>> संदीप प्रधान
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकमेकांचे चांगले स्नेही असले तरी राजकीय प्रतिस्पर्धी होते. महाराष्ट्राची अस्मिता हा दोघांमधील समान धागा होता. बाळासाहेबांचे संपूर्ण राजकारण हेच अस्मितेचे राजकारण होते. पवार यांनी दिल्लीतील सत्तेला आव्हान दिले व महाराष्ट्राच्या अस्मितेचे दर्शन घडवले. मात्र ठाकरे यांनी पवार यांच्यावर टीकाटिप्पणी करण्याची एकही संधी सोडली. विशेष करून शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत ठाकरे यांनी आपले ‘दिलदार शत्रू’ (हा बाळासाहेबांचाच शब्द) पवार यांचा समाचार घेतला नाही, असे फारच क्वचित झाले आहे. ठाकरे यांच्या पश्चात त्याच मुखपत्रात तशीच पवार यांची मॅरेथॉन मुलाखत प्रसिद्ध व्हावी हा वेगळा योगायोग आहे. बाळासाहेबांची मुलाखत ही शिवसैनिकांकरिता दिशादिग्दर्शन करणारी असायची. पवार यांची मुलाखत त्यांच्या भविष्यातील राजकीय पावलांबाबत संदिग्धता निर्माण करणारी आहे.
जेव्हा देशभर काँग्रेसची सत्ता होती तेव्हा काँग्रेस राज्याराज्यातील प्रादेशिक पक्षांना क:पदार्थ मानत आली. अनेकदा छोट्या पक्षांची सरकारे काँग्रेसने बरखास्त केली आहेत. काँग्रेसमधील राज्यांतील नेत्यांना पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याकरिता तिष्ठत राहावे लागायचे. गेल्या सात वर्षांत काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. केंद्रातील भाजप सरकारचे नेतृत्व तीच ‘काँग्रेसी’ प्रवृत्ती आचरत आहे. महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात केला गेलेला महाविकास आघाडीचा प्रयोग हा भाजपच्या त्याच ‘हम करेसो कायदा’ प्रवृत्तीला आव्हान देण्याचा प्रादेशिक पक्षांचा प्रयत्न आहे. काँग्रेसला या प्रयोगामागे फरफटत यायला लागणे हा त्यांच्याबाबत झालेला काव्यगत न्याय आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश व आता राजस्थान येथील विरोधी पक्षाची सरकार फोडाफोडी करुन खालसा करण्याच्या भाजपच्या कार्यपद्धतीला महाविकास आघाडीचे सरकार हा वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मुखपत्रातील पवार यांची खा. संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत हा या सरकारबाबतच्या अफवा, अर्धसत्य बातम्या यांचा खुलासा करण्याचा प्रपंच आहे हे उघड आहे.
तुम्ही हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांनीच सांगितला आपला 'रोल'
'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण
राज्यातील सरकारमधील नेमक्या विसंगती व वादाच्या कारणावर पवार यांनी मुलाखतीत नेमके बोट ठेवले आहे. शिवसेनेत नेत्याने आदेश द्यायचा व सैनिकांनी त्याचे अनुकरण करायचे हा शिरस्ता आहे. मात्र दोन्ही काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया ही शिवसेनेसारखी नसून चर्चा, संवाद या माध्यमातून होणारी आहे. सध्याचे सरकार हे एका पक्षाचे सरकार नाही. त्यामुळे मित्रपक्षांसोबत संवाद हवा हे पवार यांनी मोठ्या खुबीने उद्धव यांना सुनावले आहे. शिवाय उद्धव यांच्या डोळ्यात अंजन घालताना युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यपद्धतीचा दाखला पवार यांनी दिला आहे. अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना पवार यांनी बाळासाहेबांशी सुसंवाद होता. शिवसेनेच्या आताच्या नेतृत्वापेक्षाही अधिक सुसंवाद होता, असे जाहीर करून टाकले आहे. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधी चालत नाही. रिमोटवर सरकार चालवणे आपल्याला मान्य नाही, असे पवार यांनी पुतिन यांचे उदाहरण देत स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्धव यांना शिवसेनेची जुनी कार्यपद्धती बदलण्याचा व सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा सल्ला पवार यांनी दिला आहे. आता पवार यांनी दिलेला हा सल्ला ‘मातोश्री’ कसा व किती गांभीर्याने घेते, याकडे पहावे लागेल.
