मिलिंद कुलकर्णीभूतदया दाखविण्याचे नाटक मनुष्य अगदी उत्तमरीत्या वठवित असतो. घरात कुत्री-मांजरी पाळतो. त्यांची गोड अशी इंग्रजी नावे ठेवतो. मुलाला जेवढे प्रेमाने हाक मारत नसेल तेवढे किंवा त्यापेक्षा थोडे अधिक प्रेमळ हाक या मुक्या प्राण्यांना मारली जाते. त्यांची पुरेशी काळजी घेतली जाते. त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि अलिकडे ‘यु-ट्यूब’वरुन पाहून पोषणाची व्यवस्था आणि वैविध्य राखले जाते. पशुवैद्यकीय दवाखान्यात नियमित तपासणी केली जाते. ऋतुमानानुसार त्यांची देखभाल आणि खबरदारी घेतली जाते. आपल्या अंगणात घाण नको, म्हणून रस्त्यावर कुत्र्याला घेऊन फिरायला जाणारे प्राणीप्रेमी दिसतात. एकीकडे ‘स्वच्छ भारत’चे गोडवे गायचे, आपले अंगण लखलखीत ठेवायचे आणि रस्त्यावर घाणीसाठी पुढाकार घ्यायचा, असे दांभिक वागणे नित्याचे झाले आहे. जसे हे पाळीव प्राण्यांविषयी केले जाते, तसेच अगदी पक्ष्यांसाठीदेखील मनुष्य हा हळवा आणि संवेदनशील असतो. वेगवेगळ्या प्रकारचे देशी-विदेशी पक्षी बंगल्यात ठेवले जातात. त्यांच्यासाठी महागडे पिंजरे आणले जातात. फळे, भाजीपाला नियमित दिला जातो. ज्यांना प्राणी-पक्षी पाळणे शक्य नसते, ते त्यांची भूतदया ही मोकाट प्राण्यांचे भरणपोषण करुन प्रकट करीत असतात. कुणी बे्रड, बिस्किटे टाकतो तर कुणी कबुतरे, कावळे, चिमण्यांसाठी तांदूळ, गहू-ज्वारीचे दाणे नित्यक्रमाने ठेवत असतात.भूतदया दाखवित असताना या मोकाट कुत्र्यांपासून होणाऱ्या उपद्रवाकडे कानाडोळा केला जातो. मोकाट कुत्र्यांच्या झुंडी हैदोस घालत असतात. मांसाहारी पदार्थ विक्री करणारे हॉटेल, रेस्टॉरंटस् हे उरलेले अन्न मोकळ्या जागेत टाकून देतात. हीच स्थिती चायनीज पदार्थ विक्री करणाºया विक्रेत्यांची आहे. त्यामुळे याभागात बलदंड कुत्र्यांची फौज तयार झालेली असते. त्यांच्या आपसातील झुंजी, भररस्त्यावरुन सैरावैरा धावणे, रात्री अपरात्री केकाटणे, दुसरा कुत्रा आपल्या हद्दीत आल्यास त्याला हुसकावण्यासाठी भुंकण्याची शर्यत लावणे असे प्रकार हे वैताग आणण्यासोबतच अपघाताला कारणीभूत ठरत असतात.गेल्या पाच वर्षांत गायीविषयी आम्हाला खूपच कणव, कळवळा आलेला आहे. परंतु, रहदारीच्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणाºया गोमाता, भाजीबाजारात घुसून नुकसान करणाºया गोमाता, उकीरड्यावर आम्हीच फेकलेले प्लॅस्टिक खाणाºया गोमाता...हे दुर्देवी चित्र आम्ही बदलवू शकत नाही. गायीचे मालक गाय पाळण्याची हौस करतात, दुधदुभतं घेतात, मात्र चरण्यासाठी मोकाट सोडून देतात, हा दांभिकपणा नाही काय? परंतु, गोमातेविषयी बोलायचे नाही. तो आमच्या अभिमान आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या सहा महिन्यात एक वाघ आणि एका बिबट्याची शिकार करण्यात आली. या प्राण्यांपासून उपद्रव होत असल्याने ही शिकार करण्यात आणि वा करविण्यात आली. तेव्हा आमची भूतदया कोठे गेली. जंगलातील प्राणी आणि मानवी संबंधांमध्ये निर्माण झालेल्या ताणतणावाच्या कारणांविषयी मोकळेपणाने, परखडपणाने कोणीच बोलायला तयार नाही. गावात राहणारे तेवढे मुके प्राणी आणि जंगलात राहणारे प्राणी मुके नाहीत काय? असा भेदभाव का? भूतदया सुध्दा अशी सापेक्ष असते काय? आपल्याला फुका कळवळाच अधिक येतो, असेच म्हणायला हवे.
फुका कळवळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 1:22 PM