पाताळयंत्री घरभेद्यांनी केली काँग्रेसची दुर्दशा, वास्तवाशी नाते नसलेल्या नेत्यांकडून नेतृत्वाची दिशाभूल
By विजय दर्डा | Published: August 30, 2020 08:49 PM2020-08-30T20:49:31+5:302020-08-31T06:40:26+5:30
आता एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला, पण काँग्रेस पक्षाला अद्याप कायमस्वरूपी अध्यक्ष मिळालेला नाही.
- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
लोकशाही व धर्मनिरपेक्षतेवर श्रद्धा असलेल्या कोणाही व्यक्तीच्या दृष्टीने काँग्रेसची सध्याची दुर्दशा हा दु:खद विषय आहे. निकोप लोकशाहीसाठी प्रबळ विरोधी पक्ष खूप गरजेचा असतो. अन्यथा वचक ठेवायला व जाब विचारायला कोणी नसल्याने सरकार हुकूमशाही वृत्तीने वागू लागते. लोकशाही विचारांचा मी खंदा समर्थक असल्याने काँग्रेस पक्ष प्रबळ असणे ही काळाची गरज आहे व ते राष्ट्राच्याही हिताचे आहे, असे मी या स्तंभातून सातत्याने आग्रहपूर्वक लिहित आलो आहे.
आता एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला, पण काँग्रेस पक्षाला अद्याप कायमस्वरूपी अध्यक्ष मिळालेला नाही. सन २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतरही जवळपास तेवढाच काळ गेला; पण पुढील मार्गक्रमणाचा पक्षाने अद्याप विचार केलेला दिसत नाही. या संदिग्धतेमुळे पक्षातील तरुण पिढीच्या नेत्यांचा अपेक्षाभंग होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. सचिन पायलट यांचा बंडाचा झेंडा उभारून झाला आहे. खरे तर आता अशोक चव्हाण, संदीप दीक्षित, मिलिंद देवरा, जतीन प्रसाद यांच्यासारख्या तरुण नेत्यांनी आघाडीवर असायला हवे होते; पण ते सर्व उपेक्षित आहेत. पक्षात नेतृत्वाची नवी फळी चटकन तयार होत नाही. त्यासाठी कित्येक वर्षे लागतात, देशावर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाला एवढेही कळू नये, याचेच आश्चर्य वाटते.
जी काँग्रेस पूर्वी संपूर्ण देशाचा श्वास होती ती उत्तर प्रदेशात गेली ३१ वर्षे, प. बंगालमध्ये ४३ वर्षे, तामिळनाडूत ५३ वर्षे, बिहारमध्ये ३० वर्षे, ओडिशात २० वर्षे, तर गुजरातमध्ये २५ वर्षे सत्तेबाहेर का रहावी? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश हे तर भक्कम बालेकिल्ले! पण तेही काँग्रेसने गमावले. मध्य प्रदेशात १५ वर्षांनी का होईना काँग्रेस पुन्हा सत्तेत आली खरी; पण १५ महिनेही ती सत्ता टिकवू शकली नाही! कारण काय तर... अंतर्गत भांडणे! अपरिपक्व लोकांच्या हाती सूत्रे गेली की, आणखी दुसरे काय होणार?
आता काही प्रश्न उपस्थित होतात; गेल्या २३ वर्षांपासून काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक का घेण्यात आली नाही? सन २००९ मध्ये लोकसभेतील २०६ जागा जिंकणाºया या पक्षावर २०१४ मध्ये ४४ व २०१९ मध्ये ५२ जागांची नामुष्की का यावी? या प्रश्नांची उकल करावी, तर असे दिसून येईल की, सन २००४ ते २००९ दरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारचा कार्यकाळ चांगला राहिला. रोजगार हमी योजना, शिक्षणहक्क कायदा, अन्नसुरक्षा व माहिती अधिकार अशी मोलाची कामे या काळात झाली. या पाच वर्षांत लोक काँग्रेसवर खुश होते; परंतु त्यानंतरच्या २००९ ते २०१४ या दुसºया कालखंडात एकापाठोपाठ एक घोटाळ्यांचे आरोप झाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, २ जी स्पेक्ट्रम, कोळसा खाण, आदर्श सोसायटी, रेल्वे घोटाळा यासारख्या प्रकरणांमध्ये सरकार गुरफटत गेले. पक्षाने स्वत:लाच आरोपीच्या पिंजºयात बसवून घेतले. त्या काळात काँग्रेसने अनेक केंद्रीय मंत्री तसेच राज्यांचे मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांना नारळ दिले. यामुळे खरेच सरकार भ्रष्ट व अकार्यक्षम असल्याची धारणा लोकांच्या मनात निर्माण झाली.
खरे तर या सर्व प्रकरणांमध्ये संसद व लोकांपुढे वास्तविकता ठामपणे मांडण्यात काँग्रेस कमी पडली. हे सर्व सोनिया गांधींना अंधारात ठेवून केले जात होते व मनमोहन सिंग यांना मुद्दाम अडचणीत आणले जात होते. पक्षात वरिष्ठ पदांवर बसलेली मंडळीच हे सर्व करत होती. त्यावेळी भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्याने मला असे बोलूनही दाखविले होते की, ‘ काँग्रेसवाल्यांना झाले आहे तरी काय? विरोधी पक्ष म्हणून विषय मांडणे, विरोध करणे हे आमचे काम आहे. ते आम्ही करतो; पण त्यास आत्मविश्वासाने सामोरे जाण्याऐवजी काँग्रेसने बॅकफूटवर जावे, याचे आश्चर्य वाटते!’
