राम मंदिरामुळे भाजप फ्रंटफूटवर; पण थेट 'चार सौ पार'चा दर्प ठेवण्यापेक्षा...

By यदू जोशी | Published: January 26, 2024 07:20 AM2024-01-26T07:20:47+5:302024-01-26T11:24:12+5:30

एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आघाडी घेणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचा सामना करण्यात अपयशी ठरलेले विरोधक, हे सध्याचे चित्र!

Politically speaking, BJP is on the front foot after the inauguration of Lord Shri Ram temple in Ayodhya. | राम मंदिरामुळे भाजप फ्रंटफूटवर; पण थेट 'चार सौ पार'चा दर्प ठेवण्यापेक्षा...

राम मंदिरामुळे भाजप फ्रंटफूटवर; पण थेट 'चार सौ पार'चा दर्प ठेवण्यापेक्षा...

-यदु जोशी

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतरच्या स्थितीत राजकीयदृष्ट्या विचार केला तर भाजप फ्रंट फूटवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली आहे. महाराष्ट्रात त्याचा फायदा कमळाला आणि जोडीने एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होईल असे दिसते. विरोधी पक्ष मोदींची लोकप्रियताच नाकारतात, पण वास्तव तसे नाही. ही लोकप्रियता ओळखून तिचा प्रभाव कमी करण्यासाठीची रणनीती आखणे हा भाग महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर आजतरी दिसत नाही.

मोदी विरोधक आपोआप आपल्यासोबत येतील, आपल्याला फार काही करण्याची गरज नाही असे महाविकास आघाडीतील पक्षांना वाटते बहुतेक. एकेकाळी संघ परिवारातील लोक इंदिराजींचा असाच राग करायचे; त्यांच्याविषयी काय काय बोलायचे; पण लोकमान्यता इंदिराजींच्या बाजूने असल्याने काही बिघडायचे नाही. विरोधात बोलणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त व्हायचे. मोदींबाबत तसेच होत आहे. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आघाडी घेत असलेले मोदी आणि त्यांचा सामना करण्यात अपयशी ठरत असलेले विरोधक असे सध्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूक मोदींभोवती फिरणार हे उघड आहे. त्याला महाराष्ट्रही अपवाद नसेल. 

महाविकास आघाडीचे नेते विधानसभा निवडणूक असल्यासारखे बोलत आहेत. आधी लोकसभा आहे आणि त्यात कोणते मुद्दे असावेत याचे भान दिसत नाही. तिकडे भाजपच्याही थोडे अंगात आलेले दिसते. ‘अब की बार चार सो पार’ असा दर्प ठेवण्यापेक्षा नम्रपणे वागले, बोलले तर चांगलेच होईल. ‘फील गुड’चे काय झाले होते, आठवते ना? राम मंदिर, कलम ३७०, मोदी करिष्मा ही भाजपच्या भात्यातील प्रभावी शस्त्रे आहेत. त्याला छेद द्यायचा तर महाराष्ट्रातील सामाजिक संदर्भांचाच आधार महाविकास आघाडीला घ्यावा लागणार आहे. या सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव आघाडी वा महायुती कशा पद्धतीने करतात यावर बरेच काही अवलंबून असेल. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची फलश्रुती काय असेल ते माहिती नाही, पण हे आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारणाचे ध्रुवीकरण करेल. निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले एक मोठे सामाजिक आंदोलन राजकीय पटल व्यापेलच. त्याचे संभाव्य पडसाद काय उमटतील, जातीय गणिते कशी असतील याचा अंदाज घेत आपल्याला फारसे ‘डॅमेज’ होणार नाही याची काळजी भाजपची थिंकटँक घेत आहे. सगळ्या हालचालींवर भाजप श्रेष्ठीही नजर ठेवून आहेत... काँग्रेस मात्र याबाबत काही करताना दिसत नाही. 

आंबेडकर कोणाला नकोत? 
ॲड. प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी अशा नेत्यांना सोबत घेण्यात खळखळ करण्याइतकी महाविकास आघाडीची  स्थिती मजबूत नाही. या दोघांचे राजकारण मान्य नसलेले महाविकास आघाडीत एक मोठे नेते आहेत. आंबेडकर-शेट्टी या दोघांनाही त्या नेत्याचे नाव माहिती आहे. गेल्यावेळी अकोल्यात काँग्रेसचा मराठा उमेदवार कोणी, कसा बदलला, आंबेडकरांविरुद्ध मुस्लीम उमेदवार का आणि कोणी दिला, संजय धोत्रे यांना मदत होऊन आंबेडकर कसे पडले याचे कूळ आणि मूळ शोधले तर चटकन लक्षात येईल. त्याच अदृष्य हातांना यावेळीही आंबेडकर-शेट्टी नको असावेत. 

या दोघांना दूर ठेवण्याची खेळी कोणाची आहे हे लक्षात घेऊन काँग्रेसने या दोघांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले तर खेळी खेळणाऱ्यांना शह बसेल. मात्र, उलटेच घडत आहे. ‘आंबेडकर महाविकास आघाडीसोबत गेले तर आमची अडचण आहे’, असे भाजपचे नेते सांगतात. अमरावतीपासून त्यांच्या विविध सभांना मोठा प्रतिसाद तेच सांगत आहे. काँग्रेसला ते कळत नाही. गुरुवारी महाविकास आघाडीची बैठक सुरू झाल्यावर काही तासांनी आंबेडकरांना जाहीर पत्र देऊन बैठकीसाठी बोलविले गेले. हा अपमान का केला गेला? त्यावर आंबेडकरांनी जी काही जाहीर ऐशीतैशी केली त्याने आग होणे साहजिक आहे. 

काँग्रेसचे आउटगोइंग सुरू 

काँग्रेसला स्वत:चे घर सांभाळणे कठीण जाईल असे दिसते. रमेश चेन्नीथला हे महाराष्ट्राचे नवे प्रभारी परवा म्हणाले, ज्यांना जायचंय त्यांनी तत्काळ काँग्रेस सोडून जावे. ..आधे इधर जाव, आधे उधर जाव म्हणाल तर मागे कोणीच राहणार नाही. चेन्नीथला हे राहुल गांधींना, ‘यू आर सराउंडेड बाय राँग पीपल’ अशी जाणीव करून देणारे रोखठोक सांगणारे नेते आहेत म्हणतात. पण, भाजपने पळवापळवी सुरू केली आहे. जळगावचे बडे प्रस्थ असलेले डॉ. उल्हास पाटलांपासून सुरुवात केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांचे आणि त्यांच्या डॉक्टर कन्येचे ऑपरेशन केले. महाजन हे बिना स्टेथोस्कोपचे डॉक्टर आहेत. जिल्ह्याजिल्ह्यातले असे पाटील भाजप प्रवेशासाठी संपर्कात आहेत. त्यांना रोखण्यासाठी काँग्रेसचा कोणताही प्लॅन नाही दिसत. 

Web Title: Politically speaking, BJP is on the front foot after the inauguration of Lord Shri Ram temple in Ayodhya.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.