शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

पवार खरोखरी इतके का अनभिज्ञ?

By admin | Published: January 09, 2017 12:40 AM

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली घरघर संबंधिताना किती घोर लावणारी ठरू शकते याचा प्रत्यय राज्यात अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनी आणून दिला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली घरघर संबंधिताना किती घोर लावणारी ठरू शकते याचा प्रत्यय राज्यात अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनी आणून दिला आहे. काँग्रेस नामशेष झाली, तिला आता काही भवितव्य उरलेले नाही असे जे लोक म्हणत होते (ज्यात राष्ट्रवादीकरही आलेच) त्यांचे दात घशात घालून सर्वंकष निकालात काँग्रेसने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आणि ग्रामीण मतदार आजदेखील आपल्यासोबत आहे व आपल्यावर तिचा अजूनही विश्वास आहे, याची प्रचिती तिने आणून दिली. अर्थात या वास्तवाची खदखद भाजपा किंवा सेना यांच्यापेक्षा राष्ट्रवादीच्या मनात अधिक तीव्र असणे स्वाभाविक आहे. कारण भाजपा किंवा मोदी-शाह यांचे ‘काँग्रेसमुक्त भारत’ अभियान बरेच अलीकडचे आणि वाचिक. पण पवारांनी हे अभियान अनेक वर्षे आधीच सुरू केलेले व त्याला कृतीची जोडदेखील दिलेली. पण आपला तो हेतू काही साध्य होत नाही याची जाण त्यांना याआधीही तशी झालीच होती. पण नगरपालिका निवडणुकांच्या निकालाने आपला हेतू चक्क पराभूत होताना पाहून त्या पक्षाला जरी नाही तरी दस्तुरखुद्द शरद पवारांना खडबडून जाग आलेली दिसते आणि त्यातूनच त्यांनी मग नव्याने पक्षाची उसललेली वीण पुन्हा घट्ट करण्यासाठी महाराष्ट्र भ्रमण सुरू केलेले दिसते. अर्थात त्याचा प्रारंभ मग नाशिकपासून होणे केवळ स्वाभाविकच नव्हे तर अगत्याचे ठरते. ज्या शिवसेनेला गुंडपुंडांची व खंडणीखोरांची संघटना म्हणून पवारांसकट साऱ्यांनी सतत हिणवले, ती संघटना प्रत्यक्षात भुरट्यांची ठरावी इतके महान पराक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशकातील तीन महाभागांनी केले आणि संपूर्ण राज्यात पक्षाच्या कथित प्रतिष्ठेचे पार धिंडवडे निघाले. या तिघातील छगन चंद्रकांत भुजबळ यांचा दिग्विजय आता तमाम देशाला मुखोद्गत झाला आहे. दुसरे महाभाग या पक्षाचे माजी खासदार आणि बाजार समिती, साखर कारखाना, जिल्हा बँक आदि ठिकाणी अनेक वर्षे फणा काढून बसलेले. त्यांचे कार्यकर्तृत्व इतके थोर की त्यांनी सहकारात जे जे म्हणून उद्योग एव्हाना राज्यमान्यता मिळवून बसले आहेत, ते तर केलेच शिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि बोनसच्या रकमेवरही डल्ला मारला. तिसरा महानुभाव तर असा काही निघाला की त्याने चक्क चलनी नोटा छापण्याचाच उद्योग सुरू केला. हे तिघे आता सरकारी पाहुणे आहेत व त्यांचा पाहुणचार केव्हां संपेल हे कोणालाही सांगणे अवघड आहे. या तिघांना पक्षातील कोणत्या ज्येष्ठांचा आशीर्वाद होता हे साक्षात शरद पवारांखेरीज अन्य कोण चांगले जाणत असणार बरे? भुजबळांनी पवारांच्या थोरल्या पातीचा तर देवीदास पिंगळे नामेकरून माजी खासदाराला धाकल्या पातीचा आशीर्वाद होता. परिणामी पवारांनी आपल्या झाडाझडती अभियानाच्या प्रथम अध्यायात नाशिकक्षेत्री बोलताना या दोहोंचा चुकूनही उल्लेख केला नाही. त्यांनी उल्लेख केला तो पक्षाचाच जिल्हा पातळीवरील पदाधिकारी असलेल्या आणि रिझर्व्ह बँकेचे काम हलके करण्यासाठी नोटा छापणाऱ्या कोणा छबू नागरेचा. वास्तविक पाहता पवारांसारख्यानी असा दुजाभाव करणे योग्य नव्हते. या छबुकल्याने त्याच्यातील उद्यमशीलतेचे दर्शन घडविले, कागद, शाई, छपाई यंत्र आदिमध्ये भांडवली गुंतवणूक केली, छापलेल्या नोटा दारोदार विकून पणन कौशल्य दाखविले, त्या तुलनेत भुजबळ-पिंगळे यांनी काय केले, तर आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या. पण त्यांना मुळीच हात न लावता हा नागरे कोण, कोठून आला, त्याला पक्षात कोणी आणले, कसे आणले याचा निकाल घेण्याची घोषणा केली आणि ती जबाबदारी मुळातच ज्यांच्या डोक्यावर केवळ तलवारच नव्हे तर संभाव्य चौकशांच्या अनेक तलवारी, खंजीर आणि सुरे लटकत आहेत त्या सुनील तटकरे यांच्यावर सोपविली. केवळ तितकेच नव्हे तर नागरेसारख्याला फासावर लटकवले पाहिजे वगैरे घोषणाही केली. पवारांसारख्या राजकारण्यांच्याच वक्तव्याचा हवाला द्यायचा तर आता कायदा त्याचे काम करीलच की! जेव्हां काही करणे खुद्द पवारांच्या हाती होते तेव्हां त्यांनी काय केले? नागरेसारखे लोक पक्षात वाढत असताना स्थानिक पातळीवरील नेते काय करीत होते, असाही एका जाहीर सवाल पवारांनी उपस्थित केला. हा प्रश्न त्यांनी जाहीरपणे विचारण्याऐवजी नाशिकचे दिवंगत माजी खासदार व पवारांचेच आडनाव बंधू असलेल्या वसंतरावांच्या भार्येला खासगीत विचारला असता तर अपप्रवृत्तींच्या विरोधात ते काम करीत असताना त्यांना कोण अडवत होते आणि त्यांच्या थेट निवासस्थानी व्यक्तिगत हल्ले करणाऱ्यांची कोण पाठराखण करीत होते, याचा सारा तपशील त्यांना मिळून गेला असता. अर्थात तशी प्रामाणिक इच्छा वा तगमग असती तरच. पण यातील खरा आणि गंभीर मुद्दा वेगळाच आहे. ज्या पक्षाचे आपण राष्ट्रीय अध्यक्ष आहोेत त्या पक्षात देशद्रोहासारखा गुन्हा करणारा प्राणी येतो कसा, का येतो, त्याला कोण आणते, तो पदाधिकारी बनतो कसा आणि आपल्याला कोणीच कसे काही सांगत नाही असे अनेक प्रश्न ज्या व्यक्तीला पडतात ती व्यक्ती खरोखरीच इतकी अनभिज्ञ असते? आणि तसे असेल तर हीच व्यक्ती कोणे एके काळी देशाची थेट संरक्षण मंत्री होती, याची आठवण उरात धडकी बसवून जाणारी ठरत नाही?