- संदीप प्रधानसाथी जॉर्ज फर्नांडिस गेले आणि या ‘बंद सम्राटा’च्या सामर्थ्याची चर्चा मीडियात सुरू झाली. क्षणभर मनात विचार आला की, फर्नांडिस गेले १० ते १२ वर्षे अल्झायमरने आजारी नसते आणि त्यांनी खरोखरच आपली बंद करण्याची ताकद पणाला लावून मुंबई ठप्प करण्याचा प्रयत्न केला असता, तर आज पंचविशीत असलेल्या पिढीने त्याचे स्वागत केले असते का? मोबाइलची रेंज गेली किंवा वायफाय बंद पडले, तर कासावीस होणाऱ्या, रेल्वे किंवा मेट्रो ठप्प झाली तर स्ट्रेस येणा-या, ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावर फ्रस्ट्रेट होणा-या आजच्या तरुण पिढीला ‘बंदसम्राट’ हे बिरूद मिरवणा-या जॉर्ज यांचे काही कौतुक वाटेल का? कदाचित, सोशल मीडियावर जॉर्ज यांच्या निंदानालस्तीच्या हजारो पोस्ट ही तरुणाई टाकून मोकळी होईल किंवा टि्वटरवर जॉर्ज यांना ट्रोल करायलाही तिने मागेपुढे पाहिले नसते.महापालिकेचा सफाई कामगार, हॉटेलातील कामगार याला किमान वेतन, हक्क मिळावा, याकरिता हयात खर्ची घातलेल्या व या कामगाराला सन्मानाने जगण्याकरिता लढणा-या जॉर्ज यांना आज वेगवेगळ्या कामगार कायद्यांच्या गळ्याला सरकार, उद्योगपती, बँकर्स आदींनी नख लावलेले असताना तसाच संघर्ष करणे शक्य होते का? बँकेतील नोकरी म्हणजे सुस्थापित जीवन, असे समजण्याचा तो काळ होता. मात्र, आता बँकेत कागदावर साडेसहा ते सात तासांची ड्युटी राहिली आहे. बँकेतील कर्मचा-यांना आठ ते दहा तासांची ड्युटी करावीच लागते. कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही. बोनस, ओव्हरटाइम वगैरे शब्द तर इतिहासजमा झाले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतील तंत्रज्ञानाने प्रॉडक्शन, सर्व्हिस, मार्केटिंग वगैरे क्षेत्रे व्यापली असून कमीत कमी मनुष्यबळात काम करून घेण्यामुळे १३० कोटींच्या या देशापुढे आव्हान उभे राहिले आहे.चालकाविना चालणारी मोटार किंवा रेल्वे ही कल्पना पुढील पाच वर्षांत प्रत्यक्षात आलेली दिसणार असेल, तर देशापुढे बेरोजगारीचे किती गहिरे संकट उभे राहिले आहे, याची कल्पना येऊ शकते. डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या योजनेत मनुष्यविरहित बँक ही संकल्पना अमलात आली आहे. रोख भरण्याकरिता, रोख काढण्याकरिता आणि पासबुकात एण्ट्री करण्याकरिता यंत्रे बसवल्यावर एखादा सुरक्षारक्षक तैनात करून बँक चालवली जाऊ शकते. गावागावांत एक लॅपटॉप घेऊन फिरणारे तीन लाख बँकमित्र सरकारने तयार केले आहेत. तो बँकमित्र हीच चालती फिरती बँक असल्याने बँकेची शाखा ही संकल्पनाही संपुष्टात येणार आहे. एकीकडे तंत्रज्ञानाने बँक व्यवहार एका क्लिकवर केले असल्याने बसल्या जागी बसून व्यवहार करणे शक्य असले, तरी ऑनलाइन व्यवहारांतील घोटाळे, फसवणूक हे प्रकार वाढले आहेत. तंत्रज्ञान वाईट नाही. उलटपक्षी, तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे. मात्र, खासगी हातात तंत्रज्ञान गेल्यावर नफा हाच मुख्य हेतू ठरतो आणि मनुष्यबळ हे ज्या देशाचे व्यवच्छेदक लक्षण आहे, त्या देशात कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, याचे भान सरकारने राखले पाहिजे.
