- सुहास किर्लोस्कर३६ चित्रपट, डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन करताना भारतीय चित्रपटाला वेगळी दिशा देणाऱ्या चित्रपट लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, चित्रकार सत्यजित राय या महान कलाकाराचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे (जन्म २ मे १९२१). त्यानिमित्ताने या अनोख्या कलाकाराच्या कलाकृतीचा आढावा.
दि. २५ आॅगस्ट १९५५ रोजी रिलीज झालेला ‘पथेर पांचाली’ हा सत्यजित राय यांचा पहिला चित्रपट. तेव्हा आपल्याकडे ज्या पद्धतीने चित्रपट बनविले जात होते, त्याचा विचार करून हा चित्रपट बघायला हवा. ‘श्री ४२०’, ‘आझाद’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘मिस्टर अॅन्ड मिसेस ५५’, ‘देवदास’, ‘मुनीमजी’, ‘सीमा’ असे चित्रपट चालले. मराठीत दहा चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी ‘गंगेत घोडं न्हालं’ (राजा परांजपे), ‘येरे माझ्या मागल्या’ (भालजी पेंढारकर) ही ठळक नावे. या काळात सत्यजित राय यांनी बिभूतीभूषण बंडोपाध्याय यांच्या ‘पथेर पांचाली’ या १९२८मध्ये लिहिलेल्या कादंबरीवर चित्रपट काढला.
यापूर्वी त्यांनी कधी फोटोग्राफी केली नव्हती. चित्रपट दिग्दर्शनाचा त्यांना अनुभव नव्हता. चित्रपटाचे कॅमेरामन सुब्रत मित्र यांनी यापूर्वी कोणत्याही चित्रपटाची फोटोग्राफी केली नव्हती. बालकलाकारांनी यापूर्वी कधी चित्रपटात अभिनय केला नव्हता, तसेच त्यांची स्क्रीन टेस्टसुद्धा घेतली नव्हती. लहान मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांचे गाव हेच त्यांचे विश्व कसे दिसते, हे राय यांनी चित्रित केले आणि दाखविले.पश्चिम बंगालमधील एका खेडेगावात हरिहर या ब्राह्मण पुजाºयाची मुलगी दुर्गा व मुलगा अपू यांची ही कथा. त्यांच्या घरात जख्खड म्हातारी आहे. दुर्गा, तिची आई, वडील, त्यांचे घर, गाव यांची मेकअपशिवाय ओळख होते आणि त्या घरात एका बाळाचा जन्म होतो. त्याचे नाव अपू. दुर्गाला स्वैर बागडायचे आहे. झाडावरची फळे तोडून खायची आहेत.
मैत्रिणींसोबत खेळायचंय. मिठाई विकत घ्यायची आहे; पण आर्थिक विपन्नावस्थेमुळे हे शक्य नाही. वडिलांचा पगार दरमहा आठ रुपये आणि त्यामुळे वैतागणारी आई, बनारसला गेल्यानंतर आपली परिस्थिती सुधारेल, हा त्यांचा आशावाद. हे सगळे कॅमेरामनच्या नजरेतून आणि अपूच्या निरागस डोळ्यांनी दिसते.
खेड्यातल्या लोकांना शहराचे अनामिक आकर्षण असते. तेसुद्धा चित्रपटात दिसते. गावामधले राहते घर सोडून शहरात चांगले उत्पन्न मिळेल या आशेने येणारे लोक कुठल्या तरी वस्तीत दहा बाय दहाच्या खोलीत राहून सुखी होण्याची स्वप्ने पाहतात हे आपण आजही बघतो आहोत. दुर्गाची आईसुद्धा अशीच स्वप्ने बघत असते. गावामधून जाणारी रेल्वे, त्याच्या मागे धावणारी मुले, शहरात जास्त उत्पन्न व सुख मिळेल ही आशा, त्यासाठी दुर्गाच्या वडिलांचे शहरात जाणे आणि तिकडे गेल्यानंतर तिथेसुद्धा काही प्रश्न आहेत, याची जाणीव होणे. हे आजही दिसणारे चित्र तेव्हा सत्यजित राय यांनी दाखविले, हे विशेष. अत्यंत दरिद्री अवस्थेतही कायम राहिलेली कुटुंबव्यवस्था. मुलांच्या तुलनेत मुलींना मिळणारी दुय्यम वागणूक आपल्यासमोर येते. नैसर्गिक वातावरणात शूट केलेला हा चित्रपट, कथा ओघवत्या भाषेत सांगतो, असे समकालीन दिग्दर्शक अकिरो कुरोसावा म्हणतात.
