दरवर्षीच गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटेत नानाविध विघ्ने येऊन त्यांची वाट बिकट का होते? गणेशोत्सवाच्या सहा महिने अगोदरच एस. टी. बस व रेल्वेगाड्यांचे आरक्षण संपूनही जादा एस. टी. व रेल्वे गाड्या का सोडल्या जात नाहीत? याचाच गैरफायदा घेऊन खासगी वाहतूकदार प्रवाशांची लूटमार करत आहेत. एस. टी.च्या तिकिटापेक्षा पाच ते सातपट भाडे आकारणाऱ्या खासगी वाहतूकदारांवर आर.टी.ओ. पोलीस वा तत्सम यंत्रणांकडून कडक कारवाई का होत नाही? त्यांचे या खासगी वाहतूकदारांना अभय का आहे? आणि ही लूटमार काही यंदाचीच नाही. गेली अनेक वर्षे ती बिनबोभाट सुरू आहे.
उदरनिर्वाहासाठी म्हणून मुंबई आणि घाटमाथ्यावर स्थिरावलेली कोकणातील कुटुंबे गणपतीच्या स्वागतासाठी आपापल्या गावी जायला निघतात. गणपती हा कोकणातला मोठा सण ! अगदी दिवाळीपेक्षाही मोठा ! या काळात घरी जायला न मिळालेल्या कोकणी माणसाची उलघाल समजून घ्यायची तर तुमचे कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातल्या वाडीत घर हवे, तिथे गणपतीची आरास करून त्याच्याबरोबरच तुमचीही वाट पाहणारे कुटुंब हवे, प्रसादाच्या निमित्ताने घरोघरी जाऊन भेटीगाठी घेता येतील, असे जीवाभावाचे गणगोत हवे! - ज्याच्याजवळ हे नाही, त्याला एवढे हाल सोसून हे कोकणातले चाकरमानी दर गणपतीला घरी जायला का निघतात, हे समजणे केवळ मुश्कील आहे !
गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करणार हे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आश्वासन मुंबई - गोवा महामार्गावरील धुळीसोबत हवेतच विरले आहे ! पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, माणगाव या भागांतील मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे’ जैसे थे’ च आहेत ! (खात्री नसेल तर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी एकदा आपल्या ताफ्यासह/काफिल्यासह या मार्गावर अवश्य प्रवास करावा!) रस्त्यांवरील खड्डे, एकच मार्गिका व महामार्गाची दुरवस्था यामुळे या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पाच ते दहा तासांच्या प्रवासाला दहा ते वीस तास लागत आहेत. मोठ्या हौसेने गौरी-गणपतीसाठी निघालेल्या कोकणवासीयांचे या महामार्गावरील हाल कुत्रेही खात नाही !
बरे कोकण रेल्वेने जावे तर आरक्षण संपले आहे. कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबई, ठाणे, दिवा व पनवेल या रेल्वेस्थानकांतील गर्दी पाहून ‘कोकण रेल्वे’ने कोकणवासीयांना काय दिले? असाच प्रश्न पडतो ! नाव नुसते ‘कोकण रेल्वे’ ! पण या रेल्वेमार्गावर धावणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या दक्षिण व उत्तर भारताकडे जाणाऱ्या ! सरकार कोणतेही असो-राज्य सरकार वा केंद्र सरकार किंवा कोणत्याही पक्षाचे असो ! ते फक्त कोकणवासीयांना विकासाचे गाजर दाखविते. पण प्रत्यक्षात कोकणवासीयांच्या पदरी पडते ती घोर निराशाच व अपेक्षाभंग ! निवडणूक प्रचारांत, कोकण महोत्सवात कोकणच्या निसर्गसौंदर्याचे, कोकणच्या संस्कृतीचे, कोकणी माणसाच्या स्वभावाचे गोडवे गायले जातात. पण या सर्व भूलथापाच आहेत हे आता सिद्ध झाले आहे.
कोकणात जाणारी वाट बिकट होत असताना, गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात नानाविध विघ्ने येत असताना त्याची सोडवणूक करण्यासाठी स्वतःला कोकणचे कैवारी व कोकणचे भाग्यविधाते म्हणवून घेणारे सर्वच पक्षांचे राजकीय पुढारी पुढे का येत नाहीत? की ते कोकणी माणसाच्या सहनशीलता आणि संयम संपण्याची वाट पाहत आहेत? हे विघ्नहर्त्या गणेशा, कोकणचा शाश्वत विकास करण्याची सुबुद्धी निदान कोकणातील पुढाऱ्यांना तरी मिळू दे !
- टिळक उमाजी खाडे, नागोठणे, जि. रायगड