बेल्जियम- जेव्हा तुम्ही तरुण असता, रक्त सळसळत असतं, काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी अंगात संचारलेली असते, जगाला अंगावर घेण्याची धमक असते आणि काहीही होवो, कुठल्याही परिणामांची चिंता नसते, त्यावेळीच खरं तर अधिक संयमानं वागण्याची गरज असते.तरुण वयच असं असतं, जे कोणत्याही बंधनांना स्वीकारायला नकार देतं आणि कायम त्याविरुद्ध बंड पुकारतं.. कोरोनाच्या काळात याची किंमत अनेक देशांना चुकवावी लागली. इटली आणि स्पेन ही त्यातली प्रमुख उदाहरणं.
चीनमध्ये कोरोनानं रुग्ण दगावत असताना, खरं तर संपूर्ण जगासाठीच ती एक धोक्याची घंटा होती, पण अपवाद वगळता कोणीच त्याकडे फारसं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही किंवा ‘कोरोना आपल्यापर्यंत येणार नाही’ या गैरसमजात ते राहिले. त्या त्या प्रत्येकाला आज त्याचे परिणाम भोगावे लागताहेत. बेल्जियमही आज या संकटातून जातो आहे.
कोरोनाचा कहर तिथेही आहेच. आता तो वाढला आहे. त्याला काही प्रमाणात तिथले तरुणही जबाबदार आहेत, असं तिथल्याच अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कारण घरात बसा, होम क्वारंटाईन व्हा, असा सल्ला सरकार पोटतिडकीनं देत असताना, अनेक नागरिकांनी स्वत:ला स्थानबद्ध तर केलं, त्यात तरुणांचाही वाटा होता, त्यांनीही स्वत:ला कोंडून घेतलं, पण असं करताना अनेक तरुणांनी एकत्र येत पार्ट्या केल्या.
कॅफेमध्ये रात्री जागवत एकमेकांसमवेत डान्स, गाणी यात ते तल्लीन झाले. याचा फटका त्यांना बसलाच. यातल्या अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आणि आज त्यांच्यावर विविध इस्पितळांत उपचार चालू आहेत, अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आलं आहे, तर काहींना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ज्या ज्या लोकांच्या ते संपर्कात आले, ज्यांना ज्यांना ते भेटले, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी करताहेत.
सरकार आणि प्रशासनानं सगळ्यांना, विशेषत: तरुणांना हात जोडून विनंती करताना एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, तरुणांनो, या वयात स्वत:ला कोंडून घेणं तुम्हाला जड जात असेल, तुम्हाला तुमच्यावरचा तो अन्याय वाटत असेल, आपण अजिंक्य आहोत, असंही तुम्हाला वाटत असेल, पण थोडा संयम बाळगा, जबाबदारीचं भान बाळगा, नाहीतर कोरोनाचा हा राक्षस कोणालाच जिवंत सोडणार नाही..
कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले तसं बेल्जियमनं अनेक उपाययोजनाही सुरू केल्या. लोकांच्या बाहेर फिरण्यावर बंदी घातली. रुग्णालयांतले विविध कक्ष रिकामे करून तिथे खास कोरोनाग्रस्तांसाठी जागा केली. पण बेल्जियम सरकारचं अधिक लक्ष तरुणांवर आहे. त्यांनी पुन्हा सोशल गॅदरिंग करू नये आणि कोरोनाचा प्रसाद इतरांना देताना त्यांचा जीव धोक्यात घालू नये, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तरुणांनाही सरकारच्या आवाहनाचं गांभीर्य आता नक्कीच कळलं असेल..