राजकारणातील रणनितीकार म्हणून नावारुपाला आलेले प्रशांत किशोर उर्फ पी. के. आता सोयीनुसार बोलत सुटले आहेत. ‘मी एकमेव भारतीय राजकारण समजू शकतो’, असा अहंभाव निर्माण झालेल्या पी. के. यांचे काय करायचे, असा सवाल उपस्थित करण्याची आवश्यकता वाटते आहे. एका खासगी बैठकीत बोलताना त्यांनी मोठा दावा केल्याच्या आविर्भावात सांगून टाकले की, ‘पुढील काही दशके भाजप आणि नरेंद्र मोदी यांना कोणी बाजूला करू शकत नाही. भाजप हा पक्ष देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार’, असेही ते म्हणतात. शिवाय ही परिस्थिती काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना समजतच नाही. ती मलाच समजते, अशीही त्यांच्या दाव्यामागील भूमिका दिसते. भारतीय लोकशाही इतकी तकलादू आहे किंवा ज्या नव्वद कोटी मतदारांच्या मतांवर ती ठामपणे उभी आहे, त्या मतदारांना काही समजत नाही, आपली रणनितीच श्रेष्ठ ठरते, असादेखील अहंभाव त्यांच्यात डोकावतो.
नरेंद्र मोदी यांचा २०१४मध्ये देशाच्या राजकारणात प्रवेश झाला. तेव्हाची रणनिती ठरविण्यात पीकेंचा सहभाग होता. बिहारमधील संयुक्त जनता दल, तामिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघम, पंजाबमध्ये काॅंग्रेस आणि अलीकडेच गाजलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काॅंग्रेस पक्षासाठी त्यांनी रणनिती ठरविण्यात भाग घेतला होता. आजवर त्यांनी जिंकण्याची शक्यता असलेल्या राजकीय पक्षांचीच रणनिती ठरविण्याचे काम घेतले आहे. त्यांना ना विचारसरणीची बैठक आहे ना देशासमोरील समस्यांचे सखोल आकलन आहे. एखाद्या प्रांतात किंवा निवडणुकीत कोणता विषय चर्चेत ठेवायचा, लोकांची मते काय आहेत, समस्या कोणत्या आहेत, यावर ते भूमिका मांडण्यासाठी मदत करतात. पीके यांच्या रणनितीमुळेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय झाला असेल तर त्यांनी १९८४पासून केलेल्या संघर्षाला काही महत्त्व नाही का? पश्चिम बंगालच्या राजकारणात अनेक टक्केटोणपे खात त्यांनी राजकारणाची यशस्वी वाटचाल केली आहे. केवळ आपल्या रणनितीचे महत्त्व वाढविण्यासाठी ते विविध प्रकारचे विश्लेषण करत असतात.
राहुल गांधी यांना काही समजत नाही, अशी भूमिका जेव्हा पीके मांडतात, तेव्हा एका यशस्वी राजकीय रणनितीकाराला काॅंग्रेसमध्ये प्रवेश देण्याचे राहुल गांधी का नाकारतात, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले असते तर बरे झाले असते. ज्या राजकीय पक्षांचे वारे असते त्यांचे काम घेण्यात विख्यात असलेल्या पीके यांना आता राजकीय महत्त्वाकांक्षा वाटू लागली आहे. त्यात गैर काही नाही; पण ती लपवून का बोलत राहायचे? शिवाय आपण सध्याचे काम सोडून राजकीय पक्षात का प्रवेश करतो आहोत, याचे तरी स्पष्टीकरण त्यांनी कोठे केले आहे? आमदार, खासदार किंवा मंत्री होण्याची इच्छा असेल तर कोणताही पक्ष त्यांना हे स्थान देऊ शकतो. तीस टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवणारा राजकीय पक्ष राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी असणार यात वादच नाही. भाजपच्या विचारसरणीला विरोध म्हणून मी राजकारणात उतरणार आहे, अशी त्यांची भूमिकाही नाही. अनेकवेळा संधीसाधू पद्धतीने रणनितीकाराची भूमिका वठवता येते. मात्र, राजकीय बैठक पक्की असेल तर ती मांडावी लागेल.
भाजप केवळ आता मुख्य प्रवाहात आला आणि तो राहणार आहे, हे भाष्य होत नाही. भाजपसारख्या विचारसरणीची ताकद भारतीय सार्वजनिक जीवनात स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाजप ही राजकीय फांदी आहे, त्या संघात नरेंद्र मोदी यांनी प्रचारक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्या संघाची स्थापना देश स्वतंत्र होण्याच्या २२ वर्षे आधी झाली आहे. काॅंग्रेसचा प्रभाव असतानाही त्या विचारसरणीचे राजकारण चालू होते. किंबहुना जनसंघाच्या नेत्यांपेक्षा अधिक ताकदवान नेते याच विचाराने काॅंग्रेस पक्षात काम करत होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्याशी संघर्ष करावा लागला आहे.
ही विचारसरणी राहणार आहे. पीके यांना विचारसरणीशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे भाजपचा प्रभाव राहील, असे सांगत असताना देशाच्या कानाकोपऱ्यात काॅंग्रेसला मानणारा एक मोठा वर्ग आहे, याचीही कबुली द्यावी लागेल. संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष म्हणून वावरतानाही त्यांनी एखाद्या विषयावर ठाम भूमिका घेतलेली नाही. जनमत निर्माण करणे आणि सोयीची भूमिका घेणारे वाऱ्याची दिशा ओळखून आपली रणनिती ठरवतात. तसेच काहीसे प्रशांत किशोर उर्फ पीके यांचे झाले आहे. त्यामुळे त्यांना रणनितीकार म्हणून स्वीकारताना राजकारणी नेता बनण्याच्या त्यांच्या धडपडीचे काय करायचे, असा सवाल उपस्थित होतो.