महागुरू नारदांनी इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेला कामगार दिनाची सुटी दिल्याने तो खुश होता. (यमके म्हणजे राजकुमार हिरानी-आमीर खान यांच्या ‘पीके’चा डुप्लीकेट आमचा यमगरवाडीचा ‘एमके’ अर्थात मनकवडे! त्याला समोरच्या व्यक्तीचा हस्तस्पर्श झाला की त्या व्यक्तीचा इतिहास जाणण्याची सिद्धी ‘पीके’प्रमाणेच साध्य होती. म्हणूनच तर नारदांनी इंद्रदेवाकडे शिफारस करून त्याची इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टरपदी नियुक्ती केली होती.) आपली सुटी त्याने आपल्या यमगरवाडीला पानी फौंडेशनच्या कामावर श्रमदानासाठी देण्याचा निर्णय घेतला आणि खुशीने कुदळ-टिकाव घेऊन कामाच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यातच त्याचा फोन खणाणला! नारदांचा फोन नसावा अशी प्रार्थना करतच त्याने फोन उचलला. घडले तसेच. फोन नारदाचा नव्हता तर त्याचा डुप्लिकेट पीकेचा होता. तिकडून पीके बोलू लागला...पीके - कैसे हो भैय्या यमके?यमके - व्वा.. वाह... पीकेभैय्या तुम्ही? अलभ्य लाभ! कशी काय आठवण केलीत?पीके - मराठी भूमीत तुफान आलंय... तुम्हाला म्हाईत नही क्या भैय्या?यमके - म्हाईत कैसा नही? मै उधरच चल्या... हमारे यमगरवाडीमे श्रमदान चालू है उधर कामपेही जा रहा हूँ! पण मराठीमे बोला तो चलेगा क्या भैय्या?पीके - का नाही. आमीरभाई मराठी शिकते शिकते मुझे भी मराठी शिका गये!यमके - ते एक बरं झालं बाबा! आमच्या मराठी भूमीत आमीरभाई आणि किरणतार्इंनी १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यात पुन्हा तुफान आणलंय भावा... पण तू आज माझी आठवण का केलीस. अन् आमीरभार्इंनी तुला मला बोलायची परवानगी कशी दिली?पीके - अरे, आमीरभाई आणि किरणभाभी तुझ्याच भागातल्या गावांमध्ये स्वत: येऊन काम करताहेत. मग किरणभाभींनी मलाही बोलावून तुला भेटून माहिती घ्यायला सांगितले आहे.यमके - बाया-बापड्या म्हणू नको की लेकरं-बाळं म्हणू नको, सगळेच्या सगळे गावात पहाटंच कामावर पोहचत्यात... आणखी काय माहिती पाहिजे किरणतार्इंना?पीके - भैय्या, ते सगळं माहीत आहे भाभींना! पण नक्की कमी कुठे आहे काय, याची माहिती तुझ्याकडून पाहिजे आहे.यमके - काय राव! नेहमी चांगल्यातच काहीतरी कमी शोधायची जबाबदारी नेहमी महागुरू नारद माझ्यावर सोपवतात... आता तू पण!पीके - अरे, चांगलं काम अधिक चांगलं व्हावं यासाठीच तर ती जबाबदारी तुझ्यावर असते.यमके - हो. खरंच गावागावात माणसांनी मनापासून तुफान आणलंय... पण २२ मेनंतर या तुफानाला गावातल्या आणि भागातल्या लोकांनीच दिशा द्यायला हवी. पानी फौंडेशनने जसे गावांची निवड करताना सरपंच किंवा उपसरपंचासह गावकऱ्यांपैकीच चार जणांना श्रमदानाचे काम कसे करायचे, याचे प्रशिक्षण दिले. आता पुढे त्या गावात पाणी वितरण संस्थेसारख्या यंत्रणाची कायमस्वरूपी गावातल्याच लोकांची संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे.पीके - खरंच, भाभींना मी हे सांगतो! तुफान कायम ठेवायचे असेल तर सर्वांनी मिळून कायमस्वरूपी अशा संस्था उभ्या केल्याच पाहिजेत...- राजा माने
raja.mane@lokmat.com