डॉ. संग्राम पाटील, वेदना विशेषज्ञ (पेन स्पेशालिस्ट), लंडन
औद्योगिकरणाचे युग सुरू झाले, तसे मानवी जीवन वेगाने प्रगत झाले, मिळकत - आयुष्यमान वाढले आणि मानवी जीवनाचा दर्जा सुधारला. त्यासोबतच औद्योगिकरणाचे साईड इफेक्ट्सही आले आणि निरनिराळे आजार सुरू झाले. सतत वेळेचा अभाव, धावते जीवन, धकाधकीतून स्पर्धेच्या वातावरणात स्वतःला टिकवून ठेवताना मानवाने स्वतःच्या शरीर आणि मनाला ताण देणारे भयंकर परिणाम करून घेतले. मानवाची निसर्गाशी असलेली जवळीक कमी झाली. सततच्या ताणामुळे शरीरात जे हार्मोनल बदल होतात, ते वेगवेगळ्या आजारांच्या स्वरूपात प्रकट होऊ लागले. अशावेळी जगाच्या अनेक भागात काही निसर्गप्रेमी मंडळींनी निसर्गाशी पुन्हा नाते जुळविल्यास आपले शरीर आणि मनाची झालेली हानी भरून काढता येते काय, यावर अभ्यास करायला सुरुवात केली. आधुनिक काळातील काही मोजक्या प्रयोगांबद्दल या लेखात मी चर्चा केली आहे. जपान सरकारतर्फे १९८२ मध्ये राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत शिनरीन योकु (फॉरेस्ट बाथ) नावाने एक उपक्रम राबविण्यात आला होता. शिनरीन योकु ही संज्ञा जपानी कृषी-वन व मत्स्य मंत्रालयाने प्रचलित केली आहे. शिनरीन योकु याचा अर्थ स्वतःला जंगलात नेणे किंवा जंगलात जाऊन स्नान घेणे होय. या प्रायोगिक उपक्रमाअंतर्गत लोकांना जपानच्या २४ जंगलांमध्ये पाठविण्यात आले आणि निसर्गाच्या सहवासाचा, नैसर्गिक पाण्यात अंघोळ करण्याचा त्यांच्या वेगवेगळ्या शारीरिक प्रक्रियांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. शिनरीन योकुमुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन (कॉर्टिसॉल) कमी झालेला आढळला. हृदयाच्या ठोक्यांची गती आणि रक्तदाबही कमी झाला. म्हणजे हृदय आणि मानसिक अवस्था यांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे सिद्ध झाले. शिनरीन योकु उपक्रमात सहभागी व्यक्तींच्या प्रतिकार पेशी (natural killer- NK cells) अधिक सक्रिय झाल्या. या पेशी जंगल-भ्रमणानंतर महिनाभर अधिक सक्रिय राहिल्या. हे लोक अधिक आनंदी राहिले, त्यांच्यातील नैराश्य आणि चिंतेचे प्रमाण कमी झाले. जंगलातील वृक्ष आपल्या परिसरात काही विशिष्ट रसायने सोडत असतात. त्यामुळे कीटक, जिवाणू, बुरशी यासारख्या धोक्यांपासून झाडांचे रक्षण होते. मानवाला जंगलातील सहवासात या रसायनांचा लाभ मिळतो, असा निष्कर्ष या प्रयोगातून काढण्यात आला. युरोपातील काही निसर्ग आणि पर्यावरणाशी संबंधित संस्थांनी केलेल्या अभ्यासातही असेच निष्कर्ष पुढे आले आहेत. या विषयातील जवळजवळ २०० संशोधनांवरून असा निष्कर्ष निघतो की, हिरवळीच्या जागेचा सहवास लाभणाऱ्या लोकांमध्ये स्थूलतेचे प्रमाण कमी असते आणि त्यांना अँटि-डिप्रेसंट औषधांची गरजही कमी लागते. एका उपक्रमात हिरवळीच्या जवळ असलेली वस्ती आणि हिरवळ नसलेली वस्ती यांच्यातील लोकांची तुलना केली असता असे आढळले की, ज्या वस्तीला हिरवळ उपलब्ध आहे, तिथली जनता हिरवळ उपलब्ध नसलेल्या लोकांपेक्षा सरासरी जास्त व्यायाम करते आणि त्यांच्यात स्थूलता देखील कमी प्रमाणात आढळून येते.डेन्मार्कमधील एका अभ्यासात, हिरवळीपासून किती अंतरावर तुम्ही राहता, त्यानुसार तुमचे आरोग्य कसे प्रभावित होते याबद्दल एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. जे लोक हिरवळीच्या ३०० मीटरच्या आत राहतात, त्यांच्यात व्यायामाची सवय अधिक असते आणि स्थूलपणा कमी असतो. स्पेनमध्येही या अभ्यासाला पूरक असे परिणाम दिसून आले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्यांचे आयुष्यमान, निसर्गात राहणाऱ्या मातांच्या बाळांचे वजन आणि अशा मुलांमधील ॲलर्जीचे प्रमाण या बाबींवर देखील सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. स्कॉटलंडमध्ये तर आता शहरातल्या धकाधकीपासून दूर निसर्गात जाण्याचे मेडिकल प्रिस्क्रिप्शन दिले जाऊ लागलेय. दैनंदिन धकाधकीमुळे ज्यांचे आरोग्य बिघडते, अशा लोकांना स्कॉटलंडची राष्ट्रीय आरोग्य संस्था (NHS) समुद्रावर जाऊन लाटांचे निरीक्षण करा किंवा जंगलात जाऊन अमुकअमुक करा, असे प्रिस्क्रिप्शन देते. या उपक्रमातून रक्तदाब, नैराश्य, चिंता या विकारांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. पाण्यात उतरणे, पोहणे, नुसते पाण्यात डुबकी मारून बसणे याचेही आरोग्यावर उत्तम परिणाम होतात, त्याबाबत पुन्हा केव्हा तरी!