उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ सरकारचे धर्मांध इरादे त्याने कधी लपविले नाहीत. त्या राज्यात साडेतीन कोटी मुसलमान नागरिक आहेत. मात्र, त्यातील एकालाही आदित्यनाथांनी त्यांच्या पक्षाचे तिकीट लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मिळू दिले नाही. २०१४ व २०१७च्या निवडणुकी तशाच स्वरूपाच्या पार पडल्या. धर्मांध राजकारण व धार्मिकतेला राजकारणाची जोड, यामुळे त्या राज्यात त्यांचे सरकार मोठ्या संख्येने विजयीही झाले. मात्र, निवडणुकीने दिलेला अधिकार विकासासाठी व कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी असतो. तो धार्मिक वा सांस्कृतिक अन्यायासाठी किंवा इतिहास पुसून टाकण्यासाठी नसतो. मुद्दा आदित्यनाथ सरकारने ‘अलाहाबाद’ या शहराचे नाव बदलून त्याला ‘प्रयागराज’ बनविण्याचा घेतलेल्या निर्णयाचा आहे. अलाहाबाद हे गंगा, यमुना व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाचे पवित्र क्षेत्र आणि ते ‘प्रयागराज’ म्हणून ओळखलेही जाते. एके काळी अत्यंत सधन व औद्योगिक उभारणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराला मोठा सांस्कृतिक लौकिकही लाभला होता. मात्र, गेल्या काही दशकांत त्याला अधोगतीची अवकळा लाभली आणि त्याचे स्वरूप दिवसेंदिवस दरिद्री व दयनीय होत गेले. मुळात हिंदूंना पवित्र वाटणाऱ्या या शहराची उभारणीच सम्राट अकबराने केली. त्याने तिथे किल्ला उभारला, नदीचे तट बांधून यात्रेकरूंची सोय केली. त्यांच्यासाठी पागोळ्या बांधल्या. हे काम अकबराने इस्लामचा त्याग केल्यानंतर व त्याचा दीने इलाही हा नवा धर्म स्थापन केल्यानंतरच्या काळात केले आहे. त्याचमुळे त्याचे नाव ‘लाहाबाद’ (इलाहीबाद) असे ठेवले गेले. हे सर्वतोमुखी झाले व आजतागायत हे शहर त्याच नावाने ओळखले जाते, पण संघ व भाजपाच्या राजकारणात विकासकारणाहून राजकारण अधिक बळकट आहे. त्यामुळे विकास झाला नाही तरी चालेल. देशाचा इतिहास पुसून काढून त्याला भगवा रंग देण्याचे व त्याचे जमेल तेवढे हिंदूकरण करण्याचे धोरण त्या पक्षाने गेली चार वर्षे चालविले आहे व देशाने ते अनुभवले आहे. अलाहाबादचे ‘प्रयागराज’ करणे हा त्याच राजकारणाचा एक पवित्रा आहे. नावे बदलली की संस्कृती बदलते वा विकासाची गंगा वाहू लागते असे नाही. गेल्या काही वर्षांत अनेक शहरांची व स्थळांची नावे बदलली गेली, पण ती पूर्वी होती तशीच राहिली. आदित्यनाथांच्या राजकारणाचा हेतू मुसलमानांना डिवचण्याचा व डावलण्याचा आहे. हे राज्य वा हा देश तुमचा नाही, हे त्यांना बजावण्याचा आहे. तुमचे सारे काही आम्ही नाहिसे करू, हा त्यांचा हेका आहे. ताजमहालची त्यांनी चालविलेली दुर्दशा त्यातूनच सुरू झाली आहे. इतिहास हा कुणा एका धर्माचा, वर्गाचा वा जातीचा नसतो, तो देशाचा असतो. त्याचा वारसा जपणे व त्याकडे पाहात वर्तमानाची वाट प्रकाशित करणे हे नव्या पिढ्यांचे काम असते. मात्र, धर्मवेडाने आंधळेपण आलेली माणसे सर्वधर्मसमभाव व देशप्रेम याहून परधर्मद्वेषाचे राजकारणच अधिक करतात. मग त्यांना बाबर, अकबर व औरंगजेब सारखेच दिसतात. काही काळापूर्वी या आदित्यनाथाने सगळ्या सरकारी इमारती व राज्य सरकारच्या बसेस यांना भगवा रंग देण्याचा निर्णय घेतला. कुणा दुसºयाच्या शहाण्या सल्ल्याने तो अंमलात मात्र आला नाही. देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई परवा एका भाषणात म्हणाले, देश म्हणजे सर्वसमावेशकता, पण ते न्यायमूर्ती आहेत. आदित्यनाथासारखे महंत पदावरून मुख्यमंत्री पदावर आलेले राजकारणी नाहीत. निळ्या आकाशाला भगवा रंग फासण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते पछाडलेले नाहीत. आदित्यनाथ तसे आहेत. ते दुहीचे व द्वेषाचे राजकारण करीत आहेत. त्यांना मोदी अडवत नाहीत आणि भागवतांना हे चालणारेही आहे. लोक गप्प राहतात. कारण त्यांच्या मनात हिंदुत्ववाद्यांनी अलीकडे केलेल्या हिंसाचाराची धास्ती आहे. विरोधकांना कैद करता येते आणि मुसलमान? ते तर धास्तावलेलेच आहेत. देशात भय आणि संशयाचे राजकारण काही काळ यशस्वी होते. मात्र, त्यातून त्याची विभागणी होत नाही, हे आदित्यनाथांएवढेच त्यांच्या चाहत्यांनीही लक्षात घेतले पाहिजे. हा देश त्यात राहणाºया साºयांचा आहे व त्याचा इतिहासही त्या साºयांचा आहे. तो जपणे याचेच नाव राष्ट्रकारण आहे.
धर्मांध राजकारण अन् धार्मिकतेला राजकारणाची जोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 3:16 AM