- मिलिंद कुलकर्णी२०१९ मधील विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी घडलेल्या नाट्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम झालेला आहे. हा परिणाम दीर्घकालीन राहील, असे जाणवणाऱ्या घडामोडी राजकीय क्षेत्रात नित्यनेमाने घडत आहेत. शिवाय त्याचे पडसाद केवळ मुंबई नव्हे तर गावगाड्यापर्यंत जाणवत आहेत. पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येवरून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन केले. सरकारवर दबाव वाढवत नेल्याने विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला. प्रताप सरनाईक, संजय राऊत यांच्या पत्नीविरोधात ईडीचे शुक्लकाष्ठ याच काळात लागले. राठोड यांच्या राजीनाम्याविषयी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. कुरघोडीचे राजकारण सुरू असताना भाजपची सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेत वेगळे आणि राजकारणात विरळ होत चाललेले चित्र दिसले.
केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा पहिला लाभ शिवसेनेचे ३ नगरसेवक निवडून आलेल्या सुप्रीम कॉलनीला देण्यात आला. पाणीपुरवठा मंत्री या नात्याने शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना या शुभारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलाविण्यात आले होते. भाजपचे नेते गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. राजकीय जुगलबंदी रंगली असली तरी भाजपने शिवसेनेकडे टाळीसाठी हात पुढे केल्याचा संदेश या कार्यक्रमातून गेला. नेत्यांच्या खिलाडूवृत्तीने प्रेरित होत या भागातील शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत भाजपच्या महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या महासभेत केला. सेनेतर्फे केलेल्या या सत्काराला गटनेते यांच्यासह ५ नगरसेवक उपस्थित होते. सोनवणे यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल हा सत्कार जसा होता, तसा भाजपने दिलेल्या टाळीला प्रतिसाद म्हणून त्याकडे बघितले गेले. मात्र याच सत्कारावरून आता राजकारण रंगले आहे. सेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सेनेच्या नगरसेवकांची कानउघाडणी केल्याचे वृत्त बाहेर आले. सत्काराचा उद्देश चांगला होता, पण पक्षीय भूमिकेशी सुसंगत नसल्याबद्दल माफी मागीतली, त्यानंतरही सेनेच्या बैठकीतील चर्चा अशी बाहेर येण्याला आक्षेप घेत गटनेते अनंत जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला.नगरसेवक व पक्ष पदाधिकाऱ्यांमधील दरी रुंदावली
महासभेत सेना नगरसेवकांकडून सत्कार झाला? असला तरी १५ पैकी केवळ ५ नगरसेवक व्यासपीठावर गेले. गटनेते अनंत जोशी, माजी महापौर नितीन लढ्ढा, नितीन बरडे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे यांचा त्यात समावेश होता. माजी महापौर विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह १० नगरसेवक अनुपस्थित होते. त्यातून पक्षातील अंतर्गत मतभेद देखील उफाळून आले. सेनेकडून सत्कार की, केवळ महापौर पती कैलास सोनवणे यांच्या निकटवर्तीय सेना नगरसेवकांकडून सत्कार असा प्रश्न उपस्थित झाला. सेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांना विश्वासात न घेता पालिकेतील नगरसेवकांनी ही भूमिका घेतल्याने संपर्कप्रमुखांनी बैठक बोलावून नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही महानगर प्रमुखांना विश्वासात न घेता आंदोलने करणाऱ्या गजानन मालपुरे, नीलेश पाटील या सेनेच्या नेत्यांना सावंत यांनी तंबी दिली होती. गटनेते अनंत जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेनेच्या पदाधिकारी व नेतृत्वाला विचारलेले प्रश्नदेखील महत्त्वाचे आहेत. भाजपचे बहुमत महापालिकेत असल्याने सेनेच्या नगरसेवकांची कामे होत नाही. त्यांच्या प्रभागात कामे व्हावी, म्हणून काय प्रयत्न झाले? राज्यात सत्ता असून सेनेच्या नगरसेवकांना दीड वर्षात काय लाभ झाला? नगरविकास मंत्री सेनेचे असूनही नगरसेवकांसाठी कोणती योजना आली? त्यांच्या प्रश्नाचे उत्तर पालकमंत्री गुलाबराव पाटील व संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी द्यायला हवे. महापालिका निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या सेनेचे महापौरांसह अनेक नगरसेवक भाजपने पळविले होते, बहुमताच्या लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादीची धुळधाण उडाली असताना सेनेचे १५ नगरसेवक निवडून आले, हे त्यांच्या कर्तृत्वामुळे हे मान्य करायला हवे. त्यांना बळ देण्याऐवजी कोंडी केली जात असेल तर अडीच वर्षाने येणाऱ्या निवडणुकीत सेनेची काय स्थिती राहील?
भाजपची खेळी यशस्वीसेनेत अंतर्गत मतभेद आहेत, हे उघड आहे. त्याला हवा देण्याचे काम भाजपने केले आणि सेनेतील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली. सेनेचे ४ आमदार, एक सहयोगी आमदार व पालकमंत्रीपद असून सेनेचा जिल्ह्यात व शहरात दबदबा जाणवत नाही, ही शिवसैनिकांच्या मनातील खदखद यानिमित्ताने पुन्हा समोर आली आहे. सेना आपापसात भांडत राहिली तर महापालिकेत भाजपचा कारभार सुरळीत राहील, ही भाजपची खेळी आहे. ती यशस्वी झाली, असेच म्हणावे लागेल.