डॉ. प्रकाश आमटे
मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबईहून काही पाहुणे आले होते. महाराष्ट्र शासनाने वायुप्रदूषणावर काही कार्यक्रम राबविला आहे, त्याबद्दल आपणास भेटून माहिती द्यायची आहे, असा या पाहुण्यांचा हेतू होता. दुपारी ते हेमलकसा येथील माझ्या निवासस्थानी पोहोचल्यावर चहा घेत घेत ‘प्रदूषण व पर्यावरण’ या विषयावर आमच्या गप्पा रंगल्या. आलेल्या पाहुण्यांपैकी एक म्हणाले, ‘‘नागपूर येथून येताना, चंद्रपूर व गडचिरोलीला जात असल्याचे सांगताच, त्या गॅस चेंबरमध्ये चाललात का?’’ अशी त्यांच्या मित्रांनी त्यांची खिल्ली उडविली. मला मनातल्या मनात फार वाईट वाटले. गेल्या काही वर्षांत देशातील किंवा राज्यातील कोणते शहर अधिक प्रदूषित आहे, याची माहिती, आकडे आणि प्रदूषणासंदर्भातील तपशील सातत्याने जाहीर होतो आहे. त्या प्रदूषणाची कारणेही त्यासोबत मांडली जातात. त्यातून त्यावर उपाययोजना करणे शक्य होते. त्यासाठी काम करणाऱ्यांना मार्गदर्शन मिळते. अशी स्थिती असूनही प्रदूषणाचा संदर्भ देत काही शहरांचा उल्लेख थेट ‘गॅस चेंबर’ असा करणे कितपत योग्य आहे? मुंबई, दिल्ली किंवा इतर कुठल्याही शहरवासीयांसमोर त्यांच्या त्यांच्या शहरांचा असा अपमान केला असता तर ते गप्प बसले असते का? त्यावर कशी प्रतिक्रिया उमटली असती, असा प्रश्न त्या चर्चेवेळी माझ्या मनात आला. पण त्याहूनही, आपल्या या सुंदर आणि निसर्गाने नटलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांना केवळ प्रदूषणाच्या मुद्द्यावरून बाहेरचे नागरिक गॅस चेंबर असे म्हणतात, हे ऐकून जेवढे वाईट वाटले, तेवढा रागही आला. त्यामागची कारणे, वस्तुस्थिती पूर्णपणे समजून न घेता असा उल्लेख केला जातो, ही भावना त्यामागे होती.
दररोज वर्तमानपत्रात आपण वायुप्रदूषणाची माहिती, तपशील वाचतो. हे प्रदूषण भारतीय नागरिकांच्या तब्येतीवर किती आघात करत आहे, याचा तपशील आपल्यासमोर येतो. नेमक्या कोणत्या कारणांमुळे हे प्रदूषण वाढते आहे, त्यावर सतत चर्चा होते. तसेच त्यावरील उपाययोजनाही सुचविल्या जातात. सांगितल्या जातात. त्यातील सरकारी यंत्रणांच्या, स्वयंसेवी संघटनांच्या सहभागाबद्दल विस्तृत चर्चा होताना आपण पाहतो. दिल्ली व उत्तर भारताच्या काही शहरांच्या हवेत असलेल्या प्रदूषकांवरील वेगवेगळ्या घातक वायूंची आकडेवारी पाहताच आपल्याला भीती वाटते. आपला महाराष्ट्रदेखील या समस्येने ग्रस्त आहेच. देशातील दुसºया सर्वाधिक औद्योगिकीकरण असलेल्या आपल्या राज्यात ७५ हजारांपेक्षा जादा उद्योग-कारखाने आहेत. या सर्व उद्योगांवर व त्यांच्या वेगवेगळ्या उत्सर्जनाबाबतच्या माहितीवर नजर ठेवणे हे कोणत्याही यंत्रणेसाठी अवघड काम आहे. शासनाच्या वेगवेगळ्या प्रयत्नांबाबत आपण वाचत राहतो. पण या प्रयत्नांतील लोकांचा पुढाकार, सहभाग कुठे तरी कमी झालेला दिसतो, असे जाणवत राहते. दर वेळेस आपण जबाबदारी सरकारवर ढकलून देतो. सरकारकडे बोट दाखविणे ही आपली सवय झाली आहे. पण प्रत्यक्ष या उपक्रमात उतरून मेहनत करून बदल घडविण्याचा प्रयास करणारी मंडळी हल्ली खूप कमी पाहावयास मिळतात.
आलेल्या पाहुण्यांनी मग शासनाच्या स्टार रेटिंग उपक्रमाबाबत माहिती दिली. आपल्या जवळपास असणारे उद्योग किती उत्सर्जन करतात व त्यांच्या वायुप्रदूषणाची माहिती एका स्टार रेटिंग स्कीमद्वारे लोकांपर्यंत पोहोचवायचे काम हा उपक्र म करतो. खरेतर, वायुप्रदूषणाबाबतची वरवरची माहिती आपल्या सर्वांना आहेच. पण आपल्या परिसरातल्या वायूमध्ये किती व कोणती प्रदूषक तत्त्वे आहेत व त्यांच्यामुळे आपल्या शरीराची नक्की काय हानी होण्याची शक्यता आहे याबाबतची माहिती फार कमी लोकांना आहे. हीच माहिती लोकांना समजेल अशा भाषेत शासन mpcb.info या वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहे.
तसा मी कुठल्याही पक्ष किंवा राजनैतिक विचारधारेशी जोडलेलो नाही आणि जोडला जाणार नाही. पण एखादे शासन जर चांगला प्रयोग करीत असेल तर त्यात लक्ष घालून तो उपक्रम नक्की योग्य दिशेने जातोय का? मिळणारी माहिती ही बरोबर आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सरकारला भाग पाडण्यास काही हरकत नाही. नागरिक म्हणून आपली जबाबदारी ही तेवढीच आहे, जेवढी शासनाची. मग जर आपल्याला एखादा उपक्रम वायुप्रदूषणासारख्या गंभीर विषयावर भाग घेऊन नियामक मंडळ व उद्योगांबरोबर संवाद साधण्याची संधी देत असेल, तर नागरिकांनीसुद्धा सातत्याने कठीण प्रश्न विचारून या दोघांना वायुप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी भाग पाडले पाहिजे.सायंकाळी मुंबईहून आलेली मंडळी पुन: परत जायला निघाली तेव्हा मी बोललो, ‘‘या हेमलकसामध्ये आमच्या जिल्ह्याच्या लोकांची पर्यावरणाबाबत बदल घडविण्याची ताकद तुम्हाला बघायला मिळते. मला माझा जिल्हा व राज्यावर पूर्ण विश्वास आहे. पुन्हा कुठलेही शहर गॅस चेंबर आहे असे ऐकायची पाळी तुमच्यावर येणार नाही.’’ पाहुणे मिस्कीलपणे हसले व मुंबईकडील प्रवासाला निघाले. मला आशा आहे, माझ्या महाराष्ट्राचा नागरिक पर्यावरण व वायुप्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर अधिक संख्येने एकत्र येऊन आपल्या राज्याची हवा स्वच्छ करण्यास नक्की हातभार लावतील.
(लेखक ज्येष्ठ समाजसेवक आहेत)