मुंडे बुडाले, दादांची सावली गेली! शिंदेसेना, अजित पवार गटाला नैतिकतेचे नियम लागू नाहीत काय?
By यदू जोशी | Updated: March 7, 2025 07:40 IST2025-03-07T07:37:23+5:302025-03-07T07:40:29+5:30
फडणवीस म्हणतात, युती धर्माच्या मर्यादा होत्या; पण हे कारण नेहमीसाठी पुरेसे नव्हे. शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना नैतिकतेचे नियम लागू नाहीत की काय?

मुंडे बुडाले, दादांची सावली गेली! शिंदेसेना, अजित पवार गटाला नैतिकतेचे नियम लागू नाहीत काय?
यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
शेवटी धनंजय मुंडेंची विकेट गेली. निरंकुशता आणि अनिर्बंधता माणसाला बुडवते तसे मुंडे बुडाले. अजितदादा माउली अन् धनूभाऊ त्यांची सावली असे त्यांच्याच पक्षातील लोक म्हणत असतात. सावलीला बाजूला करणे कठीणच ना? एक झिरो शॅडो डे असतो, त्या दिवशी तुमची सावली तुमच्या पायाखाली येते, ती दिसतच नाही. संतोष देशमुख हत्याकांडावरून नाकातोंडात पाणी जात असल्याचे लक्षात आल्यानंतर माउलीची सावली पायाखाली आली आणि नष्ट झाली. मुंडेंची प्रतिमा, प्रतिष्ठा धोक्यात आली तरी ते पदावर कायम होते. शेवटी त्यांच्या निमित्ताने सरकारची अप्रतिष्ठा होऊ लागली तेव्हा ते गेले. झिरो शॅॅडो डे हा जूनमध्ये येतो, अजित पवार गटात तो मार्चमध्येच आला. खरे तर सावलीचे ओझे नसते; पण इथे सावली जड झाली होती. धनंजय मुंडे का गेले, याची वेगवेगळी कारणे दिली जातात, पण सार हेच आहे की, लोकप्रक्षोभामुळे त्यांना जावे लागले. हा लोकप्रक्षोभ ज्यांनी ज्यांनी तयार केला, त्या सगळ्यांनाच त्याचे श्रेय दिले पाहिजे.
देवेंद्र फडणवीस सरकार येऊन जेमतेम चार महिने झाले तर एका मंत्र्याला घरी जावे लागले. ‘संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर येऊन त्याची सुई धनंजय मुंडे यांच्यावर गेली तेव्हाच त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता’ किंवा ‘त्यांना शपथच द्यायला नको होती’ वगैरे खूपच आदर्शवाद त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी मांडला. आता बीड जिल्ह्यात सत्तास्थानात उरलेल्या त्या एकमेव मुंडे आहेत. बहीण-भाऊ बदललेल्या राजकीय समीकरणामुळे एकत्र आले खरे, पण दोघांमधील संबंध आजही खट्टेमिठे आहेत. आता धनूभाऊ मंत्री नाहीत, त्यामुळे दोघांमधील संबंध खट्टेमिठेऐवजी कडुगोड होत जातील, असे वाटते.
दुसरीकडे ‘महायुतीचे राजकारण करताना कधी-कधी निर्णयाला विलंब लागतो’ असे कारण राजीनामा उशिरा येण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भाजपचे १३७ आमदार आहेत, बहुमतासाठी भाजपला आठच आमदार हवे आहेत. तरीही युतीधर्माच्या मर्यादा फडणवीसांसारख्या नेत्याला पडतात, हे यावरून दिसते. फडणवीस यांच्याकडून असलेल्या अपेक्षांचा विचार करता, युतीधर्माच्या मर्यादांचे कारण ते नेहमीच देऊ शकणार नाहीत. नैतिकतेचे, स्वच्छतेचे सगळे नीतीनियम भाजपच्याच मंत्र्यांसाठी आहेत, शिंदेसेना, अजित पवारांच्या पक्षासाठी ते लागू नाहीत का? - अशी दबकी चर्चा भाजपचे मंत्री करत असतात.
