पन्नास वर्षांपूर्वी पुण्यात शिकलेल्या मंडळींचं ‘गेट टुगेदर’ भरलेलं. राज्याच्या कानाकोपºयातून ज्येष्ठ नागरिक सदाशिव पेठेत एकत्र जमलेले. प्रत्येकाच्या तोंडी आपापल्या टापूतली भाषा.पुणेरी पंत : (हात जोडत) यावे बंधुंनो यावे. बापट काकांच्या बदलत्या आयटी पुण्यात आपुले मन:पूर्वक स्वागतम्.मराठवाडी भाऊ : (खिशातून चंची काढत) पन्नास वर्षांनंतरबी लेकाऽऽ तुजी ग्वाड भाषा काय बदलली नाय बग. आरंऽऽ रामराम मंडळी म्हणाया काय तुज्या बाचं जाणार हाय गड्या? आमचं बीडचं धनंजयराव बग.. आत्तापास्नंच कसं समद्यास्नी हात जोडत फिरतूया. अजून इलिक्शन लै लांब हाय.. तरीबी !कोकणी तात्या : (नाकातून हेल काढत) करून गेलो गाव अन् कांदेकराचा नावऽऽ. त्येका कशाक् तरास देतोस उगाचच. आमच्या नारायणासारखी काय नाव ठेवतास ?वºहाडी भाऊ : म्या पन् त्येच म्हंतू.. काम्हुनीऽऽ तुमी आमच्या एकनाथभौवानी इनाकारण भांडून राहिले? चला... पोटात कवापासून कावळे ओरडून राहिले!कोल्हापुरी दादा: (मिशाला पीळ मारत) चला भावाऽऽ म्या गावाकडनं डायरेक्ट पुण्यातच बुलेट आणली हाय..आमच्या चंद्रकांतदादांनी संमदे रस्ते गुळगुळीत केल्यात न्हवं. मग गाडी ताणायला लागतीय. आता झणझणीत रश्श्याचं हॉटेल हुडका. नाय तर ‘इरून फिरून गंगावेश’... पुणेकर न्यायचे आपल्याला सप्पाऽऽक श्रीखंड-पुरी खायला.सोलापुरी अण्णा : (कानडी हेल काढत) यानुबी हेळरीऽऽ पुण्याच्या पाट्या म्हणजे, लई भारी. आमचं सुभाषबापू बोलल्यावनी यल्लाऽऽ छान-छान मॅटर बघाऽऽ.मुंबईकर भाई : वॉव.. ही पाटी बघा पुण्याच्या हॉस्पिटलसमोर लावलेल्या अॅम्ब्युलन्सवाल्यांची. ‘कृपया सिरियस रुग्णांनी किमान आठ दिवस अगोदर आपल्या मृत्यूची सूचना द्यावी. पाच दिवस अगोदरच ‘पुष्पक’ शववाहिकेचे आगाऊ बुकिंग करावे. महापालिकेकडे दोनच ‘पुष्पक’ असल्यानं न सांगता कोणी गचकल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.’वºहाडी भाऊ : अन् या पाटीच्या बाजूला बगा.. कुणीतरी बारामतीकडचे कार्यकर्ते कागुद चिटकावुशान राहिले.मुंबईकर भाई : (कागद नीट वाचत) मंत्रालयात सूचना देऊनही जिथं मृत्यूनंतर न्याय मिळत नाही, तिथल्या अ‘धर्मा’च्या राज्यात आम्ही स्वत: चालत वैकुंठभूमीत पोहोचू.. मात्र, रस्त्यावरच्या टपरीवर वडापाव खाऊन आमची प्रतिकार शक्ती वाढली आहे. कृपया आम्हाला उगाच भीती दाखवू नये. (पुढच्या गल्लीत एका घरासमोर अजून एक नवीन पाटी दिसते.)पुणेरी पंत : ‘पुणे तीस’मधल्या आमच्या नेन्यांनी लेल्यांसोबत ‘काँट्रीबिशन’मध्ये ही पाटी लावलीय. ‘कृपया पुण्याच्या कबुतरांनी दुपारी एक ते चार आमच्या बाल्कनीत येऊन फडफडू नये. जे काही गुटूरगुंऽऽ करायचे असेल ते शनिवार वाड्यावर जाऊन करावे. तिथं राजकीय पक्षांना बंदी असली तरी किमान पक्षी-पक्ष्यांना तरी काहीच अडचण नाही.’टीम : (दचकून एक सुरात) पुणेरी पाट्यांच्या नावानं चांगभलं! आमचं-आमचं रेल्वे तिकीट बुक करा !! आम्हाला बासऽऽ.
कबुतरांची पुणेरी पाटी..
By सचिन जवळकोटे | Published: February 01, 2018 12:21 AM