लकवा भरला आहे का? ते हातात हात घालून काम! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 07:57 PM2018-11-30T19:57:07+5:302018-11-30T20:16:24+5:30

हाताला लकवा भरला आहे  का? असा सवाल ते हातात हात घालून काम करावेच लागेल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेत झालेला बदल आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा आहे.

Is the paralysis ? They put hand in hand for work ! | लकवा भरला आहे का? ते हातात हात घालून काम! 

लकवा भरला आहे का? ते हातात हात घालून काम! 

Next
ठळक मुद्देगेल्या १९ वर्षांपासून काँग्रेस -राष्ट्रवादी  ‘तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना’ अवस्थेत पराभवाच्या झटक्याने आता दोघांनाही वास्तवाची जाणीव

- अविनाश थोरात -
हाताला लकवा भरला आहे  का? असा सवाल ते हातात हात घालून काम करावेच लागेल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेत झालेला बदल आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पहिला स्मृतिदिन होता. या निमित्ताने ‘आठवणीतले विलासराव’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमामध्ये पवारांनी आपली खदखद बाहेर काढली. ‘‘ अलिकडच्या काळात तीन-तीन महिने फाईलींवर सह्याच होत नाहीत. सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा सही करायला हात का थरथरतो हे  मला माहिती नाही, त्यांच्या हाताला लकवा भरला की काय? हे बघायला पाहिजे? असे शरद पवार म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले नाही तरी निशाणा कोणावर साधला आहे ,  हे सगळ्यांना समजले. 
मुळात त्यावेळी ‘मोदी’ नावाचे वादळ घोंगावायला तशी सुरूवात झाली नव्हती. त्यामुळे आपल्याशिवाय पर्याय नाही, अशी कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांची धारणा झाली होती. त्यामुळे हेवेदावे जाहीरपणे बोलण्यासही त्यांना काही वाटत नव्हते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आपल्या पायाखालची जमीन भुसभुशीत करतोय हे त्यांच्या गावीही नव्हते. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले होते की,  प्रशासकाचा सर्वात महत्वाचा गुण अथवा त्याच्याकडून एक अपेक्षा असते. समोर आलेला माणूस आणि त्याचा अर्ज याचा विचार करताना अर्जात लिहिलेला फापटपसारा वाचायचे करण नसते. त्यातला मूळ मुद्दा काय आहे ते लक्षात घेऊन आणि समोरच्या माणसाच्या चेहºयावरून त्याचे दु:ख समजून घेण्याची कुवत असली पाहिजे. ती वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये होती तशीच ती विलासराव देशमुख यांच्यामध्येही होती. मुद्दा समजल्यावर त्यावर तातडीने स् ही करून आदेश देण्याची भूमिका घेतली पाहिजे. विलासराव एका सेकंदात त्यासंबंधीचा निकाल लावत. सध्या मात्र तीन-तीन महिने होवूनही कागदावर सहीच होत नाही. मुख्यमंत्र्यांना नुसते स्थळ, घटक, भाग, व्यवहार याची माहिती असून चालत नाही. तो राज्याचा नेता असावा लागतो. सर्व गोष्टींचा व्यापक दृष्टीकोनातून विचार करणारा तो नेता असावा लागतो. 
या सगळयाचा अर्थ त्यावेळी आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही, हेच दर्शविणारा होता. पृथ्वीराज चव्हाण यांनीही साहजिकच त्याला उत्तर दिले.  ऐन निवडणुकीच्या घोषणेअगोदर काही कंत्राट  मंजूर करण्याचा आग्रह  केला होता असा गौप्यस्फोट करताना त्यांनी नाव न घेता अजित पवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला होता. या सगळ्याचा फटका पृथ्वीराज चव्हाणांना बसलाच पण जास्त राष्ट्रवादी काँग्रेस बसला. ' मिस्टर क्लिन' अशी चव्हाणांची प्रतिमा होती. कंत्राटदारांचा पक्ष म्हणून अगोदरच या पक्षाची प्रतिमा झालेली होती. आघाडीतील मित्र पक्षाने आणि तेही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने अधोरेखित झाली. 