सत्यजित राय यांनी या चित्रपटाला संगीत दिग्दर्शन करण्याची विनंती केल्यानंतर पं. रविशंकर यांनी चित्रपट बघितला. तो चित्रपट त्यांना विलक्षण भावला आणि त्यांनी सा0डेचार तासांत याचे पार्श्वसंगीत तयार केले. टायटल सुरू होताच त्यांची सतार आपल्याला ऐकू येते आणि पूर्ण चित्रपटात आपण सतार ऐकत राहतो. पं. रविशंकर आणि सत्यजित राय यांचे मैत्र होते. चित्रपट बंगालमधल्या खेड्यात घडतो, तरीही पार्श्वसंगीताचे काही बासरीचे तुकडे राजस्थानी लोकसंगीतावर आधारित आहेत, ज्याचा एकत्रित परिणाम अनोखा आहे.
चित्रपटाचे थीम म्युझिक स्वरूपात वाजणारी सतार निरंतर ऐकत राहावी अशी आहे. हे संगीत 'केस्र१ङ्म५्र२ी' करून वेगळा अल्बम पं. रविशंकर यांनी काढला, तो श्रवणीय आहे. काही प्रसंग आपल्याला कॅमेºयाच्या भाषेत समजतात. दुर्गाला होणारा आनंद आपल्याला सतारीच्या ‘दिडदा दिडदा’मधून ऐकू येतो. शेवटच्या हृदयद्रावक प्रसंगामध्ये पं. रविशंकर यांनी सारंगीऐवजी दक्षिणा मोहन टागोर यांच्या तार शेहनाईचा वापर केला आहे.
आर्थिक पाठबळ मिळण्यात राय यांना नेहमीच झगडावे लागले. त्यावेळच्या प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी चित्रपटास आर्थिक बळ देण्याचे मान्य केले; पण एका अटीवर... चित्रपटाचा शेवट कादंबरीप्रमाणे न करता गोड करावा. चित्रपटाची फोटोग्राफी अप्रतिम आहे. सुब्रत मित्र यांनी नैसर्गिकपणे दाखवलेला प्रकाश आणि अंधाराचा खेळ बघण्यासारखा आहे. बन्सी चंदगुप्त यांचे कलादिग्दर्शन अप्रतिम. कानू बनर्जी (हरिहर), करुणा बनर्जी (सर्बोजया), सुबीर (अपू) यांचा अभिनय बघण्यासारखा; पण आपले मन जिंकून जाते ती उमा दास गुप्ता (दुर्गा).‘पथेर पांचाली’ म्हणजे छोट्या वाटेवरचे गाणे.
राय यांच्यासारखे कलाकार काळाच्या पुढे असतात आणि कालातीतसुद्धा. या चित्रपटाने भारतात या कलेला राय यांनी कलात्मकतेच्या नव्या वाटेवर आणून सोडले आणि चित्रपटसृष्टीला नवी दिशा दाखविली. हा चित्रपट तेव्हाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी बघितला आणि कान्स फिल्म महोत्सवासाठी पाठविण्याची शिफारस केली आणि या चित्रपटाचा यथार्थ गौरव झाला; परंतु आपण प्रेक्षक या नात्याने सत्यजित राय यांचे त्याचवेळी कौतुक करण्यात कमी पडलो. त्यावेळी कदाचित आपण चित्रपटांकडे कला दृष्टिकोनातून न बघता निव्वळ करमणुकीचे साधन बघण्यात मश्गुल होतो.