘मामां’ची थेट ‘होम मिनिस्टरां’शी कशी काय लिंक जुळली, याचं कोडं काही सुटता सुटेना. आतली गंमत मात्र फक्त ‘संजयमामां’नाच ठावूक. शुक्रवारी पुण्यात थोरले काका बारामतीकर, धाकटे दादा बारामतीकर अन् देशमुख मिनिस्टर एकत्र होते. त्यावेळी ‘आपण सोलापूर दौºयावर चाललोत’ असं ‘देशमुखां’नी सांगताच ‘अजितदादा’ त्यांच्या कानात कुजबुजले होते, ‘मग जाता-जाता रस्त्यात आमच्या संजयमामांचा फार्म हाऊस आहे की. तिथं थांबून पुढं निघाऽऽ.’.. परंतु आता ‘दादां’च्या तोंडी ‘आमचे मामा’ हा शब्द आलेला पाहून इंदापूरचे ‘भरणे मामा’ही नक्कीच दचकले असतील, त्याचं काय..? लगाव बत्ती.
( लेखक सोलापुर लोकमत निवासी संपादक आहेत.)