मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली आणि सरकार स्थापनेच्या पावणे चार वर्षांनी का होईना विदर्भ विकास मंडळाला आमदार चैनसुख संचेती यांच्या रूपात अध्यक्ष मिळाला. वेगळ्या विदर्भाचे छातीठोकपणे समर्थन करणाºया, विदर्भ विकासाचे शिलेदार म्हणवणाºया भाजपाची राज्यात एकहाती सत्ता असतानाही विदर्भ विकास मंडळाला गेली पावणे चार वर्षे अध्यक्षच मिळाला नाही, हा चिंतेचा अन् चिंतनाचा विषय आहे. विशेष म्हणजे पक्षांतर्गत कोंडींत अडकलेल्या विरोधकांनाही या मुद्यावर भाजपाची कोंडी करता आली नाही. भाजपाची कोंडी झाली ती पक्षांतर्गत इच्छुकांकडून आणि शेवटी मंडळाला अध्यक्ष मिळाले. एखाद्या मंडळाला अध्यक्ष नाही, म्हणून विकास रखडला का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. याचं उत्तर नक्कीच नाही, असं राहील. कारण विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मात्र, या वेळीच अध्यक्ष नेमला तर या विकासाच्या प्रक्रियेला दुप्पट वेगाने गती मिळाली असती हे देखील नाकारता येत नाही. वैधानिक विकास मंडळ हे पांढरा हत्ती ठरल्याची राजकीय टीका होत असली तरी विदर्भ विकासाच्या नियोजनात या मंडळाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, हे नाकारून चालणार नाही. याच मंडळाच्या अभ्यासातून पुढे आलेल्या आकडेवारीच्या आधारे आताच्या सत्ताधाºयांनी तेव्हा विरोधकांच्या भूमिकेत असताना सरकारला आरसा दाखविण्याचे काम केले होते, हे ही विसरता येणार नाही. माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांनी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विदर्भाच्या हक्कासाठी लढा दिला. या मंडळाच्या माध्यमातून जीव ओतून त्यांनी विदर्भाचा आवाज बुलंद केला. विदर्भाचा अनुशेष, मिळालेला निधी, प्रत्यक्षात झालेला विकास याचा लेखाजोखा सरकारसमोर मांडून विदर्भाचा खरंच किती विकास झाला याची जाणीव वेळोवेळी सत्ताधाºयांना करून दिली. तीच अपेक्षा आता या मंडळाकडून आहे. या मंडळातील तज्ज्ञ मार्गदर्शक अभ्यास करून सरकारला विविध सूचना करतात. शिफारशी करतात. त्यावर सरकारने एक नजर फिरवून अंमलबजावणी करण्याचीही गरज आहे. चैनसुख संचेती यांच्या रूपात एक अनुभवी नेत्याच्या हाती विदर्भ विकासाची धुरा सोपविण्यात आली आहे. ते आता आपल्या नियोजनातून विदर्भालाही सुखाचे दिवस आणतील, एवढीच अपेक्षा आहे.
विदर्भ विकासाचे नियोजन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:30 AM