काँग्रेस राष्ट्रवादीतील नाराज मंडळी मग ती दुसऱ्या फळीतील असोत की तिसऱ्या फळीतील त्यांना पक्षात घेऊन पक्षविस्तार करणे आणि त्यांच्या साहाय्याने शतप्रतिशत भाजपाचे ध्येय गाठणे असाच या पक्षाचा प्रयत्न आहे.शत-प्रतिशत भाजपा या ध्येयाने भाजपाची वाटचाल सुरू आहे. निदान त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे तरी तसे म्हणणे आहे. त्यासाठी पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हे ध्येय कसे गाठायचे? जनाधार मिळवून की, अन्य पक्षीयांसाठी आपल्या पक्षाची कवाडे खुली करून? यावर कुणीही म्हणेल की जनाधार मिळवून. पण, जनाधार मिळवायला पक्षाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करायला हवा. त्यासाठी जनतेमध्ये जायला हवे, तळागाळापर्यंत पोहोचायला हवे. यासाठी पक्षात मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते हवेत. नेमके याचीच दक्षिण महाराष्ट्रात भाजपाकडे वानवा होती, अजूनही आहे. याचमुळे अन्य पक्षांतील नाराज मंडळी हेरून त्यांना भाजपावासी करून घेण्याची मोहीम जोरदारपणे सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोमवारचा सातारा, सांगली आणि कोल्हापूरचा दौरा याचसाठी होता असे म्हणावे लागेल.२०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण महाराष्ट्रात भाजपाचे अस्तित्व शोधावे लागत होते. निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते होते; परंतु त्यांच्याकडे सत्तापदे नव्हती. तसा हा भाग सुरुवातीपासून कॉँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी हे नामाभिधान कायम होते; मात्र २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले. मोदींचा करिष्मा महाराष्ट्रासह देशभर दिसला. त्याचवर्षी आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो कायम राहिला. राज्य विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ ४६वरून १२२वर गेले. तो सर्वांत मोठा पक्ष बनला. शिवसेनेशी युती करून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. या निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रानेही भाजपाला मोठी साथ दिली. मात्र, निवडून आलेले बहुतेक नेते हे अन्य पक्षांतून आयात केलेले होते.कोणत्याही पक्षात नाराज मंडळी असतात. कुणी संधी मिळत नाही म्हणून, कुणी डावलले जातेय म्हणून, कुणी अन्याय होतोय म्हणून पक्षांतर करीत असतात. तर काहीजण सत्तेचे वारे कुणीकडे आहे हे पाहून त्यानुसार स्वत:ही सत्तेवर येणाऱ्या पक्षात सामील होत असतात. राज्यातील सत्ता हाती येताच भाजपाने अशा नेते आणि कार्यकर्त्यांसाठी जाळे टाकले. शेतकरी ज्याप्रमाणे पेरणीनंतर पीक जोमाने यावे यासाठी मशागत करतो त्याचप्रमाणे भाजपाने अशा नाराजांना संधी देऊन आपल्या पक्षाची मशागत करण्यावर, तो मजबूत करण्यावर भाजपाने भर दिला. राज्यातील एक वजनदार मंत्री कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पाटील यांनीही दक्षिण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या यशाचा आलेख चढता राहिलेला आहे. हे सर्व कशाच्या बळावर जमले तर आयारामांच्या बळावरच. सध्या भाजपाकडे कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्हा परिषदा आहेत. ३३ पैकी १३ नगरपालिकांचे नगराध्यक्ष भाजपेचे आहेत. सोमवारी त्यामध्ये इस्लामपूर आणि महाबळेश्वरच्या नगराध्यक्षांची भर पडली. शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी रान उठविलेले असताना त्याला उत्तर म्हणून भाजपाने ‘शिवार संवाद’ सुरू केला आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्याबरोबरच ग्रामीण भागात पक्ष वाढविणे हाही हेतू त्यामागे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सातारा, सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यात हेच दिसले. साताऱ्यात महाबळेश्वरच्या नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक, अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. इस्लामपुरात नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस वैभव शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी भाजपात पावन करून घेतले, तर कोल्हापुरात माजी आमदार बजरंग देसाई यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनी आपल्या समर्थकांसह भाजपाचे मफलर गळ्यात घातले.कॉँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज मंडळी मग ती दुसऱ्या फळीतील असोत की तिसऱ्या फळीतील त्यांची पार्श्वभूमी कोणतीही असो, त्यांना पक्षात घेऊन पक्षविस्तार करणे आणि त्यांच्या साहाय्याने शत-प्रतिशत भाजपाचे ध्येय गाठणे असाच या पक्षाचा प्रयत्न आहे. त्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे.- चंद्रकांत कित्तुरे -
वेध - दक्षिण महाराष्ट्रातभाजपाची मशागत
By admin | Published: June 02, 2017 12:13 AM