दुर्गा भागवत ज्येष्ठ साहित्यिक
हेमंताचा पहिला महिना मार्गशीर्ष. असे काय आहे या महिन्यात की श्रीकृष्णाने 'मासानां मार्गशीर्षोऽहम्' म्हणून यालाच गौरवावे? तसे पाहिले तर बाह्य आकर्षणांनी नटलेला हा महिना नाही. पण खरोखरच यातले ते थंड आणि गात्रांना शांतविणारे वातावरण, ते छायाप्रकाशाचे नाट्य आणि त्यातून प्रतीत होणारे रमणीय भ्रांतिजल आणि यात आढळून येणारी प्राण्यांतली जीवनाची भीषण ओढ, ती क्रूर पारध पाहा. मार्गशीर्षाची सुरुवात मोठी मोहक असते. दिवस लहानलहानच होत जाताहेत. कामाच्या भानगडीत कुठे इकडे तिकडे करावे न करावे, सांजावते. संध्याकाळच्या छाया दाटल्यानंतर एकदम रिकामे वाटू लागते. रात्रीची ओढ, रात्रीच्या सौंदर्याची मोहिनी, आकाशाची दीप्ती आता मनाला चांगलीच जाणवू लागते. ही पाहा, बीजेची कोर गुलाबी पश्चिमेस कशी शोभून दिसते आहे. किती नाजूक आणि आकाराच्या मानाने बारीक व रेखीव आहे ती. इतकी बारीक की तिच्या त्या मोतिया रंगाच्या छटाही दिसून दिसेनाशा वाटताहेत. निरभ्र आकाश किती मोठे तारे तर अजून उगवलेच नाहीत. शुक्राची चांदणी तेवढी जवळच चमकते आहे. पण ही नाजूक कोर किती साधी असूनही पाहणाऱ्याची नजर आपल्याकडे वेधून घेते आहे. चतुर्थीच्या चंद्रकोरीचा नखरा हिच्यात नाही. मादकता नाही. न नटलेले आणि म्हणूनच अत्यंत भूषित झालेले सौंदर्य कसे असते असे मला कुणी विचारले तर, मी या द्वितीयेच्या चंद्रकलेकडे बोट दाखवी.
वाढत्या रात्रीच्या थंडीबरोबर मार्गशीर्षातल्या त्या नैर्ऋत्येकडच्या थंड वाऱ्याच्या झुळकांनी शरीर कापू लागते. थंडी हाडांना कापीत जाते. जणू काही शरीरातले उबदार मांसाचे थर नाहीसे झाले आहेत. दाट घट्ट आवळले जातात, अवयवांचे आकुंचन होते. पोटातूनही वाढत्या थंडीबरोबर गार गोळा उठलासा वाटतो. श्वासोच्छ्रुास एरवी कुणाला जाणवतो? पण या वातावरणात तोही जास्त थंड, जड भासतो. उबेला व सौम्य शीतलतेला सोकावलेले शरीर या सुक्या, तीव्र थंडीपासून दूर पळू पाहते. पण मन? ते आता काळोखाने दाटलेल्या थंड शांतीत एकजीव होते. पुढे दिसणाऱ्या अफाट काळोखी शांतीचा एक बिंदू म्हणजेच आपले शरीर, मन, आत्मा असे वाटते. साऱ्या भावना आटतात. क्षणभर सारे विचार थांबतात. स्वतःचे विस्मरण पडते. काळोखाच्या थंड, घनदाट आवरणासारखे हाडाच्या गाभ्यापर्यंत जाणारे शांतीचे साधन दुसरे नाही, असे मला वाटते. थंडीच्या दिवसांतले उन्ह तर हवेहवेसेच असते, पण या दिवसांतले सूर्यप्रकाशाबरोबर येणारे छायेचे खेळही मोठे गमतीचे असतात. वारे वाहत असतात. त्यामुळे झाडे, पाने सारखी हलत असतात. पाने झाडांवरून टपटप गळतच असतात. पाखरे झाडाझाडांवरून चंचलतेने उडत असतात, थव्याथव्याने गोळा होतात आणि पांगत असतात. ही सगळी दृश्ये नुसतीच पाहिली तरी मन रंजते. पण या साऱ्यांच्या निरनिराळ्या छाया जमिनीवर, घरांच्या भिंतींवर, कौलांवर, खिडकीच्या तावदानावर पडल्या की त्यातून एकाच रंगाच्या कमी-अधिक गर्द अशा काळ्या छटांच्या अतर्क्स आकृतींचे अनंत प्रकाराचे नर्तन किती रिझवणारे असते. आकृत्याआकृत्यांच्या मागे किती सूक्ष्म विनोदाची लहर पसरली आहे हे कितीजण पाहत असतील? निसर्गाच्या या वाकुल्या, हे छायानाट्य पाहणे मला फार आवडते. आकाशातले ढग पावसाळ्यात भराभर बदलणारे निरनिराळे चमत्कारिक आकार धारण करतात; भितीवरचा रंग उडत चालला की त्या उडालेल्या खपल्यांच्या विलक्षण आकृतीतून आकृत्यांचे विसंवादी अभिनव नाट्य चाललेले आपल्याला दिसते.
ढगांतले ते काल्पनिक चेहरे व ते प्रत्यक्षात कधी न दिसणारे व म्हणूनच आकर्षक वाटणारे मनः कल्पित आकृत्यांचे हावभाव या सावल्यांच्या खेळातही दिसून येतात. आणि गंमत अशी की खरोखर प्रत्यक्षात असे विचित्र आकार दिसत नसले तरी कुठल्या तरी सादृश्याला चिकटून आपण एका कुठल्या तरी परिचित वस्तूचे किंवा प्राण्याचे नाव त्या आकृतीला सहज देऊन जातो. नामरूप आमच्या जगात किती अभिन्न आहे हे या छायांचा खेळ पाहिल्यावर मला चांगले उमगून आले. (पॉप्युलर प्रकाशन संस्थेकडून साभार)