उद्धव ठाकरेंच्या कामात काही उणीव नाही, पण...; स्थिर सरकारसाठी शरद पवारांची मोठी सूचना
सहामाही परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास की नापास?; शरद पवारांनी सांगितला निकाल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पवार यांनी सत्ता स्थापन करण्याकरिता दोनवेळा प्रस्ताव दिल्याचा दावा केला होता. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ माजला. त्याचा खुलासा पवार यांनी केला आहे. महाराष्ट्रात भाजपने कुणासोबत सरकार स्थापन करायचे या निर्णयप्रक्रियेत फडणवीस यांना स्थान नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी भाजपला सत्ता स्थापनेकरिता २०१४ मध्ये दिलेला जाहीर बाहेरुन पाठिंबा शिवसेना-भाजपमधील दरी वाढवण्याकरिता दिल्याचा खुलासा पवार यांनी केला आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचे पवार यांच्या डोक्यात तेव्हापासून घोळत होते. याच ओघात राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग हा दिल्ली व महाराष्ट्राची सत्ता भाजपने हस्तगत केल्यावर शिवसेना अथवा अन्य पक्षांना लोकशाहीत त्यांच्या पक्षाचे काम करण्याचा हक्क आहे हेच अमान्य करण्यासारखे असल्याने स्थापन झाल्याचा खुलासा पवार यांनी केला आहे. राष्ट्रीय पक्षांच्या दादागिरीविरुद्धची हे सरकार ही शक्ती असल्याचे स्पष्ट केले आहे.
ती आमची राजकीय चाल होती; देवेंद्र फडणवीसांच्या 'गौप्यस्फोटा'वर शरद पवारांचा 'स्फोट'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मात्र पवार यांनी फारच सावधपणे भाष्य केले आहे. कोरोनामुळे देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईचे अपरिमित आर्थिक नुकसान झाल्याचा मुद्दा मांडणाऱ्या पवार यांना राऊत यांनी फायनान्शियल सेंटर मुंबईतून गुजरातला हलवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ‘त्यावर नंतर बोलू’, अशा शब्दांत पवार यांनी बगल दिली आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कृषीमंत्री असताना मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही आकस न ठेवता आपण त्यांना कशी मदत केली. आपल्या त्या वर्तणुकीची तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कशी पाठराखण केली, हे सांगून पवार यांनी आपल्या व मोदी यांच्या सौहार्दपूर्ण संबंधाची ग्वाही दिली. मोदींशी आपले चांगले संबंध असल्याने त्यांच्याकडे आपल्याबद्दल व आपल्या पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये याकरिता आपण स्वत: त्यांना भेटून आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू अथवा विरोधी पक्षात बसू हे सांगितल्याचे स्पष्ट करतानाच उभयतांमधील ‘त्या’ ऐतिहासिक भेटीबाबतचे कुतूहल शमवण्याचा प्रयत्न पवार यांनी केला आहे.
...म्हणून अशानं दोन देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात, शरद पवारांचा मोदींना सल्लावजा टोला
लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सरकारच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याबाबत एका बैठकीत पंतप्रधानांचे लक्ष वेधल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी अत्यंत सावध उत्तर दिले आहे. आपण ते केवळ महाराष्ट्रातील राज्यपालांबाबत बोललो नाही. राज्यामध्ये पॉवर सेंटर एकच असले पाहिजे आणि ते मुख्यमंत्री हेच असले पाहिजे. दोन पॉवर सेंटर तयार झाली तर गडबड होते. काश्मीर, प.बंगाल तेथील राज्यपाल तेथील मुख्यमंत्र्यांना काम करु देत नसल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. आपले हे मत जनरल असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला पर्याय ठरणारे सरकार स्थापन करायचे झाल्यास त्यामध्ये राज्यपालांची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे पवार यांनी थेट कोश्यारी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला एकप्रकारे बगल देऊन भविष्यात त्यांच्या पक्षाची गोची होणार नाही, याची काळजी घेतली आहे.
मुदलात पवार यांनी त्यांना अडचणीच्या ठरलेल्या काही दाव्यांबाबत, घटनांबाबत खुलासे करून आपली बाजू सावरली आहे. शिवसेनेच्या मुखपत्राचे व्यासपीठ वापरुन उद्धव ठाकरे यांचे कान टोचले आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यपाल कोश्यारी यांच्या संबंधात दुरावा येणार नाही, याची तारेवरील कसरत चोख केली आहे. त्यामुळे या मॅरेथॉन मुलाखतीचा जास्तीत जास्त लाभ पवार यांनाच झाला आहे.