सोनियाजींबद्दल बोलायचे तर त्यांनी आपल्या पातळीवर काँग्रेसचे उत्तम नेतृत्व केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस दोनदा सत्तेत आली. सोनिया गांधींनी स्वत: आघाडीवर राहून पक्षाला दिशा दिली. त्यांनी जी धोरणे आखली त्याने पक्षाला मतेही मिळाली. सन २००४ मध्ये ‘संपुआ’ने देऊ केलेले पंतप्रधानपद विनयाने नाकारून सोनियाजींनी त्यागाचे आदर्श उदाहरण घालून दिले; परंतु काँग्रेसवाल्यांनी आपसात भांडून त्या त्यागाचीही माती केली.
भाजप राहुल गांधींना कोंडीत पकडत होते तेव्हाही पक्षातील या कारस्थानी मंडळींना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. राहुल गांधी नेते म्हणून यशस्वी झाले तर आपली खूप अडचण होईल, या भयगंडाने ग्रासलेल्या भाजपने राहुल गांधी याची जेवढी नकारात्मक प्रतिमा निर्माण करता येईल तेवढी केली. त्यावेळी राहुल गांधींच्या भोवती ज्या तरुण नेत्यांचे कोंडाळे होते ते फाडफाड इंग्रजी तर बोलू शकत होते, पण राजकारणात त्यांचे पाय जमिनीवर नव्हते. त्यामुळेच केवळ ट्विटरवर टीका-टिप्पणी करणारा नेता असे राहुल गांधींचे चित्र भाजप उभे करू शकली. राहुल गांधी तरुण आहेत त्यामुळे युवा पिढीला त्यांचे आकर्षण वाटायला हवे होते; पण तसे झाले नाही, यात नरेंद्र मोदी मात्र यशस्वी झाले. त्यावेळी पक्षातील काही लोकांनी मनमोहन सिंग यांना एवढे जेरीला आणले की, राहुल यांनीच पंतप्रधान व्हावे, असा प्रस्ताव सिंग यांनी मांडला. पण राहुल गांधी यांनी त्यास नकार दिला. नंतर त्यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेता व्हायलाही नकार दिला. यामुळे त्यांची नेमकी क्षमता लोकांपुढे आली नाही.
शीर्षस्थ नेतृत्वाला भ्रमात ठेवण्यात पक्षातील पाताळयंत्री नेहमीच सफल होत आले आहेत, असे म्हणणे मुळीच वावगे ठरणार नाही. ज्यांचा जमिनीवरील वास्तवाशी दुरान्वयानेही संबंध नाही, असे लोक पक्षात नेते म्हणून मिरवू लागले. यामुळेच अनेक माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तसेच माजी आमदार-खासदार काँग्रेस सोडून भाजप किंवा अन्य प्रादेशिक पक्षांमध्ये गेले. आज मुख्य काँग्रेससोबतच महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल, एनएसयूआय व इंटक यासारख्या पक्षांच्या शाखा, संघटना पूर्णपणे प्रभवहीन झाल्या आहेत. प्रत्येकाला फक्त खुर्चीची हाव आहे. इंदिराजींची १०० वी जयंती कधी आली व गेली हे समजलेही नाही.
पातळी एवढी खालावली की, उत्तर प्रदेशमधील एका सदस्याने राज्यसभेत राजीव गांधी यांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न केला तेव्हा जया बच्चन यांनी त्याचे तोंड बंद केले; पण काँग्रेसचे नेते शुंभासारखे नुसते ऐकत बसले होते! या उलट रा. स्व. संघ व भाजपने आपल्या सर्व संघटना पद्धतशीरपणे बळकट केल्या. नरेंद्र मोदींसोबतच आपल्या विचारप्रणालीच्या महापुरुषांची उजळ प्रतिमा देश-विदेशात निर्माण करण्यात त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. त्यांचा तो हक्क आहे, हे नाकारता येणार नाही; पण हे सर्व काँग्रेस का करत नाही, हा खरा प्रश्न आहे! मला वाटते की, घरात कोणीच खरे बोलत नसल्याने सर्वच दिशाभूल झाल्याच्या अवस्थेत आहेत. सर्वजण स्वप्नांच्या दुनियेत वावरत आहेत. बघता बघता भाजपने संपूर्ण भारत केव्हा काबिज केला हे काँग्रेसला कळलेही नाही; पण अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही जागे व्हाल तेव्हाच उजाडले, असे म्हणतात ते खरेच आहे! काँग्रेसने पुन्हा दणकटपणे उभे राहणे भारतीय लोकशाहीसाठी नितांत गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसला तरुण नेतृत्त्व शोधावी लागेल व ज्यांना जमिनीवरील वास्तवाचे भान आहे अशा लोकांची टीम नव्या अध्यक्षाच्या जोडीला द्यावी लागेल. शक्य होईल तोपर्यंत सोनियाजींनी काँग्रेसला मार्गदर्शन करत राहायला हवे. अखेर आज त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायही नाही.