मुकेश अंबानी हे किती दूरदृष्टीचे गृहस्थ आहेत, याचा प्रत्यय देणारी एक गोष्ट सांगतो. गुजरातेत जामनगरला रिलायन्स उद्योगसमूहाची रिफायनरी आहे. या रिफायनरीच्या जवळ मोठी जमीन ओसाड पडली होती. मुकेशभाईंच्या मनात आले की या उजाड जागेवर झाडे लावली तर रिफायनरीमुळे होणारे प्रदूषण शोषले जाईल. त्यांनी त्या नापीक ६०० एकर जमिनीवर आमराई लावायचे ठरवले. तेव्हा अनेक लोक मुकेश अंबानी यांच्याशी असहमत होते. जामनगरच्या जमिनीत आणि हवेच्या आर्द्रतेत खारटपणा आहे. हवाही जोरात वाहते. अशा ठिकाणी आंब्याची झाडे लावणे कितपत योग्य होईल?- याबद्दल अनेकांना शंका होती; पण मुकेशभाईंचा निर्णय झालाच होता. त्यांनी ठरवले होते की या नापीक जमिनीत आमराईच तयार करायची!
ही झाली १९९७ सालची गोष्ट!... आज २३ वर्षांनंतर जामनगरच्या त्या ओसाड जमिनीचे रूप पुरते पालटले आहे. या जमिनीत सुमारे २०० जातींचे दीड लाखांहून अधिक आम्रवृक्ष बहरले आहेत. या आमराईतून जगभर आंबे निर्यात होतात कारण फळांची गुणवत्ता उच्च आहे. जामनगरच्या या आमराईचे नाव आहे ‘धीरूभाई अंबानी लखिबाग आमराई’. लखिबाग हे बादशहा अकबराने बिहारमधील दरभंगाजवळ लावलेल्या आमराईचे नाव होते. हे आपल्याला अशासाठी सांगितले की श्रीमंत होण्यासाठी केवळ नशीब पुरेसे नसते. त्याबरोबर दूरदृष्टी, आवड आणि कामावर निष्ठा लागते. शेवटी धीरुभाईंनी स्वत:च्या हिमतीवर शून्यातून सारे साम्राज्य उभे केले. त्यांच्या पश्चात एका मुलाने ते खूप वाढवले, तर दुसरा अपयशी ठरला. यातून स्पष्ट होते ते इतकेच की वंशपरंपरागत नशिबाने तुम्हाला समजा अपरंपार धनप्राप्ती झाली, तरी त्या आधारावर तुम्ही यश आणि कीर्तीच्या शिड्या सहज चढता जाल असे होत नाही. त्यासाठी ताकद कमवावी लागते, एकाग्रता साधावी लागते आणि महत्त्वाचे म्हणजे संयम, संतुलन राखावे लागते. हे सारे असेल, तर त्या आधाराने तुम्ही यशाची शिडी परिश्रमाने चढू शकता. चढत्या शिडीवरून खाली आपटण्यासाठी मात्र केवळ एक चूक पुरेशी असते.
