किरणकुमार जोहरे । हवामान तज्ज्ञखरंतर दर तासाला पडणाऱ्या पावसाचे वर्गीकरण केल्यास कोणत्या तासात किंवा तासाच्या भागात किती मिलीलीटर पाऊस झाला हे भारतीय हवामान खात्याला नीट सांगता येऊ शकते. १०० मिलीमीटर प्रति तास या वेगाने कोसळणाºया पावसाला ‘ढगफुटी’ म्हणजे ‘क्लाउडबस्ट’ म्हणतात असा अधिकृत उल्लेख हवामान खात्याच्या अनेक अहवालांत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरदेखील तो तसा २०१० सालापर्यंत उपलब्ध होता.
चोवीस तासांत ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त कोसळणाºया पावसाला हवामान विभाग ‘अतिवृष्टी’ म्हणत आहे. महाराष्ट्रात ढगफुटी झाली तरी त्याला अतिवृष्टी असा शब्दप्रयोग करीत हवामान खाते त्याचे गांभीर्य कमी करते. शिवाय ढगफुटी झाली की हा २४ तासांत झालेला पाऊस आहे असे सांगून हवामान खाते त्याची तीव्रता कमी करीत जनतेची दिशाभूल करीत आपली जबाबदारी झटकते.
हवामान शास्त्र विभागाकडून ढगफुटीची लपवाछपवी करण्यामागे काही निश्चित हेतू आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ढगफुटी मान्य केली तर ती होण्याआधी सूचना का दिली नाही, असा थेट प्रश्न जनता विचारू शकते याची धास्ती हवामान संशोधन केंद्राला असते. त्यामुळे कोंबडे झाकून ठेवण्याचा हवामान खात्यातील संचालक मंडळी आटोकाट प्रयत्न करतात. तसे केल्याने दोन फायदे होतात. एक ढगफुटीची सूचना देता आली नाही हा नाकर्तेपणा लपविता येतो. दुसरा फायदा ढगफुटीची सूचना देण्यासाठी जनतेच्या खिशातील पैशातून खरेदी केलेल्या अब्जावधी रुपयांच्या रडारांनी काय काम केले किंबहुना काम का नाही केले, या प्रश्नाचे उत्तर देण्याची हवामान खात्याला गरज भासत नाही.
६५ मिलीमीटरपेक्षा पाऊस म्हणजे ‘जास्त पाऊस’ (हेवी रेन), ६५ ते १२५ मिलीमीटरपेक्षा पाऊस म्हणजे ‘खूप जास्त पाऊस’ (व्हेरी हेवी रेन), तर २५० मिलीमीटरपेक्षा पाऊस म्हणजे ‘अत्यंत जास्त पाऊस’ (एक्स्ट्रीम हेवी) अशी संकल्पना हवामान खाते (आयएमडी) वापरते. ही पद्धती संदिग्ध, अपुरी, सदोष व गोंधळात टाकणारी आहे. त्याऐवजी चोवीस तासांतील कोणत्या तासात पाऊस झाला, दरतासाला किती मिलीमीटर पाऊस झाला हे वर्गीकरण हवामान खाते नागरिकांना सांगू शकले तर ते हवामान खात्याचे मोठे यश असेल. कारण दररोज व चोवीस तास सलग असा पाऊस क्वचितच एखाद्या ठिकाणी कोसळतो. शासकीय नियमाप्रमाणे एकाच दिवशी अथवा ठरावीक काळात ६५ मिमी पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी झाल्याचे निकष लागू होतात. मात्र ६५ मिलीमीटरपासून एक हजार मिलीमीटरपेक्षाही जास्त असा कितीही पाऊस झाला तरी हवामान खाते त्याला ‘अतिवृष्टी’ असेच गोंडस नाव देत आपली जबाबदारी झटकते. परिणामी, जनतेलाच काय पण शासनालादेखील अतिवृष्टी म्हणजे नेमका किती पाऊस पडणार याची कल्पना येत नाही आणि आपत्कालीन नियोजनबद्ध ठोस निर्णय घेता येत नाही.
ढगफुटी झाली तर तशी मान्य करायला हवी, असा साधा आग्रह हवामान खात्याला मान्य नाही. हवामान विभाग नागरिकांना स्पष्ट सूचना देण्यापेक्षा दिशाभूलच करीत आहे. अतिवृष्टी, महावृष्टी आणि ढगफुटी या संकल्पनांबाबत जनमानसात कमालीचा गोंधळ आहे. हवामान खात्याने याबाबत दुटप्पी धोरण अंमलात आणले आहे. प्रशासन आणि हवामान खाते यांच्यात आजही समन्वय नाही. अनेक देशांमध्ये तासानुसार हवामानाचे बदल दिले जातात. हवामानाचा नेमका अंदाज इस्रायल, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका; तसेच अन्य पाश्चात्त्य देशांमध्ये बांधला जातो. जपान, तैवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी अनेक देशांत हवामानाची माहिती नागरिकांना अगदी अचूक मिळते. आपले हवामान खाते करोडो रुपयांचे डॉप्लर रडार असूनदेखील अशी माहिती देऊ शकत नाही. याचे कारण स्थानिक हवामानानुसार या रडारवर झेड म्हणजे परावर्तन निर्देशांक व आर म्हणजे पाऊस हे पॅरामीटर सेट नाहीत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे २६ डॉप्लर रडार आहेत. अब्जावधी रुपये खर्चून उभारलेल्या डॉप्लर रडारचा डाटा या विभागाच्या वेबसाईटवर दर १० मिनिटांत अपलोड होत असतो. महाराष्ट्रात भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुंबई व नागपूर येथे, तर भारतीय उष्णदेशीय हवामान शास्त्र संस्थेचे पुणे येथे असे २५० किलोमीटर रेंजचे डॉप्लर रडार आहे. याशिवाय अनुक्रमे सोलापूर व औरंगाबाद येथे ढगांत किती पाणी, बाष्प आहे याचा प्रभावी वेध घेणारी यंत्रणा आहे. ही यंत्रणा सज्ज करून वापरली तर मुंबईत लोकलने रोज प्रवास करणाºया सुमारे ६० लाख नागरिकांचे अतोनात हाल झाले नसते.