- हरीष गुप्ता
पत्रकार, विरोधी नेते आणि इतरांवर पाळत ठेवण्यासाठी पेगासस स्पायवेअर वापरल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्रपणे नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे काम गोगलगायीच्या गतीने चालले आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी खरे तर ८ आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. स्पायवेअर वापरले हे सरकारने नाकारले नाही, पण चौकशी करताना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गुप्तता भंग पावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ही सरकारची विनंती मात्र न्यायालयाने फेटाळली. या त्रिसदस्यीय समितीत आलोक जोशी हे महत्त्वाचे सदस्य आहेत. रॉ आणि नॅशनल टेक्निकल रीसर्च ऑर्गनायझेशनचे ते प्रमुख होते.
जोशी सध्या अमेरिकेत असून पुढच्या आठवड्यात परत येतील. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रवींद्रन हे समितीचे अध्यक्ष आहेत. संदीप ओबेरॉय हे तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत. २०१५ मध्ये जोशी रॉ चे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. पुढे १८ पर्यंत ते एनटीआरओचे प्रमुख होते. त्याच काळात हे स्पायवेअर आयात केले गेले. मात्र, गुप्ततेच्या शपथेचा भंग होईल म्हणून ते समितीला याबाबत काहीच सांगू शकत नाहीत.
अंतस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या समितीचे सदस्य होण्यासंबंधी विचारणा झाल्यावर जोशी यांनी सरकारची अनौपचारिक परवानगी घेतली होती. गुजरातमधले डॉ. नवीनकुमार चौधरी, केरळचे पी. प्रभाकरन आणि मुंबईचे अनिल गुमास्ते असे तीन सायबर तज्ज्ञ या समितीला मदत करतील. ल्युटियन्स दिल्लीत कार्यालयासाठी समिती जागा शोधत आहे. अजून काम सुरूच झालेले नाही. या प्रशासकीय बाबीतच ८ आठवडे जातील असे दिसतेय. अंतस्थ सूत्रे तेच सांगत आहेत. अनेकाना वाटते की हा सगळा हवेत गोळीबार आहे.
चन्नी यांनी गांधींचे मन कसे जिंकले?
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना एके काळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे डमी मानले जात होते. पण काही आठवड्यातच त्या सावलीतून बाहेर येऊन ते सामान्य माणसांचे मुख्यमंत्री झाले आहेत. पण त्यांच्या यशाचे गमक म्हणजे त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी याचे मन जिंकले. गांधीना भेटण्यासाठी ते शांतपणे दिल्लीला गेले. राहुल यांच्या नेतृत्वाखाली पंजाब निवडणुका लढल्या जातील, असे त्यांनी सांगून टाकले. राहुल आणि त्यांच्या मातोश्रीना अर्थातच हे ऐकून बरे वाटले. आपण राहुल यांच्याच मागे जावू, असे चन्नी यांनी म्हटले. आम आदमी पार्टी सामान्यांचे प्रतिनिधित्व करत नाही, सर्वसामान्यांशी त्यांना काही देणेघेणे नाही, हे आपले मतही त्यांनी मांडले. अ भा काँग्रेस समिती सध्या बरीच आर्थिक विवंचनेत आहे. त्या बाबतीतही आपण पुढाकार घेऊ, असे चन्नी सांगून आले.
कॅप्टन अमरिंदर सिंग आर्थिक बाबतीत मदत करत नव्हते. विजेचा दर तीन रुपयांनी कमी केला आणि पेट्रोल, डीझेल बरच स्वस्त करून आपण खेळी उलटवली, असे त्यांचे म्हणणे आहे. पंजाबात येत्या मार्चमध्ये होणाऱ्या विधानसभा लढतीत चन्नी यांचा पक्ष चौथ्या क्रमांकावर असेल, असे राजकीय पंडित म्हणत आले. आता ते आपले गणित पुन्हा मांडत आहेत. हे पंडित ‘आप’कडे सत्ता जाईल असे सांगत होते. दुसऱ्या क्रमांकावर अकाली-बसपा युती आणि भाजपा -अमरिंदर- धिंडसा आघाडी तिसरी असा क्रम लावला जात होता. मात्र, चन्नी यांनी सध्या तरी राजकीय पंडितांचा अंदाज खोटा ठरवला आहे, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे राजकीय पंडितांना आपला पवित्रा बदलावा लागत आहे. चन्नी यांनी खेळी उलटवली असून राजकीय पंडित तोंड लपवत आहेत.
मुख्यमंत्री झाल्यावर चन्नी भांगडा पार्टीत सामील झाले तेंव्हाच ते लोकांच्या मनात भरले. लोकांशी जवळीक साधणारे नेते अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. वेगवेगळ्या प्रसंगी लोकांमध्ये ते प्रत्यक्ष सामीलही झाले. प्रकाश सिंग बादल यांच्यानंतर लोकांमध्ये सर्वात सहज मिसळणारे ते दुसरे पंजाबी शीख ठरले. त्यांच्या यशामुळे दलित समाज आधीच खूश आहे. बसपाची मोहीम त्यामुळे पंक्चर झालीय. कॅप्टन अमरिंदर अजून फार्महाऊसमधून बाहेरच पडले नसल्याने त्यांची मोहीम सुरूही झालेली नाही.
हकालपट्टी झालेले मंत्री ओसाडगावी
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश किंवा हकालपट्टी ही तशी निरंतर चालणारी प्रक्रिया. पंतप्रधान मोदी अधूनमधून हे करतच असतात. पण १२ ज्येष्ठ मंत्र्यांना झटक्यात काढून टाकणे अभूतपूर्वच म्हणावे लागेल. दुसरे असे की, या १२ पैकी ११ जणांना अन्यत्र सामावून घेण्यात आलेले नाही. थावरचंद गेहलोत यांना कर्नाटकचे राज्यपालपद मिळाले ते भाग्यवान. बाबुल सुप्रियो शहाणे, त्यांनी भाजपा सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला. बाबुल यांनी राजीनामा दिला आहे पण, लोकसभा अध्यक्षांनी तो अजून स्वीकारलेला नाही.
एरवी रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन अशा तगड्या मंडळींना पी. पी. चौधरी किंवा जयंत सिन्हा यांना मिळाली तशी एखादी संसदीय समितीही मिळालेली नाही. सदानंद गौडा, रमेश पोखरीयाल तथा ‘निशंक’, संतोषकुमार गंगवार, हे अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत. सत्ता वर्तुळातली कुजबूज अशी की, या मंडळींना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल असे दिसतेय. काही विमानोड्डाणे करताहेत. काही निवांत बसलेत...