- चंद्रकांत कित्तुरेएखाद्याला नवजीवन किंवा संजीवनी देण्यासाठी अमृत दिले जाते, पण हेच अमृत (?) कोवळ्या झाडांच्या जीवावर उठले आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत राज्यभरात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्यासाठी महापालिका, नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेने अमृत योजनेतून मिळालेल्या निधीतून जी काही कामे सुरू केली आहेत त्यामध्ये भरउन्हाळ्यातील वृक्षारोपणाचा समावेश आहे. पुणे येथील निसर्ग लँडस्केप सर्व्हिसेस या कंपनीमार्फत मंगळवार पेठेतील बेलबाग परिसरातील २७ गुंठ्यातील २० गुंठे जमिनीत दोन फुटांचे अंतर न ठेवता आठ-दहा फूट उंचीची सुमारे एक हजार झाडे लावण्यात आली आहेत. दोन झाडांमध्ये किती अंतर असावे याचे निकषही पाळले गेलेले नाहीत. वड-पिंपळ यासारख्या झाडांचेही अशा पद्धतीने रोपण करण्यात आले आहे. पूर्णपणे अशास्त्रीय पद्धतीने हे वृक्षारोपण सुरू आहे. शास्त्रीयदृष्ट्या दोन झाडांमधील अंतर ८ ते १० फुटांचे आवश्यक असते. मात्र, येथे एक फूट चौरस अंतरामध्ये चार-चार झाडे लावण्यात आली आहेत. बरे, भरउन्हाळ्यात लावलेली झाडे जगतील का, याचा साधा विचारही ही झाडे लावताना केला गेला नाही. कोल्हापूर महापालिकेची वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समिती आहे. या समितीमधील तज्ज्ञांचाही सल्ला या कामासाठी घेतला गेला नाही. काम केल्याचे दाखवायचे आणि निधी खर्ची टाकायचा याचसाठी हे केल्याचे दिसते.‘लोकमत’ने या साऱ्या प्रकाराबाबत आवाज उठविल्यानंतर नियमानुसार सर्व काही सुरू असल्याचा खुलासा महापालिकेतर्फे करण्यात आला, पण प्रत्यक्ष वृक्षारोपणाच्या ठिकाणी भेट दिली असता वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे लक्षात येते. महापालिकेच्या आयुक्तांनीही या वृक्षारोपणाची पाहणी करून झालेल्या चुका तात्काळ सुधारण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर यापुढे वृक्षारोपण करताना वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समितीसह सर्वांच्या सहमतीनेच ते करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.२०१५-१६ या वर्षातही अमृत योजनेंतर्गत कोल्हापूर शहरात महापालिकेतर्फे एक कोटी रुपये खर्च करून झाडे लावण्यात आली आहेत. त्यातील किती झाडे अस्तित्वात आहेत हा संशोधनाचा विषय आहे. २०१६-१७ साठीही एक कोटी ६० लाख रुपये खर्च करून बेलबागेसह तीन ठिंकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. एकीकडे पर्यावरण रक्षण आणि वृक्षारोपणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये दिले जात असताना या योजनांची कशी वाट लावली जाते, याचे हे ठळक उदाहरण म्हणावे लागेल. राज्यात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाते. त्यामधील किती जगतात, यावर नेहमीच चर्चा झडत असते. त्याची कारणे काहीही असली तरी कोल्हापूर महापालिकेचे भरउन्हाळ्यातील हे वृक्षारोपण म्हणजे अमृताला विष बनविण्यासारखे आहे.
‘अमृता’ला विष बनविणारे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 3:33 AM