- प्रा. मिलिंद जोशी(कार्याध्यक्ष, म. सा. परिषद)‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे,फुलाफुलात येथल्या उद्या हसेल गीत हे’,असं आपल्या कवितेतून सांगणाऱ्या शांताबाई शेळके यांची ही एक फार सुंदर आठवण. महाविद्यालयीन जीवनात प्रा. श्री. म. माटे, के.ना.वाटवे आणि रा.श्री. जोग यांच्यासारखे गुरू, फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्या आणि रविकिरण मंडळातील कवींच्या कविता यांनी भारावलेल्या काळात शांताबाईंचा लेखन प्रवास सुरु झाला. एम. ए. झाल्यानंतर शांताबाई मुंबईला येऊन वृत्तपत्र व्यवसायात शिरल्या. ‘नवयुग’ साप्ताहिकात काम करू लागल्या. स्तंभलेखन, मुलाखती , इंग्रजी लेखनाचे अनुवाद , सभेचा वृत्तांत , गरजेनुसार किमान वाचनीय मजकूर ऐनवेळी तयार करणे, पुस्तक परीक्षणे असे नाना तऱ्हेचे लेखन करण्याची सवय या काळात शांताबाईंना लागली. प्रतिभा, स्फूर्ती, मूड लागणे, लेखनाची बैठक जमणे याखेरीजही लिहिता येते हे जाणवले. प्रौढ, विदग्ध आणि संस्कृतप्रचुर भाषाशैलीचे खूप आकर्षण असलेल्या शांताबाईंच्या लेखनाचे संस्कृत वळण अत्र्यांनी पार बदलून टाकले. ‘नवयुग’ मधली नोकरी सोडल्यावर अर्थार्जनासाठी ‘हंस’च्या अंतरकरांनी दिलेला इंग्रजी चित्रपटांच्या कथांच्या अनुवादाचा प्रस्ताव शांताबाईंनी स्वीकारला. त्यातून अनुवादाची एक नवी वाट त्यांना सापडली. पुढे त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. ‘पुण्यातून मुंबईला गेल्यानंतर विहिरीतून समुद्रात जावे असा अनुभव मी घेतला’, असे शांताबाईंनी म्हटले आहे. फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्या आणि रविकिरण मंडळाची कविता यांच्याभोवतीच फिरणाऱ्या शांताबाईंच्या अभिरुचीला मुंबईतल्या वास्तव्याने प्रगल्भ आणि विकसित केले. कवितेशी असलेले शांताबाईंचे नाते सर्वांत जवळचे ! रविकिरण मंडळाच्या प्रभावातून बाहेर पडल्यावर त्यांची कविता अधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रयोगशील होत गेली. चित्रपटासाठी गाणी कशी लिहावीत, याचा वस्तुपाठ त्यांना भालजी पेंढारकरांनी दिला. भालजींच्या ‘स्वराज्याचा शिलेदार’साठीची गाणी जमेनात म्हणून शांताबाई आल्या तेव्हा भालजी त्यांना म्हणाले, सिनेमाची गाणी अगदी सोपी हवीत. आपण एकमेकांशी बोलतो आहोत, अशा भाषेत लिहा. आपोआप सुचेल !’’- त्यानंतर चित्रपटासाठी कितीतरी अविस्मरणीय गीते शांताबाईंनी लिहिली. हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्यांची सर्वांत गाजली आणि लोकप्रिय झाली ती कोळीगीते ! ‘माझिया शब्दांवरी माझा ठसा माझा ठसाहे शब्द माझे चेहरे अन् हे शब्द माझा आरसा ..’असं म्हणणाऱ्या शांताबाईंचा ठसा त्यांच्या सर्वच लेखन प्रकारांवर उमटलेला आहे.‘माझे लेखन कशासाठी?’ या आत्मपर लेखात शांताबाई म्हणतात, ‘‘जगण्यासाठी मी जी धडपड केली, तिच्या खालोखाल साहित्यासाठी मी धडपडत राहिले. आणि कित्येकदा तर, साहित्यच मला जगण्यासाठीही उपयुक्त ठरले. साहित्याइतके दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने मला कधी भारून टाकलेले नाही. बालपणापासून मी शब्दांच्या प्रेमात पडले. शब्दांनी नादावून गेले. शब्दांशी खेळत राहिले. नदीच्या मुखातून समुद्रात शिरावे तसे, मी लिपी ओळखू लागण्याच्या आधी ऐकलेल्या शब्दांच्या द्वारा अर्थांच्या साम्राज्यात प्रविष्ट झाले. शहरांतूनच पण, शहरांच्या पलीकडे जावे, असे मला वाटते. शब्द हा मला जगाशी जोडणारा सर्वांत मोठा दुवा आहे. माझ्या कवितेतून चाललेला हा, माझा आणि माझ्या संदर्भात जगाचा शोध कधीच संपू नये, असे मला वाटते.’’शांताबाई म्हणत, ‘‘या माझ्या दीर्घ लेखन उद्योगाची फलश्रुती काय?, किती यश पदरात पडले?, शेवटी मी काय कमावले?, काय गमावले?, आणि यश म्हणजे तरी नेमके काय?, माझ्या दृष्टीने या प्रश्नांना फारसे महत्त्व नाही. महत्त्व आहे ते, माझ्या छंदांचे ; आनंद आहे, कृतार्थता आहे ती, त्याच्या अखंड साधनेत, सततच्या पाठपुराव्यात. हा पाठपुरावा कधीही संपू नये, असे वाटते..’’- शांताबाई आयुष्यभर हा पाठपुरावा करत राहिल्या.joshi.milind23@gmail.com
कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष:... असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 5:52 AM