- विनायक पात्रुडकर
सध्या सर्वत्र भेसळ केली जाते. त्यामुळे पोषक अन्न मिळणे कठीणच झाले आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेला उतरणारा खेळाडू शारीरीकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, असा दावा कोणीच करू शकणार नाही. त्यातूनच खेळाडूंचा आकस्मित मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. घाटकोपर येथील सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच स्पर्धेत १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईलच, मात्र याआधीही खेळाडूंचा स्पर्धेदरम्यान अथवा सराव करताना मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ काही घटनांमध्ये खेळाडूची शारीरीक क्षमता कमी असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. परिणामी अशा मृत्यूमागची कारणे आता गंभीरपणे शोधायला हवीत. यातील प्रमुख कारण हे पोषक आहार न मिळणे आहे, असे नमूद केले तर वावगे ठरणार नाही. कारण सध्या बाजारात मिळणा-या बहुतांश अन्नात भेसळ केली जाते. फळ, भाज्या पिकवताना रसायनांचा अधिक वापर केला जाता. ही रसायने गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ठरतात. असे असताना पोषक आहाराचा दावा करणे नक्कीच चुकीचे ठरेल. किमान अन्न तरी भेसळ युक्त मिळणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी. शेतीवर फवारणी केली जाणारी रसायने घातक नसतील, यासाठी ठोस नियमावली तयार करायला हवी. तात्काळ उत्पादनासाठी पिकांवर प्रयोग होणार नाही, याकडेही लक्ष द्यायला हवे. तरच पोषक अन्न सर्वांना मिळू शकेल़ यासोबतच सध्या बाजारात शक्ती देणारे अनेक उत्पादने उपलब्ध आहेत़ ही उत्पादनेही तितकीच घातक आहेत. या उत्पादनांच्या अतिसेवनामुळेही खेळाडूंचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ अशा उत्पादनांच्या जाहिरातांवरही कोणाचेच निर्बंध नसते़ शक्तीवर्धक पावडर घेतल्याने शरीरसौष्ठव स्पर्धा खेळणा-या खेळाडूचा मध्यंतरी मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत संबंधित कंपनीला अन्न व औषध प्रशासनाने नोटीसही पाठवली होती. पण या प्रकरणाची दखल मर्यादीतच राहिली. पुढे व्यापक स्वरूपात यासंदर्भात कारवाई होणे आवश्यक होते. तसे घडले नाही. अशा परिस्थितीत खेळाडूंचा पोषक आहार व दर्जेदार शक्तीवर्धक उत्पादन मिळतील, याची हम्मी देता येणार नाही. त्यामुळे खेळाडूंचे असे मृत्यू वांरवार घडतच राहतील. त्याला निर्बंध घालणे आवश्यक आहे. तरच दर्जेदार खेळाडू तयार होऊ शकतील. आता जे उत्तम कामगिरी खेळाडू आहेत, त्यांनाही अधिक सक्षम करता येईल. तेव्हा घाटकोपर येथील १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर तरी सरकारने यासाठी ठोस पावले उचलायला हवीत.