सुरेश द्वादशीवार(संपादक, नागपूर)‘जगाच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू बदलत आहे. एकेकाळी तो युरोपमध्ये होता. आता तो अमेरिका व आशियाकडे वळत आहे. त्यामुळे पाश्चात्त्य जगाला यापुढचा विचार आशिया केंद्रित करावा लागेल.’ १९३० मध्ये काँग्रेसच्या लाहोर येथे भरलेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना पं. नेहरूंनी हे उद्गार काढले होते. त्यावेळी त्या उद्गारांकडे साऱ्यांनी एका आशावादी व द्रष्ट्या माणसाच्या भविष्यवाणीसारखे पाहिले होते. आज ती वाणी नुसती खरीच ठरली नाही तर ती जगाच्या अनुभवालाही येऊ लागली आहे... युरोपकेंद्रित पाश्चात्त्य जग दुसºया महायुद्धाच्या अखेरीसच अमेरिकाकेंद्री बनले. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांचे नेतृत्वच तेव्हा अमेरिकेकडे गेले. तो काळ त्या जगाने आशियाई देशांना गृहीत धरण्याचा व फारसे विचारात न घेण्याचा होता. तोवर जगाचे राजकारण अमेरिकेपासून फार तर मॉस्कोपर्यंत मर्यादित राहिले होते.पुढे रशियातील क्रांती यशस्वी होऊन तिला २० वर्षे झाली आणि त्या देशाने पंचवार्षिक योजनांचे सूत्र स्वीकारून त्या यशस्वीही केल्या. लेनिनच्या पश्चात सत्तेवर आलेल्या स्टॅलिनने त्याचा एकछत्री अंमल साºया देशावर कायम केला व त्याचवेळी त्याचे सैन्यबळ शस्त्रास्त्रांच्या जोडीने वाढविले. चीनमधील क्रांतीने सूर धरला होता आणि माओ त्से तुंगाच्या नेतृत्वात त्या प्रचंड देशावर कम्युनिस्टांचे राज्य येण्याची चिन्हे दिसू लागली होती. रशिया आणि चीनचे हे बदलते चित्र उभे होण्याच्या काळातच पाश्चात्त्य देशांमधील तणाव वाढत होेते आणि त्याची परिणती दुसºया महायुद्धात होईल हेही दिसत होते. तशी ती १९३९ मध्ये होऊन त्यात सारा युरोपच दुबळा, विस्कळीत व असंघटित झाला. नेहरूंच्या त्या अध्यक्षीय भाषणाच्या मागचा व पुढचा काळ असा होता. नेहरूंना भारताचे स्वातंत्र्य दिसत होते. पाश्चात्त्यांचा घसरता काळ आणि रशिया, चीन व भारत यांचा उदयकाळ यादरम्यान नेहरूंनी ती भविष्यवाणी उच्चारली होती. पुढच्या दोन दशकात ती खरी ठरली. रशिया सामर्थ्यवान बनला, चीनची क्रांती यशस्वी झाली आणि भारतही स्वतंत्र झाला... याच काळात इंग्लंडचे साम्राज्य लोपले, फ्रान्सचा महायुद्धात झालेला पराभव त्याच्या मर्यादा जगाला दाखवून गेला. जर्मनी बेचिराख तर इटली फार धुळीला मिळालेला. पूर्वेकडील जपानसारख्या महासत्ताही बॉम्बच्या वर्षावानी मोडकळीला आलेल्या. हा पाश्चात्त्यांचा मावळता आणि आशियाचा उगवता काळ होता. एकटी अमेरिका त्या काळात जगावर प्रभाव राखण्याच्या अवस्थेत होती. दुसºया महायुद्धात जर्मनीचा पहिला निर्णायक पराभव करून रशियाच्या फौजा थेट बर्लिनपर्यंत गेल्या तेव्हा जगाला त्या देशाच्या सामर्थ्याचा अंदाज आला. रशिया हा कम्युनिस्ट हुकुमशाही देश असल्याने व अमेरिकेचे तत्कालीन राज्यकर्ते आयसेनहॉवर किंवा डलेस हे कम्युनिझम हे पाप मानणारे असल्याने त्यांच्यातील तणावाला वैचारिक स्तराएवढीच भौगोलिक व राजकीय स्तरावरही सुरुवात झाली. सारा पूर्व युरोप रशियन फौजांनी कम्युनिस्ट बनविला होता व याच काळात चीनमध्ये माओ त्से तुंगाची सत्ता अधिकारारूढ होत होती. परिणामी अमेरिका व पाश्चात्त्य लोकशाह्यांचा एक तर कम्युनिस्टांचा दुसरा असे दोन तट जगात उभे होऊन त्यांच्यातील शीतयुद्धाला सुरुवात झाली. याही काळात इंग्लंडचे साम्राज जगात मोठे होते पण त्यावर हुकूमत राखण्याएवढी ताकद त्या देशांजवळ उरली नव्हती. पाश्चात्त्य लोकशाह्यांकडे असलेले सत्तेचे केंद्र रशियाच्या वाढत्या बळामुळे विभागले गेले व जगात दोन प्रबळ सत्ताकेंद्रे उभी राहिली.