मुळात अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यात आणणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नव्हते. राज्यातील अनेक घटनांतून हे स्पष्ट झाले होते. राज्य सहकारी बॅँकेवर प्रशासकाची नेमणूक, सिंचन विभागाच्या कामांची श्वेतपत्रिका असो की लवासामध्ये आरक्षणे टाकण्याचा विषय असो राष्ट्रवादी कॉँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चव्हाण करीत आहेत, अशी चर्चा होती. अजित पवार यांनीही ‘अशोकाचं झाड’ त्याची सावली कोणालाच मिळत नाही, असा आरोप करून कॉँग्रेसच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आघाडीतील या सगळ्या कुरुबुरी असताना शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्रित येऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न कधी केला नाही. लोकसभेच्या निवडणुका एकत्रितपणे लढल्यानंतर झालेल्या वाताहतीनंतरही विधानसभेच्या निवडणुकांतही आघाडी करण्याची हुशारी दाखविली नाही. 
गेल्या चार-साडेचार वर्षांत पुलाखालून पाणी वाहून गेले. लोकसभा, विधानसभेच्या पाठोपाठ ठिकठिकाणी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही काँग्रेस -राष्ट्रवादीची पडझड झाली. पक्षाचे अनेक शिलेदार भाजपामध्ये गेले. विरोधी पक्ष म्हणून एकत्रितपणे लढण्यातही अपयश आले. उलट विरोधी पक्षाची जागाही सत्तेतील शिवसेनेने भरून काढली. आता निवडणुका तोंडावर आल्यावर दोन्हीही पक्षांच्या नेत्यांना जाग आली आहे. इतिहासातील चुकांपासून शिकून पुढे जायचे म्हणतात, त्याप्रमाणे जर हातात हात घालून जाण्याची शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांची तयारी असेल तर ठिक आहे. पण त्यामध्ये केवळ वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही ना हे देखील महत्वाचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुण्यातील फेऱ्या वाढल्या आहेत. पुण्यातील कॉँग्रेसमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाईल, असा नेता नाही. ही जागा चव्हाण यांनी भरून काढली आहे. पण त्याचबरोबर कॉँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागेवर लढण्याची चव्हाण यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. चव्हाण यांनी सातत्याने याचा इन्कार केला आहे. परंतु, काँग्रेसकडून लढण्यासाठी मोठे नाव नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे ऐनवेळी पक्षाची गरज म्हणून ते लढूही शकतात. दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादी कॉँग्रेसकडूनही पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची मागणी होत आहे. पवार यांचे एक उद्योजक सृहद येथून लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा मार्ग साफ करायचा असेल तर काँग्रेसने पुण्यातील जागा सोडणे अपेक्षित आहे. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे सहकार्य राष्ट्रवादीला अपेक्षित आहे, अशीही चर्चा आहे. दुसरे म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले होते. बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या इंदापूर, पुरंदर आणि भोर या मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे. गेल्या वेळी एकत्रित लढताना सुळे यांना ही ताकद मिळाली होती. वेगळे लढल्यास येथील मते मिळणार नाहीत. त्यामुळे ही रिस्क घ्यायची नसल्याने आघाडीशिवाय पर्याय नाही. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांशी राष्ट्रवादीला जमवून घ्यावेच लागणार आहे.काँग्रेस -राष्ट्रवादी  ‘तुझे माझे जमेना, तुझ्या  वाचून करमेना’ अशी गेल्या १९ वर्षांपासून आहे. परंतु, पराभवाच्या झटक्याने आता दोघांनाही वास्तवाची जाणीव झाली आहे, हेच यातून स्पष्ट होते. 

Web Title: Is the paralysis ? They put hand in hand for work !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.