गेल्या काही वर्षांत सेवा क्षेत्राने चांगले बाळसे धरले आहे. मात्र, या क्षेत्रात १२ तासांची ड्युटी केल्यावर जेमतेम आठ ते दहा हजार रुपये वेतन दिले जाते. काही ठिकाणी स्वाक्षरी एका विशिष्ट रकमेच्या कागदावर करून घेतली जाते व प्रत्यक्षात हातात त्यापेक्षा कमी रक्कम टेकवली जाते. कॉल सेंटर व तत्सम नोक-यांमध्ये पदवीप्राप्त तरुण-तरुणींना १५ ते २० हजार रुपये वेतन दिले जाते. मात्र, चार ते पाच वर्षे नोकरी केल्यावर जेव्हा वेतन समाधानकारक पातळी गाठते, तेव्हा अचानक अकार्यक्षमतेचा शिक्का मारून कामावरून काढून टाकले जाते. सलग दोन ते तीन वर्षे अॅचिव्हर्स अवॉर्ड प्राप्त केलेल्या तरुणतरुणीला कामावरून तडकाफडकी काढून टाकण्याचा हेतू हाच असतो की, त्याच्या वाढलेल्या वेतनात दोन किंवा तीन फ्रेशर्स कामावर ठेवता येतात. कॉल सेंटर किंवा विविध कंपन्यांच्या बॅक ऑफिसमध्ये काम करणारे हे सर्व कर्मचारी असले तरी नोकरीवर रुजू होण्यापासून त्यांना एक्झिक्युटिव्ह व तत्सम पदे देऊन त्यांच्या मनावर तुम्ही कर्मचारी नव्हे, तर व्यवस्थापनाचे प्रतिनिधी असल्याचे ठसवले जाते. त्यामुळे तडकाफडकी काढून टाकले जाते, तेव्हा आपण औद्योगिक विवाद कायद्याखाली दाद मागू शकतो, याचेही भान या तरुणतरुणींना नसते.आपला मुलगा किंवा मुलगी आयटी क्षेत्रात गेला म्हणजे पालकांना हात स्वर्गाला लागल्याचा आनंद होतो. मात्र, या क्षेत्रातील नोकरी स्वीकारताना कंत्राटातच कुठल्याही युनियनचे सदस्य होणार नाही, हे लिहून द्यावे लागते. आयटी कंपन्यांत नैसर्गिक विधीला गेल्यावर किती कालावधीत परत जागेवर येऊन बसले पाहिजे, याचे नियम आहेत. शेजारी बसणाºया व्यक्तीशी बोलण्याची मुभा नाही. विदेशातील कंपन्यांसोबत काम असल्याने त्यांच्या कामाच्या वेळेनुसार रात्रीअपरात्री काम करावे लागते. अन्य क्षेत्रांत अनुभव ही शिदोरी असली तरी आयटी क्षेत्रात एखाद्याचे ज्ञान हे कालबाह्य झाल्यावर कंपन्या त्याच व्यक्तीला अपडेट होण्याकरिता प्रशिक्षण देत नाहीत. अशा कालबाह्य व्यक्तीला नारळ दिला जातो. त्या व्यक्तीला अन्यत्रही नोकरी मिळत नाही. आयटी क्षेत्रातील व्यक्ती बँकिंग किंवा प्रॉडक्शन अशा कुठल्याच क्षेत्रात नोकरी करू शकत नाही.वेगवेगळ्या क्षेत्रांतील रोजगारामधील अत्यल्प वेतन, घटत चाललेले लाभ, कंत्राटी पद्धत, अस्थिरता यामुळे क्रेडिट कार्डधारकांच्या थकबाकीचे आकडे फुगत चालले आहेत. आयटीसारख्या क्षेत्रात भक्कम पगाराची नोकरी असताना खरेदी केलेल्या टू बीएचके किंवा थ्री बीएचकेचे हप्ते नोकरी गमावल्यावर न भरल्यामुळे थकबाकीदार झालेल्यांची प्रकरणेही झपाट्याने वाढत आहेत. नोकरीच जर कायम नसेल तर घर, संसार करण्याचे दूरगामी स्वप्न कसे व का पाहायचे, असा विचार करणारी व पगार चांगला असला तरीही आजचा क्षण सुखात घालवणारी नवी युवा पिढी तयार झाली आहे. ही पिढी आता फ्लॅट विकत घेऊन कुटुंबवत्सल जीवन जगण्यास तयार नाही. भाड्यानं फ्लॅट घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे, आज खिशात पैसा खुळखुळतोय, तर चैन करतो, असा विचार करणारी ही एक प्रवृत्ती आहे.समजा, उद्या बख्खळ पैशांची नोकरी गेली, तर कुणाला गंडा घालून किंवा जुगाड करून मी माझी लाइफस्टाइल मेन्टेन करणार. मात्र, माझ्यामागं पाश निर्माण करणार नाही, असा विचार ते करतात. त्याचवेळी जेमतेम आठ-दहा हजार रुपये कमावण्यामुळे हातावर पोट असलेली व घर, संसाराचा विचारही करू न शकणारी, ओढग्रस्त जीवन जगणारी दुसरी प्रवृत्ती आहे. या तरुणाईच्या खिशातील मोबाइलमध्ये त्यांना जगात लोक कोणकोणती सुखं उपभोगतात, तेही दिसते आणि सनी लिऑनचे पोर्न पण पाहता येतात. हे पाहून माथी भडकलेले याच वर्गातील तरुण मग शरीरसुखापासून काहीही ओरबाडण्याची वृत्ती ठेवतात. निर्भया प्रकरणानंतर कडक कायदा करूनही बलात्कार, विनयभंगांची प्रकरणे कमी होण्याऐवजी वाढण्याचे एक कारण जीवनातील ही अस्थिरता हेही आहे. तुरुंगात गेलो काय आणि बाहेर राहिलो काय, काय फरक पडतो? असा त्यांचा -हस्व दृष्टिकोन परिस्थितीने तयार केला आहे. त्यामुळे जॉर्ज फर्नांडिस आज सक्रिय असते, तर कदाचित हेटाळणीचा विषय झाले असते आणि अस्थिरतेच्या गर्तेतील कामगार, कर्मचारी त्यांना पाहवला नसता. त्यामुळे बंदसम्राटाने योग्य वेळी डोळे बंद केले, हेच उत्तम झाले.