शीतयुद्धाचा काळ जसजसा लोटत गेला तसतसे जगातील इतर देशही प्रबळपणे पुढे येऊ लागले. चीनच्या उदयानंतर व विशेषत: डेंगच्या सत्ताकाळात चीनने लष्करी व आर्थिक विकासाची मोठी गती गाठली. त्यामुळे सत्तेचे पूर्वेकडील केंद्र क्रमाने बळकट होऊ लागले व स्वाभाविकच त्याची परिणती पाश्चात्त्यांचे केंद्र दुबळे होण्यात दिसू लागली. आता ही घसरण पूर्ण झाली आहे. चीन बलाढ्य झाला आणि मध्य आशियापासून थेट युरोपच्या पश्चिम सीमेपर्यंत आपली औद्योगिक हुकूमत कायम करण्याच्या प्रयत्नाला लागला. रशियाचे साम्राज्य मोडले तर मॉस्कोची सत्ता व प्रभाव यात त्यामुळे फारसा फरक पडला नाही. याउलट तिकडे अमेरिकेच्या आताच्या अध्यक्षांनी पाश्चात्त्य राष्ट्रांचे ऐक्य मोडीत काढायला सुरुवात केली आहे. इंग्लंड, कॅनडा, फ्रान्स व जर्मनीसारखे देश एकेकाळी अमेरिकेकडे नेतृत्वासाठी व सुरक्षेसाठी पाहात. आता त्या नेतृत्वानेच ते ओझे नाकारले आहे व पूर्वीच्या आपल्या मित्रदेशांवर नवे आयात कर लादून त्यांना अडचणीतही आणले आहे. ते करताना तुम्ही मैत्रीच्या नावावर अमेरिकेला आजवर लुटून खाल्ले असाही आरोप अमेरिकेच्या अध्यक्षांनी केला आहे. हा काळ चीनच्या वाढत्या प्रभावाचा आहे. भारत वगळता आशियातील प्रमुख देशांनी त्याच्या औद्योगिक कॉरिडॉर नावाच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मान्यताही दिली आहे. नेहरूंचे १९३० चे द्रष्टेपण प्रत्यक्षात अवतरताना आज दिसत आहे. जपान सामर्थ्यवान होत नाही, आॅस्ट्रेलियाची ताकद वाढत नाही आणि बाकीचे पौर्वात्य देश (उत्तर कोरियाच्या दांडगाईचा अपवाद वगळता) चीनला शह देण्याच्या अवस्थेत नाही. ती अपेक्षा भारताकडून होती पण गेल्या ५० वर्षात भारताला ती बरोबरी करता आली नाही.अमेरिकेच्या घसरणीलाही आता सुरुवात झाली आहे. पहिल्या महायुद्धाच्या अखेरपर्यंत त्या देशाने द. अमेरिकेचा सारा मुलूख आपल्या राजकीय नियंत्रणात ठेवला व त्याच्या कारभारात युरोपसह पूर्व गोलार्धातील देशांनी हस्तक्षेप करू नये हे १८२० मध्येच तेव्हाचे त्याचे अध्यक्ष जेम्स मन्रो यांनी जगाला बजावले. दुसºया महायुद्धाच्या अखेरीस द. अमेरिकेतील देश तोवरच्या ‘बंदीवासातून’ मुक्त होऊन अमेरिकाविरोधी बनले आहे. तिकडे इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, जर्मनी व स्पेन यांचे साम्राज्य व त्यांचा आशिया आणि आफ्रिकेवरील ताबा संपला आहे. वसाहतींची लूट संपल्याने याही देशांच्या अर्थकारणाला व एकूणच राजकीय वजनाला उतरती कळा आली आहे.हा काळ आशियाच्या उठावाचा आहे. या खंडातील भारतासह बहुतेक सारे देश स्वतंत्र झाले आहेत. रशिया व चीन त्यांच्या समृद्धीचा अनुभव घेत आहेत. हे चित्र नेहरूंनी १९३० मध्येच पाहिले होते. पाश्चात्त्यांच्या वर्चस्वाला लागणारी ओहोटी ते तेव्हापासून पाहात होते. शिवाय नेहरूंची भविष्यवाणी अमेरिकेच्या ट्रम्पने आपल्या हडेलहप्पी राजकारणाने आता आणखीही खरी केली आहे. अमेरिकेने पुन्हा एकवार मन्रोचे संरक्षक धोरण स्वीकारले आणि युरोपच्या आर्थिक व्यवहारावर आघात करण्याचे धोरण आखले आहे. त्याआधी इंग्लंडनेही युरोपीय बाजारातून माघार घेऊन युरोपच्या राजकीय व आर्थिक वर्चस्वाला धक्का दिला आहे. त्या तुलनेत आशियातील देश संघटित नसले तरी पाश्चात्त्यांच्या वेगळे होण्याच्या बाधेपासून ते दूर मात्र नक्कीच राहिले आहेत. पं. नेहरू भारताचे भाग्यविधातेच नव्हते तर जगाच्या राजकारणाचे अचूक जाणकार होते हा या इतिहासाचा धडा आहे.
सत्ताकेंद्रातील बदल व नेहरूंचे द्रष्टेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 5:18 AM