- श्यामसुंदर झळके, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
नुकतीच भारताने अंतराळ क्षेत्रात गरुडझेप घेऊन २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग करून जगात दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश म्हणून वाहवा मिळवली व त्या ठिकाणी तिरंगा फडकावून देशाचे नाव उज्ज्वल केले. यात इस्रोच्या वैज्ञानिकांचे अलौकिक योगदान आहे. त्यामुळे चंद्राविषयी असणाऱ्या अनेक समजुती, गैरसमजुती याला आळा बसेल, अशी आशा करूया ! या आधीच भारताचे मंगळयान मंगळावरही पोहचले आहे.
याचा उल्लेख मुद्दाम अशासाठी केला, की विवाह जमवताना मंगळ व चंद्र या ग्रहांना आपल्याकडे विशेष महत्त्व दिले जाते. मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर अशी अडचण येते, की काही विचारुच नका! असे म्हणतात, की मंगळाची मुलगी असेल तर मंगळाचाच मुलगा असावा लागतो तरच लग्न जमते. आणि अशीही समजुत आहे की लग्नाची मुलगी आणि मुलगी या दोघांनाही चंद्रबळ चांगले असेल तर सर्व काही ठीक होते. त्यांचा भावी संसार सुखाचा व्हायचा असेल, तर पत्रिकेत मंगळ नसणे आणि दोघांनाही उत्तम चंद्रबळ असणे, ही आपल्या समाजात जणू पूर्वअटच आहे!
आता आपला भारत देश मंगळावर, चंद्रावर पोहचला तरी या मंगळाचे आणि चंद्राचे पत्रिकेतील स्थान मात्र अढळ आहे. - खरेतर या ग्रहताऱ्यांचा आपल्या जीवनात काडीचा संबंध नाही. लाखो किलोमीटरवरील ग्रह आपल्या जीवनात काय लुडबुड करणार ? ही शुद्ध अंधश्रद्धा आहे, याबद्दल वारंवार सांगीतले गेले आहे, तरी अगदी एरवी शास्त्रावर विश्वास ठेवणारी जाणती माणसेसुध्दा लग्नाचा विषय आला की "पत्रिका बघुया जुळते का, नंतर उगीच त्रास कशाला?"- अशी सोयीस्कर भुमिका घेतात.
खरेतर आपल्या विवेकाची कसोटी अशा प्रसंगीच लागत असते, पण कोण कुणाला सांगणार? वैज्ञानिक युगात असूनही कर्मकांडात आपण कुठपर्यंत अडकणार याचा डोळसपणे विचार करायला हवा. जोपर्यंत विवेकी विचार व वैज्ञानिक जाणीव होणार नाही तोपर्यंत आपण असेच चाचपडत राहणार का, हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. विज्ञानाने सर्व गोष्टी सिद्ध करूनही आपण फलज्योतिषाला कवटाळून बसणार का याचाही जाणत्या जनांनी विचार करावा. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी दोन्ही जोडीदारांचा परस्परांवरचा विश्वास, प्रेम आणि जुळवून घेण्याची तयारी याची गरज असते, हे कुणीही सांगेल. तिथे ग्रहतारे काय करणार? - याचे भान ठेऊन आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
एकतर विविध कारणांमुळे सध्या विवाह जुळणे हेच अवघड होऊन बसलेले आहे. त्यात हजारो मुलामुलींची लग्ने या ग्रहदशेमुळे जमत नाहीत, ही शोकांतिका आहे. कळते पण वळत नाही अशी समाजाची स्थिती आहे. विज्ञानाची पदवीधर मुले-मुलीसुद्धा पालकांच्या आग्रहास्तव पत्रिका बघतात व लग्न करण्या / न करण्याचा निर्णय घेतात. तेव्हा आपसातील नातीगोती, स्वभाव, एकमेकांची पसंती, समविचारी व कुटुंबाला विश्वासात घेऊन विवाह करण्याची गरज निर्माण झाली आहे.