टाटा- बिर्ला, अंबानी- अदानी, हिंदुजा, एल. एन. मित्तल, सज्जन जिंदल, सिंघानिया, आनंद महिंद्रा किंवा दुसऱ्या कोणाचेही नाव घ्या, तुमच्या हे लक्षात येईल की या प्रत्येकाने सुरुवात शून्यातूनच केली होती. नव्या जमान्यातले उदाहरण नारायण मूर्तींचे आहे. केवळ १०, ००० रुपयाच्या भांडवलावर त्यांनी इन्फोसिसचा पाया घातला होता. अदानी यांनी प्रारंभी असेच छोटे काम सुरू केले होते. या सर्वांच्या सफलतेची कहाणी आज अवघ्या जगासमोर आहे... हे असे नेत्रदीपक यश केवळ नशिबाने मिळत नसते. त्यासाठी परिश्रमांची तयारी असावी लागते आणि दूरदृष्टीही महत्त्वाची असते. असे काही दिसले, की त्यावर शंका घेणे हा आपला राष्ट्रीय स्वभाव आहे. लोक कसलाही विचार न करता बेधडक टीका करत सुटतात.. अंबानी असोत वा अदानी समूह किंवा दुसरे कोणी; लोक जाता-येता म्हणतात की या लोकांवर सरकारची कृपा होती म्हणून हे मोठे झाले. माझ्या मते, या सगळ्या निरर्थक आणि फालतू गावगप्पा आहेत. केवळ सत्ताधारी गटाच्या आशीर्वादाने कोणी कुबेर होत नाही. त्यासाठी स्वतःच्या क्षमतांना ताणण्याची आणि त्यातून काही विलक्षण निर्माण करण्याची जिद्द असावी लागते. मुकेश अंबानी किती आलिशान घरात राहातात, कोणत्या विमानातून फिरतात, त्यांच्याजवळ किती गाड्या आहेत, त्यांच्या घरचे लग्न कसे आणि किती थाटामाटात झाले याची चर्चा नका करू. अंबानी यांनी लाखो हातांना काम दिले, भारतात तंत्रज्ञानाची दुनिया विस्तारली याची चर्चा करा. अनेकांनी बँकांना पंधरा -पंधरा लाख कोटी रुपयांना बुडवले असताना मुकेश अंबानी यांच्यावर मात्र एका पैशाचे कर्ज नाही हे आपल्याला माहीत आहे का? मुकेश अंबानी ज्यात हात घालतात ते क्षेत्र भरभराटीस का येत असावे, याचा विचार करून पाहा. या सर्व उद्योगपतींचे खरे तर आपण आभार मानले पाहिजेत. त्यांच्यामुळेच आपला देश पुढे गेला आहे, जात आहे. मी जेव्हा न्यू यॉर्कमध्ये ताज समूहाचे हॉटेल ‘द पियरे’वर तिरंगा फडकताना पाहतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. टाटा कंपनीने ‘लँड रोव्हर’सारखी कंपनी विकत घेतली ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट नाही काय?
मी इथे ज्यांचा उल्लेख केला, जवळपास त्या सर्वांशी माझा निकटचा संबंध आहे. त्यांची जीवनशैली मी जाणतो. विनम्रता, सहजता आणि एकाग्रता ही यातल्या प्रत्येकाचीच मोठी खासियत आहे. यातले कुणीच एका दिवसात श्रीमंत झालेले नाही. परिश्रम करून ते या मुक्कामावर पोहोचले आहेत. म्हणून म्हणतो, गरिबीला दोष देऊ नका. गरिबी हा अभिशाप अजिबात नाही. आपले कर्म आणि पुरुषार्थाने गरिबीचे रूपांतर श्रीमंतीत करता येते. मला असे शेकडो प्रशासकीय अधिकारी माहीत आहेत जे गरीब घरात जन्माला आले; पण आज मोठ्या हुद्द्यावर आहेत. बाबासाहेब आंबेडकरही गरीब होते; पण आपल्या प्रतिभेच्या बळावर अवघ्या दुनियेसाठी श्रद्धेय ठरले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे तर स्वप्ने कशी साकार होऊ शकतात, याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. त्यांचे वडील मासेमारी करत. कलाम लहानपणी बिड्या विकत. पुढे ते जगातले मोठे वैज्ञानिक झाले आणि देशाच्या सर्वोच्च खुर्चीत विराजमान झाले. लालबहादूर शास्रीही गरिबीतून येऊन देशाचे पंतप्रधान झाले. एके काळी वर्तमानपत्र विकणारे एम. एस. कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. जेफ बेझोस, बिल गेट्स, एलन मस्क, मार्क झुकेरबर्ग यांची सुरुवातही गरिबीतच झाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, बराक ओबामाही वेगळे नाहीत. जगात असे अनेक पंतप्रधान, राष्ट्रपती, उद्योगपती, महान लेखक आणि वैज्ञानिक झाले जे गरीब घरात जन्माला आले होते. त्यांनी त्यांच्या क्षमतेवर गरिबीचा सापळा भेदला. गरिबीला अभिशाप अजिबात मानू नका. पावले उचला, आपल्या क्षमतांचा विकास करा. सफलता तुमची वाट पाहाते आहे. अर्थात समर्पण, वेगळा विचार आणि निष्ठा मात्र लागेलच.. हे असेल, तर मग अशक्य असे काय आहे?
vijaydarda@lokmat.com
(लेखक लोकमत वृत्त समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, आहेत)