संपूर्ण जग कोरोनाच्या कहरावर हेंदकाळते आहे. त्यातून भारताचीही सुटका नाही. कारण लोकसंख्येने जगात दुसरा क्रमांक आहे. भारतातील तीनपैकी एक रुग्ण महाराष्ट्रातील आहे. मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक हा अतिप्रचंड नागरीकरण झालेला भूभाग आहे. निम्म्याहून अधिक लोकसंख्या झोपड्यांत राहते. परप्रांतांतून आलेल्या श्रमिकांची सर्वाधिक संख्याही महाराष्ट्रातच आहे.
शेकडो रेल्वेगाड्या भरभरून उत्तर आणि पूर्व भारतात गेल्या. महाराष्ट्रात एकही भरून आली नाही. रोजगार देणारा ‘महा’राष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकजूट होऊन सामना केला पाहिजे.महाराष्ट्रावर यापूर्वी अशी अनेक संकटे आली, तेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंत जनता एकवटलेली पाहिले आहे.
पानशेतचे धरण फुटीचे प्रकरण असो, कोयनेचा भूकंप, १९७२चा दुष्काळ, मुंबईतील बॉम्बस्फोट आणि जातीय दंगली, लातूरचा भूकंप! अशावेळी महाराष्ट्रातील तमाम राजकीय नेत्यांनी मदतीला धावण्याचा निश्चय केला आणि तो तडीस नेला. अशा प्रसंगांत अनेक नेत्यांनी महाराष्ट्राच्या पालकत्वाची भूमिका बजावली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला अन्नधान्य टंचाईतून मुक्त करण्याचा निर्धार वसंतराव नाईक यांनी करून, ‘हे वचन पाळले नाही तर पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर मला फाशी द्या’, अशी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब देसाई, शरद पवार, आदींनी अनेक प्रसंगी पालकत्वाची भूमिका घेऊन महाराष्ट्राला सावरले आहे.
बॉम्बस्फोटानंतर चोवीस तासांत मुंबईला पूर्वपदावर आणणारे शरद पवार आहेत. लातूरच्या भूकंपानंतर दोन तासांत घटनास्थळावर उभे राहून मदतकार्य सुरू करणारे तेच आहेत. मालदीवकडे केवळ तीन दिवस पुरेल इतकाच साखरेचा साठा होता. या देशाला तीन दिवसांत साखर पोहोचविणारे तेच आहेत. अशी ही महाराष्ट्राची पार्श्वभूमी असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी कुरघोडीचे राजकारण करीत बसावे, हे क्लेशदायी तर आहेच; पण चोहोबाजूने कोंडीत सापडलेल्या सामान्य जनतेच्या भावनेची चाड नाही, असे वाटते. त्यामध्ये शरद पवार यांचेही नाव असावे, याचे आश्चर्य वाटते. खरे तर महाराष्ट्राच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांना मराठी माणसांनी प्रेम दिले. त्यांना सिंहासन दिले. तो भयभीत झाला आहे. त्यांच्या मुलाबाळांच्या शाळा सुरू होणार की नाही माहीत नाही.
नोकऱ्या गेलेल्या तरुणांची चिंता वाढतच आहे. पुढील दिवस कसे असतील, याने भयभीत झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर राजकारणाचे फवारे उडवित नेत्यांनी करमणूक करण्याचे दिवस आहेत का? राज्य सरकारला सल्ला देणे, मदत करणे, मदत केंद्र उभारणे, प्रत्येक नेत्याने आपापल्या जिल्ह्यात तळ ठोकून प्रशासनाला मदत करणे, आदी गोष्टी करण्याऐवजी प्रत्येकजण उठतो आणि राजभवनावर जाऊन येतो! या भेटीचे कारणही स्पष्टपणे देत नाहीत. राजभवनात जाण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गाठावे. तेथे रुग्णांची संख्या चारशेचा टप्पा गाठते आहे. राज्य सरकारनेही केंद्राशी सहकार्याची भूमिका घेऊन मदत घ्यावी.
आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ आहे का? रेल्वेमंत्री म्हणतात, ‘मागितली तर रेल्वे देऊ.’ मग मुंबईच्या सुपुत्रांना मुख्यमंत्र्यांशी बोलून हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या द्या ना. येथे काही लग्नातला मानपान करायचा आहे? मागितला तेवढाच हुंडा द्यायचा आहे? शरद पवार यांनीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वास न शोभणारे वक्तव्य केले. राज्यपालांना भेटून थेट मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि म्हणे, बाळासाहेबांच्या आठवणी काढून मन मोकळे करीत होते. येथे महाराष्ट्र चोहोबाजूने ग्रासला असताना बाळासाहेबांच्या आठवणीत संध्याकाळ रमणीय करण्याची ही वेळ आहे? नारायण राणे म्हणजे फटकळ तोंडच आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना खोटे ठरवून, राष्ट्रपती राजवटीची आमची मागणीच नाही, असे स्पष्ट केले. हे काय चालू आहे? ही नेतेमंडळींची पालकत्वाची भूमिका नाही. ही तर बालकच वाटत आहेत. अनेक पालकमंत्र्यांनी त्यांच्या संबंधित जिल्ह्यांना एकदाही भेट दिलेली नाही. अशांना पालक का म्हणावे? त्यांना तर घरी बसवावे, ते बालकच आहेत. आम्हाला महाराष्ट्राला आधार देणारे पालक हवेत, बालक नकोत!
राज्य सरकारला सल्ला देणे, मदत करणे, मदत केंद्र उभारणे, नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यात तळ ठोकून प्रशासनाला मदत करणे, आदी गोष्टी करण्याऐवजी प्रत्येकजण उठतो आणि राजभवनावर जाऊन येतो! या भेटीचे कारणही स्पष्टपणे देत नाहीत.