इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके (अर्थात एमके आमीर खानच्या पीकेचा डुप्लिकेट यमगरवाडीचा मनकवडे) आज दु:खी अंत:करणाने महागुरू नारद कोणती असाईनमेंट देणार याची प्रतीक्षा करीत होता. नेहमी व्हॉट्सअॅपवर आदेश देणाºया नारदांनी त्याला थेट व्हॉट्सअॅप कॉलिंगच केले... महागुरू काही बोलण्याच्या आधीच यमके बोलू लागला... ‘गुरुदेव आज मी तुमची कुठलीच असाईनमेंट घेणार नाही. उलट आज माझंच तुम्हाला मागणं आहे... आमचा जीवाभावाचा माणूस आगंतुक स्वर्गलोकी निघून गेला आहे. त्यांनाच माझं पत्र पोहोच करा आणि आमच्या मनाची घालमेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा!’ नारदांनी क्षणात यमकेची भावना कुणाबद्दल आहे हे ओळखले. कुलपती स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांना पत्र पोहोच करून शिष्याची इच्छा पूर्ण करण्याचा शब्द दिला. यमकेनेही लगोलग आयपॅडवर विद्युत गतीने बोटे फिरवित आपल्या भावनांना वाट करून दिली... अन् आपले पत्र पूर्ण केले...आदरणीय प्रिय पतंगरावजी, प्रेमपूर्वक साष्टांग नमस्कार, काय लिहू साहेब? हे असं आगंतुक अन् माझ्यासारख्या लाखो स्नेह्यांना चटका लावून स्वर्गलोकी निघून जाणं बरं नव्हं... अहो, मिसरूडही फुटलं नव्हतं तेव्हा विद्यानगरी पुण्यात तुम्ही एका पत्र्याच्या दहा बाय दहाच्या खोलीलाच भारती विद्यापीठ या फलकानं सजवलं... सोनसळच्या मातीत गरिबीने दिलेल्या प्रत्येक चटक्याला तुम्ही समाजाचे दु:ख हलकं करणाºया दागिन्यात रूपांतरित करीत गेलात. यशवंतराव मोहिते-भाऊंचे बोट धरून उभ्या महाराष्टÑात एस.टी. महामंडळाची प्रतिष्ठा वाढवित गेला. लोकनेते वसंतदादांच्या विरोधी गोटात काम करूनही दादांवरचा लळा कधी कमी होऊ दिला नाही. लोकनेते राजारामबापूंवरचंही प्रेम जतन करण्यात कधी कमी पडला नाहीत. १९९५ साली विधानसभा निवडणुकीत तुम्ही पराभवाचं तोंड पाहिलं. पण पुन्हा फक्त मुसंडीच मारली नाही तर महाराष्टÑाच्या राजकारणात सदैव ‘भावी मुख्यमंत्री’ हे मानाचं बिरुद घेऊनच लोकसंग्रह विस्तारत गेलात. मला आठवतं १९९९ च्या निवडणूक प्रचारात भिलवडी परिसरात एका तरुणाने स्वत:च्या रक्ताने तुमचे नाव लिहून तुम्हाला विजयाची खात्री दिली होती. त्यावेळी अश्रूंनी भरलेले तुमचे डोळे आजही आमच्या डोळ्यांसमोर येतात. अरे-तुरे बोलणे हा तर तुमचा स्वभावच! मंत्रालय असो वा मतदारसंघ, मंत्री असो वा अधिकारी अरे-तुरे बोलून ‘जय हो’ म्हणण्याची तुमची शैली आमचा ऊर भरून टाकायची. आलेला माणूस रिकाम्या हातानं जाणार नाही याची काळजी तुम्ही सदैव वाहत आलात. पडत्या काळात मदतीला येणाºया कुठल्याही माणसाचा तुम्हाला कधीच विसर पडत नसायचा. उलट माणूस लहान की मोठा हे न पाहता त्याच्या घरी जाऊन त्याने केलेल्या सहकार्याची तोंड भरून कृतज्ञता व्यक्त करणे ही तुमची खासियत. डोंगराच्या कपारीतून अनेक खाचखळगे पार करीत खळखळ वाहणाºया धबधब्यासारखा तुमचा स्वभाव . प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होताना प्रत्येक क्षणी निर्भेळ प्रेम, माणुसकी आणि सच्चेपणा जतन करणारा आपल्यातला माणूस भेटायचा. साहेब, तुमच्यातला तो माणूस आता आम्ही कुठे शोधायचा... पतंगरावजी असं आगंतुक निघून जाणं बरं नव्हं...- आपला,यमके (इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर)
पतंगरावजी, आगंतुक जाणं बरं नव्हं...
By राजा माने | Published: March 12, 2018 12:19 AM