सरकारची जी पारदर्शक आणि प्रामाणिक प्रतिमा फडणवीस तयार करू पाहत आहेत त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे ही तिन्ही पक्षांसाठी सारखीच असतील ना? विरोधी पक्ष जेव्हा कमकुवत असतो तेव्हा सत्तापक्षातच एक विरोधी पक्ष तयार होतो आणि तो सरकारला त्रास देतो. शिंदेसेना आणि अजित पवार गट हे पाचही वर्षे सत्तापक्ष, प्रसंगी विरोधी पक्षाची भूमिका बजावत राहतील, असे दिसते. त्यामुळेच त्यांना सांभाळत सत्तेेचे शकट हाकणे हे फडणवीस यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. ‘मित्रपक्षांना ढील देणारी दोरी मी देईन पण योग्यवेळी ती मी ओढल्याशिवाय राहणार नाही’, असा स्पष्ट संदेश मुंडे प्रकरणात फडणवीस यांनी दिला आहे. सरकारची प्रतिमा टिकवण्याच्या आड येणारे महायुतीत कोणत्याही पक्षाचे असले, तरी फडणवीस त्यांना खपवून घेणार नाहीत. त्यांच्या जवळचे असल्याचे भासवून मुंबई, नागपूर, भंडारापर्यंतचे लोक डोळे मिटून दूध पितात, त्यांनी सांभाळून राहिलेलेच बरे, नाहीतर एक दिवस ते कधी गायब होतील ते कळणारही नाही.
नया है वह!
धनंजय मुंडे गेले पण ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे काही जाणार नाहीत, कारण त्यांचे प्रकरण वैयक्तिक आहे आणि त्यात जनक्षोभ नाही. शिवाय त्यांच्या कथित प्रकरणामुळे सरकार उघडे पडणार नसल्याने ते सुरक्षित आहेत आणि राहतील. असे असले तरी सध्याच्या काही मंत्र्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता ते आणि त्यांच्या निमित्ताने सरकार पुढील पाच वर्षांत अडचणीत येणारच नाही, याची हमी देता येत नाही.
गेल्या काही वर्षांत सवयी खूप काही बिघडल्या आहेत. सकाळ, संध्याकाळ पंचपक्वान्ने खाण्याची सवय असलेल्याला वर्ष-दोन वर्षे नाही तब्बल पाच वर्षे उपाशी राहणे किंवा भाजी-भाकरी खाणे शक्य आहे का? अत्यंत वादग्रस्त असलेल्या पीए, पीएस, ओएसडींना पुन्हा घेण्यासाठी काही हेविवेट मंत्री अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेमाचा दबाव आणतच आहेत. राधा ही कृष्णासाठी जेवढी बावरी झाली नव्हती, तेवढे बावरेपण आपल्या खास मर्जीतील ‘अजिंक्य’साठी भाजपचे एक ज्येष्ठ मंत्री दाखवत आहेत. ‘सगळे फडणवीसच बघणार, आमच्या हाती काही नाही’, अशी उद्विग्नता माणिकराव कोकाटेंनी मधे बोलून दाखवली होती. नया है वह! त्यांना फडणवीस अजून पुरते कळलेले नाहीत.
जाता जाता : ‘मातोश्री’वर एक आरोप झाला तरी विधिमंडळात अक्षरश: राडा करणारे शिवसेनेचे आमदार आजही आठवतात; कामकाज ठप्प पाडले जायचे. डॉ. नीलम गोऱ्हे मर्सिडिज वगैरे काय काय बोलल्या, पण त्यांना विधिमंडळात कोणी साधा जाब नाही विचारला! वर्तमानात संघर्षाची पाटी कोरी असेल तर इतिहासाच्या आठवणीतच धन्यता मानली जाते. उद्धवसेनेची आजची अवस्था तशीच आहे.