सांसदीय गोंधळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:52 AM2018-04-16T00:52:42+5:302018-04-16T00:52:42+5:30

एवढे दिवस संसदेत आरडाओरड करून आम्ही ती बंद पाडली तरी सरकार ‘जनतेचे प्रश्न’ हाती घेत नाही म्हणून काँग्रेसने देशव्यापी उपोषण मांडले, नंतर त्यांनी संसद बंद पाडून लोकशाही मारली म्हणून भाजपने तसेच उपोषण देशभर केले.

 Parliamentary confusion | सांसदीय गोंधळी

सांसदीय गोंधळी

Next

एवढे दिवस संसदेत आरडाओरड करून आम्ही ती बंद पाडली तरी सरकार ‘जनतेचे प्रश्न’ हाती घेत नाही म्हणून काँग्रेसने देशव्यापी उपोषण मांडले, नंतर त्यांनी संसद बंद पाडून लोकशाही मारली म्हणून भाजपने तसेच उपोषण देशभर केले. संसद चालविणे याहून ती बंद पाडणे हाच कार्यक्रम आपल्या राजकीय पक्षांनी २०१२ पासून चालविला आहे. डॉ. मनमोहन सिंगांचे सरकार सत्तेवर असताना हा पराक्रम भाजपने केला. आता मोदींचे सरकार सत्तारूढ असताना त्याची परतफेड काँग्रेस करीत आहे. या दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधी कांगाव्याला त्याचमुळे अर्थ नाही. प्रसिद्धीसाठी फ ायद्याची स्टंटबाजी हेच त्यांच्या संसद बंद पाडण्याच्या व नंतर उपोषण करण्याच्या प्रकारातील तथ्य आहे. आश्चर्य याचे की या दोन्ही राष्ट्रीय म्हणविणाऱ्या पक्षांचे मानांकित नेतेही या गदारोळात सहभाग घेताना, त्यास प्रोत्साहन देताना जसे दिसले तसे त्यांच्यातील कुणी आपल्या निष्ठावंत अनुयायांना, किमान लोकशाहीसाठी, आवर घालतानाही दिसले नाही. त्यामुळे संसदेतील गदारोळ, संसद बंदी आणि त्यानंतरची वेतनबंदी व उपोषण हे सारे एकाच निंद्य नाटकाचे चार अंक आहेत आणि ते मुकाटपणे पाहण्याची पाळी देशाच्या सुबुद्ध मतदारांवर आली आहे. आणखी एक गंमत ही की काँग्रेसचे लोक संसद बंद पाडतात तेव्हा त्या पक्षाचे कार्यकर्ते टाळ्या वाजवितात आणि भाजपावाले आपल्या संसद बंदीच्या वेळीही तसाच जल्लोष करताना दिसतात. वास्तव एवढेच की लोकशाही म्हणजे केवळ आमच्याच पक्षाचे राज्य अशी या साºयांची धारणा आहे. तुमचे राज्य म्हणजे लोकशाही नव्हे असा याचा दुसरा अर्थ आहे. संसदेत राहुल गांधी असतात, सोनियाजी असतात, तसे अडवाणी आणि जोशीही असतात. मात्र या मोठ्या माणसांसह सारे ज्येष्ठ नेतेही अशावेळी मौन बाळगून असतात किंवा ते जे सुरू आहे तोच सद्यस्थितीवरचा खरा उपाय आहे, असे त्यांनाही वाटत असते. तात्पर्य लोकशाहीविषयीची या पक्षांची ही एक मोठी राजकीय ढोंगबाजी आहे. त्यांचे खरे प्रेम सत्तेवर आहे आणि सत्तेतून मिळणाºया अधिकारावर व आणखीही त्यातून मिळणाºया अनुषंगिक लाभांवरच त्यांचा खरा लोभ आहे. त्यामुळे या बतावणीला कुणी बळी पडण्याचे कारण नाही. कालपर्यंत त्यांचा गोंधळ झाला, आता हे गोंधळ करीत आहेत आणि हे गोंधळीच आपले प्रतिनिधी म्हणून आपले भविष्य साकारायला आपण निवडून दिले आहेत. माध्यमांचे बरे आहे, ती या ढोंगाचे विश्लेषण करीत नाहीत आणि त्यांचा इतिहासही लोकांना सांगत नाहीत. आजचा गोंधळ ही आताची ताजी बातमी आणि कालचा गोंधळ ही शिळी झालेली बिनकामाची बातमी. देशात बेरोजगारीने प्रचंड संताप उभा केला आहे. शेतकºयांच्या आत्महत्या थांबत नाहीत. काश्मीरच्या सीमेवर जवानांचे शहीद होणे सुरूच असते, दलितांवरील अत्याचार वाढत असतात आणि अल्पसंख्याकांच्या मनातली धास्तीही मोठी होत असते. तिकडे चीन धमक्या देतो आणि देशाच्या अनेक प्रदेशांवर आपला हक्क सांगतो. बँका नागरिकांचे पैसे बुडवितात, ते बुडविणारे विदेशात मजेत असतात, त्यांच्या तेथे पोहोचण्यास सरकारची मदतही लाभत असते. पंतप्रधान मात्र स्वच्छतेच्या मोहिमा काढतात आणि अमित शहा ‘काँग्रेसमुक्त भारताची’ हाळी देतात. तात्पर्य जनतेचे प्रश्न जेथल्या तेथे, देशासमोरची संकटे आहेत तशीच. जनतेचे प्रतिनिधी वेतन परत करतात (त्या दिवसातील उत्पन्न परत करत नाहीत) आणि आपली हतबलता दाखवायला उपोषणाचे मंडप उभे करतात. त्या मंडपातील भाषणेही प्रचारी आणि मतांचा जोगवा मागणारी. ही सारी गोंधळगाथा भारत माता पाहत असते आणि सामान्य जनतेसारखीच बहुदा तीही व्यथित होत असते. लोकशाहीला काळीमा फासणे हीच लोकशाही वाचविण्याची कृती आहे असे बहुदा आपल्या पुढाºयांचे मत झाले असावे असे सांगणारे हे चित्र आहे.

Web Title:  Parliamentary confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.