बांगलादेशात आगडोंब उसळलेला. तिथल्या पंतप्रधानांनी भारतात आश्रय घेतलेला. या हिंसाचारानंतर पाकिस्तानकडे अनेकांनी बोट दाखवलेले. शेजारी देशांचे संबंध ताणलेले. अशावेळी पाकिस्तानी खेळाडू भारतीय स्पर्धकाचा पराभव करतो, तेव्हा त्या भारतीय खेळाडूच्या आईची प्रतिक्रिया काय असते? ‘जो जिंकला, तोही माझाच मुलगा आहे. त्यानेही कष्ट केले आहेत. त्याचेही कौतुक!’ तर, पाकिस्तानच्या अर्शदची आई म्हणते, ‘नीरज माझ्या मुलाचा भाऊ आहे. त्याच्यासाठीही मी अल्लाकडे दुवा मागते!’ ऑलिम्पिक कोणी खरे जिंकले असेल, तर ते या मातांनी!
ऑलिम्पिकच्या सोहळ्याची सांगता येत्या काही तासांत होईल. पदकतालिकेत नेहमीप्रमाणे अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया यांची आघाडी आहे. महाकाय भारताचा या तालिकेत ६४वा क्रमांक आहे. नीरज चोप्रा, भारताचा हॉकी संघ, मनू भाकर, स्वप्नील कुशाळे, विनेश फोगाट यांनी देदीप्यमान कामगिरी यावेळी केली. प्रत्येकालाच पदक मिळाले, असे नाही. ते शक्यही नसते. पण, खेळाकडे खिलाडूवृत्तीने सर्व खेळाडूंनी पाहिले, हे खरे यश. नीरजने रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरजच्या आईची, सरोजदेवींची, प्रतिक्रिया याच खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवणारी. या प्रकारात पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्णपदक मिळाले. ‘नीरजचे रौप्य आम्हाला सुवर्णपदकासारखेच आहे. अर्शद हादेखील माझाच मुलगा आहे. तो मेहनती आणि गुणी आहे’, ही नीरजच्या आईची प्रतिक्रिया आणि त्यानंतर अर्शदच्या आईची भावना खेळाला सीमा नसतात, हे अधोरेखित करणारी.
जागतिकीकरणाच्या या काळात विविध देशांच्या सीमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खरे तर पुसट झाल्या आहेत. एखाद्या देशाचा प्रशिक्षक विदेशीही असतो आणि त्यात कुणालाही गैर वाटत नाही. विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बजरंग पुनिया, अभिनव बिंद्रा यांसह अनेक परदेशी खेळाडूही तिच्यामागे ठामपणे उभे राहिले, हादेखील याच खिलाडूवृत्तीचा नमुना. पण, हीच खिलाडूवृत्ती दाखविण्यात आपल्या देशातील काही नागरिक कमी पडतात का? एखाद्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ पहिल्याच फेरीत पराभूत झाला, तर संघाला तोंड लपवून यावे लागते, हे आपण पाहिले आहे. विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर त्याचे राजकारण करणे, तिलाच ट्रोल करणे काय दाखवते? क्रीडामंत्री मनसुख मंडाविया यांनी विनेश फोगाटवर सरकारने किती खर्च केला, याची माहिती संसदेत दिली. असा खर्च करणे, हे उपकार नव्हेत. ते या खात्याचे कर्तव्यच आहे. अशा प्रकारचा हिशेब ठेवण्यात चोख असलेल्या क्रीडा खात्याने ऑलिम्पिकमध्ये सर्व क्रीडा प्रकारांत भारताचे खेळाडू सहभागी झाले का, कुठल्या खेळात खेळाडू सहभागी झाले नाहीत, त्यासाठी क्रीडा मंत्रालय काय करीत आहे, हेदेखील सांगण्याची गरज होती.
क्रिकेटला दैवत मानणाऱ्यांची संख्या आपल्या देशात पुष्कळ आहे. मात्र, भालाफेक, गोळाफेक, तिरंदाजी, रायफल शूटिंग, पोहणे, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, टेनिस, टेबल टेनिस.. असे इतर अनेक खेळदेखील असतात, याची जाणीव दर ऑलिम्पिकच्या वेळीच यावी, अशी स्थिती आहे. देशातल्या सर्वसामान्यांना खेळाची दारे आज बंदच असल्यासारखी स्थिती आहे. खेळायला खुली मैदाने नाहीत. खेळाडू घडविण्यासाठी विशेष धोरण, विशेष प्रयत्न नाहीत. भारतात संरक्षण दले आणि पदरमोड करून मुलांना खेळामध्ये प्रवीण करणारा पालकवर्गच सन्मानास अधिक पात्र आहे.
क्रिकेटची पंढरी असलेला भारत देश इतर खेळांची पंढरी का होऊ शकत नाही? सर्वाधिक युवक असलेल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू अपवादानेच आढळावेत, हे क्रीडा मंत्रालयाचे अपयश नाही का? मात्र, याची खंत ना क्रीडामंत्र्यांना, ना एखाद्या खेळाडूला ट्रोल करणाऱ्यांना. तरीही बावन्न वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने केलेली चमकदार कामगिरी अभिमानास्पद आहे. हा स्तर आणखी उंचावणे अशक्य मुळीच नाही. पण, त्यासाठी देशाचे क्रीडा धोरण सर्वंकष असायला हवे. देशाचे युवाकल्याण आणि क्रीडा खाते, क्रीडामंत्री, स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया यांची नावे ज्या वेळी देशातल्या प्रत्येकाच्या ओठावर आपसूक येतील, तेव्हा खेळाचे बाळकडू देशात रुजले, असे म्हणावे लागेल.
राष्ट्रकुल आणि आशियायी स्पर्धांमध्ये आपली कामगिरी सरस असली, तरी ऑलिम्पिकमधील कामगिरी खूप सुधारावी लागणार आहे. या ऑलिम्पिकने एक मात्र झाले. खेळाडू कमी जिंकले, मात्र खेळ जिंकला. खिलाडूवृत्ती जिंकली. नीरज आणि अर्शदच्या आई हे या विजयाचे ठळक उदाहरण! पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर म्हणाला ते खरे आहे. ‘आपल्या मुलाला पराभूत करणाऱ्या परदेशी खेळाडूलाही आपलाच मुलगा म्हणण्याचे मोठे मन एक आईच दाखवू शकते.’ आपल्याला असे मोठे होता येईल का?