विजयराज बोधनकर -नियोजनाची कला ही एक अशी महत्त्वाची बाब आहे, जिच्यामुळे रंक राव बनू शकतो किंवा नियोजनाअभावी राजा रंक बनू शकतो. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीमागे विधात्याचं नियोजन आहे. ठरल्या वेळापत्रकाप्रमाणे ऋतू येतात, काम बजावून जातात. अशा अनेक गोष्टींपासून माणसाने धडा घ्यायला पाहिजे. मानवी विकासामध्ये नियोजन हे राजमुकुटासारखी •भूमिका बजावत असते. ज्या व्यक्तीजवळ किंवा ज्या घरात नियोजनाचा अभावच अभाव असतो त्या घरात कायम दारिद्र्यच वास करीत असते. पण अत्यंत सामान्य घरात जर नियोजन अर्थातच प्लॅनींगची सवय लागलेली असेल ते घर ठरल्या वेळेत श्रीमंत होत जातं. वैचारीकदृष्ट्या सक्षम होत जातं. एका अशाच नियोजनाच्या बाबतीत शून्य असलेल्या घरी आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो. शहर नवीन होतं. आमच्या शहरापासून खूप लांब असल्यामुळे आम्ही ट्रेनचं परतीचं रिझर्वेशन करूनच ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताची परतीची ट्रेन होती. रेल्वे स्टेशनपासून ते घर तसं लांब होतं म्हणून आम्ही रात्रीच एक रिक्षावाला बुक करून ठेवायला सांगितले. त्या घरच्या प्रमुखाने रिक्षा बुक केल्याचे सांगितले. आम्ही निश्चिंत झालो. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे लवकर उठून आटोपून तयार झालो, तरीही घरातली माणसं काही उठली नव्हती. मग आम्ही घर प्रमुखाला उठविले. निवांतपणे ते उठले, आरामात विधी आटोपले, आमची तगमग चालू होती. मग हे महाशय रिक्षा शोधायला गेले. नंतर कळलं त्यांनी अगोदरच्या दिवशी रिक्षा बुक केलीच नव्हती. बराच वेळानंतर रिक्षा सापडली, पण वेळ खूप झाला. कसेबसे स्टेशनला पोहचलो, तर गाडी निघून गेली होती. आम्ही निराश झालो. पण त्या घर-प्रमुखाच्या चेहऱ्यावर कुठलीही अपराधीपणाची भावना नव्हती. लट ती व्यक्ती विनासंकोच म्हणाली, ‘चला आता घरी, मस्त दुपारचं जेवा आणि रात्रीच्या गाडीने निघा!’ पुढचा सारा गोंधळ आपल्या लक्षात आलाच असेल. ही गोष्ट तशी खूप छोटी, पण त्यावरून •भारतीयांची मानसीकता लक्षात येते. नियोजनाच्या बाबतीत अस्ताव्यस्त राहणं हा आपला स्थायीभाव असावा. घर असो वा व्यवसाय, वा देश, नियोजन नसेल तर सारं चुकतच जातं. वेळेला, कामाला, दर्र्जाला, संबधांना सुद्धा मॅनेज करावं लागतं. निष्काळजी लोकांमुळे योजनेचा धुव्वा उडतो. छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळकांनी आपलं स्वराज्य केवळ नियोजनाच्या बळावर मिळवलं हे सांगायला हवं का? नियोजन हासुद्धा अध्यात्माचाच एक महत्वाचा भाग आहे.
नियोजन आणि गोंधळ
By admin | Published: June 27, 2015 12:30 AM