‘माझा मराठाचि बोलु कौतुकेंपरि अमृतातेंही पैजा जिंके ऐसी अक्षरें रसिकें...मेळवीन’अशा शब्दांत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्या भाषेचा गौरव केला ती भाषा म्हणजे अर्थात आपली माय मराठी. आपली मातृभाषा! आपण अखिल मराठी भाषकांनी या भाषेचे ऋणी असायला हवे की इतक्या वैभवसंपन्न भाषेचे आपण वंशज आहोत.मराठी साहित्य परंपरेचा मागोवा घ्यायचा झाला तर महानुभाव, नाथ, दत्त व वारकरी संप्रदायापर्यंत जावे लागेल. ज्ञानेश्वरांनी संस्कृतातील भगवद्गीतेला 'मायदेशी लेणे' चढवले. त्यानंतर चक्रधरांनी मराठीचाच आग्रह धरला. तिथपासून फुललेला मराठीचा वेलू गगनावरी उंचावत राहिला. अठरापगड जातीतील सर्वच संतांनी मराठीचा ध्वज डौलाने फडकवत ठेवला. संत तुकाराम, संत नामदेव व संत एकनाथ, नरहर सोनार, सावता माळी, चोखोबा, गोरा कुंभार, संत रामदास आदि संतांनी भक्तीचे गुणगान गाताना मराठीचे जतन, संवर्धन व संरक्षण अंत:करणापासून केले. मराठी सारस्वतांनी आपल्या शब्दलेण्यांतून मराठीच्या सौंदर्यात आणखी मोलाची भर घातली. आपल्या अभिव्यक्तीचा पहिलावहिला आविष्कार होतो तो मायबोलीतून. संस्कृतचा प्रभाव मान्य केला तरी मराठी भाषेचे सौंदर्य, त्यातील वैविध्य हे कोणत्याही भाषाप्रेमी व्यक्तीला अभिमान वाटायला लावेल असेच आहे. म्हणूनच ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्याखेरीज सुरेश भटांनादेखील राहवले नाही. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या सारस्वतांनी, अभ्यासकांनी, समीक्षकांनी मराठीचे वैभव पदोपदी वृद्धिंगत करीत नेले. हे सारे होत असताना पारशी, अरबी, उर्दू, इंग्रजी अशा विविध भाषांतील शब्दांना सामावून घेत मराठी सातत्याने श्रीमंत आणि समृद्ध होत राहिली. मराठी सारस्वतांच्या या अक्षरमांदियाळीमध्ये ज्यांचे नाव अत्यंत गौरवाने आणि आदराने घेतले जाते ते म्हणजे वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज. त्यांच्या प्रासादिक शैलीतून आणि योगदानातून त्यांनी मराठी साहित्याला एका अनुपम आणि अजरामर शिखरावर नेऊन ठेवले. या प्रतिभावंत सारस्वताच्या सन्मानार्थच २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा मराठी भाषा दिन हे झाले एक औचित्य. पण या माय मराठीच्या जपणुकीसाठी, रक्षणासाठी, संवर्धनासाठी आपण मराठी भाषक म्हणून काय प्रयत्न करतो याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आजही मराठीला हक्काचे सिंहासन नाही. अभिजात भाषेचा दर्जा नाही. इंग्रजी ही ज्ञानभाषा, जगाची भाषा आहे मान्य. त्याचे महत्त्व नाकारून चालणार नाही. ती आत्मसात करायला हवी; पण इंग्रजीच्या प्रभावाखाली मराठी भाषेमध्ये त्याचे अतिक्रमण होऊ देऊन जे भाषिक प्रदूषण आपण घडवतोय त्याचे काय? नव्या पिढीला मराठीतून बोलण्याची लाज वाटावी व मराठीतच इंग्रजी शब्द घुसडून बोलणे हे प्रतिष्ठेचे लक्षण वाटावे ही धोक्याची घंटा नाही का?मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूपुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसूंहे कवी माधव ज्युलियनांचे स्फूर्तिगीत आजही प्रेरणादायी आहे. परंतु वस्तुस्थिती अशी की, एका बाजूला मराठी पुस्तके वाचणारा वाचक कमी होत चालला आहे. अशा साऱ्या परिस्थितीत त्या मराठीची जपणूक करण्याची, जिथे जिथे शक्य आहे तिथे माथ्यावर घेऊन ही भाषा अभिमानाने मिरवण्याची, या भाषेच्या विस्ताराची, विकासाची आणि प्रगतीची सर्वार्थाने जबाबदारी आपल्या साऱ्यांची आहे. ज्या मराठी भाषेचा कंठरवाने आपण गौरव करून मोकळे होऊन जातो, त्याच भाषेच्या अस्तित्व आणि भवितव्याबाबत चिंता करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता समस्त मराठी भाषकांनी मिळून आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मराठीच्या संवर्धनात माझी भूमिका आणि जबाबदारी काय हे प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवे.‘‘मराठी भाषेवरील प्रेम हे देवघरातील समईसारखं तेवत ठेवलं पाहिजे’’ असं स्वत: कुसुमाग्रज म्हणायचे ते उगीच नाही. कुसुमाग्रजांनी ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’तून जे मांडले आहे ते लक्षात घेतले तर पुढे वेगळे काही सांगायची गरजच भासत नाही.भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे गुलाम भाषिक होऊनि प्रगतीचे शीर कापू नका...- विजय बाविस्कर
वेध - मराठी मायबोली!
By admin | Published: February 23, 2017 12:09 AM