राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा कोणतेही कामकाज न करता संपला. दुसºया आठवड्याची सुरुवात आजपासून होत आहे. पहिले दोन दिवस राज्यपालांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद का केला नाही म्हणून संपले. तिसºया दिवशी बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकºयांना मदत देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनी ठराव आणले. पण कोणी आधी बोलायचे यावरून वाद झाले, सभागृहाचे काम वारंवार बंद पडले. तर चौथ्या दिवशी भाजपा पुरस्कृत आ. प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द केले म्हणून विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे निलंबन यावरून सभागृह बंद पडले.विधानपरिषदेतील सदस्यांचे निलंबन रद्द करा किंवा करू नका, या मागण्यांसाठी विधानसभेत चर्चा व गोंधळ झाला. दिवसभरासाठी विधानसभा बंद पाडली आणि एक महिना चालणाºया अधिवेशनाचा एक आठवडा संपला. या अधिवेशनात राष्टÑवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावरून दोन्ही सभागृहात झालेला गदारोळ काँग्रेससाठी देखील हवाहवासा आहे. भ्रष्टाचाराचे जर आरोप झाले असतील तर ते चुकीचे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांची आहे असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे, कारण त्यांच्यासाठी राष्टÑवादीवर आरोप होणे फायद्याचे आहे. शिवाय हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने मुंडे यांना मिळणारा प्रतिसाद सत्ताधाºयांसोबत काँग्रेसलासुद्धा चिंतेत टाकणारा होता. त्यामुळे मुंडेंना ब्रेक लावण्याचे काम यानिमित्ताने झाले आहे. मुंडे यांनी आता रोज एक सीडी आम्ही प्रकाशित करू असे आव्हान सरकारला दिले, त्यावर आमच्याकडूनही अशा सीडीज देता येतील, आपण हेच करायचे आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. मात्र या घटनेने विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली आहे. नजीकच्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होईल. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील.अधिवेशनात असे रोज नवनवे विषय आले तर ते सरकारलाही हवेच आहेत. कारण साधे आहे. यामुळे सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन, त्यांनी घेतलेले निर्णय, सुरू केलेल्या योजना यांचे फलित यावर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता धूसर झाली आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये अजूनही फ्लोअर मॅनेजमेंटचा अभाव आहे. कोणते विषय कधी घ्यायचे, त्यातून राजकीय लाभ कसा उठवायचा याविषयी दोघांमध्ये एकवाक्यता नाही, त्याउलट कोणते विषय येणार, त्यावर कुणी कोणते प्रश्न विचारायचे, फ्लोअरवर काय करायचे याचे नियोजन भाजपाकडून होताना पहिल्या आठवड्यात दिसले. सरकारविरोधी वातावरण आहे पण त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठीचे नियोजन मात्र होताना दिसत नाही. सत्ताधाºयांना धनंजय मुंडेंवरील आरोपामुळे संधी चालून आली आहे. त्यामुळे विरोधकांनी कोणताही विषय काढला की सत्ताधारी तो विषय मुंडे यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतील. शिवसेनेनेदेखील आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा विषय हाती घेतला आहे. सोमवारी हाच विषय पुन्हा लावून धरला जाईल. त्यातून गदारोळ होईल. विधानपरिषदेत पुन्हा परिचारक यांच्या निलंबनाचा ठराव आणण्याची तयारी झाली आहे. होळी संपली, रंग उडवून झाले. राजकीय धुळवडीची सुरुवात या अधिवेशनाच्या निमित्ताने झाली आहे.
राजकीय धुळवडीची सुरुवात करणारे अधिवेशन
By अतुल कुलकर्णी | Published: March 05, 2018 12:29 AM