- किरण अग्रवाल
राज्यातील राजकीय घडामोडींमुळे साऱ्यांचेच लक्ष मुंबईकडे लागून आहे. लोकप्रतिनिधींचा त्यातील अडकलेपणा पाहता यंत्रणाही काहीशा निवांत आहेत. अशात पहिल्याच पावसाने काही भागात उडविलेली दाणादाण लक्षात घेता लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडूनही दिलासादायक कृतीची अपेक्षा आहे.
जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने अलीकडेच दिलेल्या जोरदार सलामीने काही रस्ते वाहून, तर बांध फुटून गेले, त्यामुळे विकासकामांची कल्हईच उडून गेली आहे. निसर्गाने घडविलेल्या या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करीत जनतेला दिलासा देऊ शकणारे सरकारी पालक मात्र राज्यात घडून आलेल्या सत्तांतराच्या राजकारणात दंग आहेत. त्यामुळे जनता जनार्दनाच्या विवंचनेकडे यंत्रणेचे दुर्लक्ष घडून येणे स्वाभाविक ठरले आहे.
गेला पंधरवडा हा राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारा ठरला. शिवसेनेतील बंडखोरांनी व त्यांच्या समर्थकांनी सुरत ते गोवा व्हाया गुवाहाटी प्रवास केला. ते गोव्यातच असताना त्यांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर त्यांच्यासमवेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता शिंदे सरकारमधील मंत्रिपदांबाबतची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे. ही मंत्रिपदे ज्या कुणाच्या वाट्यास येतील तेव्हा येतील, तोपर्यंत सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी अपेक्षा आहे.
शिंदे व फडणवीस यांनी शपथ घेतल्या घेतल्या उच्चाधिकाऱ्यांची बैठक घेत पीक पाण्याचा आढावा जाणून घेतला व आपली संवेदनशीलता दाखवून दिली, पण गोव्यात अडकून असलेल्यांच्या जिल्ह्यात मात्र पूर पाण्याचा फटका बसलेल्यांना दिलासा लाभताना दिसत नाही. गेल्या सोमवारी रात्रीच्या सुमारास अकोला शहरासह बाळापूर व बार्शीटाकळी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने पेरणी करून झालेल्यांच्या जिवात जीव आला व खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला; परंतु हे होतानाच काही ठिकाणी रस्ते खचले, पूल वाहून गेले व बांधही फुटले. काहींची पेरणी केलेली शेतजमीन खरडून गेली आहे. शेत रस्त्यांची अवस्था तर इतकी दयनीय झाली की, आता पेरण्यांना शेतात कसे जावे या विवंचनेत अनेक शेतकरी पडले आहेत. अशा स्थितीत मदत मिळो न मिळो, पण दिलासा देणारी यंत्रणा पंचनामे करताना दिसणे गरजेचे असते. तेच दिसून येत नाही. याउलट काही भागांत पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. कापूस पिकावर किडीचा हल्ला झाला असून, साेयाबीनची पेरणीही वाया जाण्याची चिन्हे आहेत. निसर्गचक्र आपल्या हाती नाही; परंतु दिलासा व सहानुभूतीची गरज अशावेळी असते.
आतापर्यंत अकोल्याचे पालकत्व बच्चू कडू यांच्याकडे होते. सत्तांतर झाल्याने ही जबाबदारी कोणाकडे येते हे अजून निश्चित व्हायचे आहे. त्यामुळे पाल्यांची विवंचना दुर्लक्षित राहताना दिसत आहे. भाजपातील ज्येष्ठ नेते रणधीर सावरकर व प्रकाश भारसाकळे यापैकी कोणाला तरी पालकत्वाची संधी मिळेल, असे निश्चित मानले जाते. तिकडे बुलडाण्यात आमदार डॉ. संजय कुटे व शिंदे यांच्यासोबत असलेले संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर यापैकी एकाचा मंत्रिमंडळात नंबर लागेल, अशी शक्यता आहे. वाशिममध्ये ज्येष्ठ नेते राजेंद्र पाटणी यांचेही नाव चर्चेत आहे. अर्थात राजकारणात चर्चेखेरीजही काही धक्के बसत असतात. ते काहीही होवो, मंत्रिपदे लाभतील तेव्हा लाभतील; तोपर्यंत संबंधितांनी व इतरांनीही आपापल्या ठिकाणच्या पूर पाण्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून प्रसंगी बळिराजाला दिलासा देणे अपेक्षित आहे. रस्ते व पूल खचून गेल्याच्या प्रकरणात प्रशासनाला कामाला जुंपून व्यवस्था सुरळीत होईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. ही तर पावसाची पहिलीच सलामी आहे, अजून पूर्ण पावसाळा जायचा आहे. त्यासंदर्भाने आपत्ती निवारण व्यवस्था सज्ज असायला हवी.
सारांशात, राज्यात घडून आलेल्या सत्तांतराच्या अनुषंगाने पालकत्व व मंत्रिपदाबाबतचे जे निर्णय व्हायचे ते यथावकाश होतीलच, तोपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी पूर पाण्याच्या स्थितीकडे लक्ष पुरवून प्रसंगी जनतेला दिलासा देण्यासाठी तत्पर दिसणे अपेक्षित आहे.