एरवी एक पोक्त, समंजस, परिपक्व, स्वत:ची प्रतिष्ठा राखतानाच समोरच्याचा आब राखणारे आणि मृदुभाषी सद्गृहस्थ अशीच प्रफुल्ल पटेल यांची महाराष्ट्राला आणि देशालाही ओळख आहे. त्यातून ते त्यांच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचे निकटवर्ती आहेत असेही मानले आणि समजले जाते. ते खरोखरीच तसे आहेत का, की आपण केवळ मराठा-पाटलांचे नेते आहोत असे लोकाना वाटू नये (यात वाटण्यासारखे काहीही नाही हा भाग वेगळा) म्हणून एखादा पटेलदेखील सोबतीला असलेला बरा म्हणून शरद पवार-पाटील यांनी प्रफुल पटेल यांना जवळ केले आहे, हे काही सांगता येणार नाही. पण आजवरचा अनुभव जमेस धरता केवळ पटेलच नव्हेत तर पवारांच्या पक्षातील कोणतेही पाटील किंवा पवार जे बोलतात त्यामागे थोरले पवारच असतात आणि आपण उगाचच काही बोलत नसतो असे पवारांच्या थोरल्या पातीने याआधीच स्पष्ट केलेले असल्याने प्रफुलभाई अचानक काँग्रेस पक्षावर का घसरले, कोणाच्या सांगण्यावरुन घसरले आणि कशासाठी घसरले याविषयी फार तर्ककुतर्क करीत बसण्याचे कारण नाही. ‘हम तो डुबेंगे सनम मगर आप को भी लेकर डुबेंगे’ असा एक अत्यंत घासून गुळगुळीत झालेला संवाद अधूनमधून कानी पडत असतो. प्रफुल पटेलांनी केवळ हा संवादच नव्हे तर त्यामागील कृतीदेखील काँग्रेसच्या नावावर वर्ग करुन टाकली आहे. काँग्रेस तिच्या कर्तुकीने बुडाली पण आम्हालादेखील घेऊन बुडाली अशी आरोपवजा खंत वा तक्रार त्यांनी केली आहे. एक-दोन नव्हे चांगली पंधरा वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून देशाच्या आणि महाराष्ट्राच्याही सत्तासागरात सुखेनैव नौकाविहार करीत होते. पण त्या संपूर्ण काळात आमची ताकद फार फार तर पुणे आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही स्थानिक स्वराज्य संस्था व काही सहकारी संस्था ताब्यात ठेवण्याची असताना काँग्रेसमुळे आम्हाला संपूर्ण देशाच्या व त्याचबरोबर राज्याच्याही सत्तेत वाटेकरी होता आले, असे काही पटेल वा त्यांचे नेते पवार यांनी म्हटल्याचे कोणाला आठवत नाही. मुद्दा असा की, सत्तासागरात मोदी नावाची त्सुनामी आल्यानंतर काँग्रेसची नाव गटांगळ्या खाऊ लागली म्हटल्यावर तिच्या हातात हात घालणाऱ्या राष्ट्रवादीची हालत त्यापेक्षा वेगळी होण्याचे काही कारणच नव्हते. प्रत्यक्षात मोदी नावाची त्सुनामी येण्याआधीच केन्द्रातील संपुआचे आणि राज्यातील आघाडीचे अशी दोन्ही सरकारे मतदारांच्या मनातून उतरण्यास सुरुवात झाली होती. यातील अत्यंत विचित्र योगायोग म्हणजे केन्द्रातील सरकारवर मतदारांची जी इतराजी वृद्धिंगत होत गेली तिला काँग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा संपुआतील अन्य घटक पक्षांचे मंत्रीच जबाबदार होते. त्यापायी मनमोहनसिंग यांच्यासारख्या आंतर्बाह्य स्वच्छ पंतप्रधानाच्या अंगावरदेखील आरोपाचे शिंतोडे उडले गेले. महाराष्ट्राचा विचार करता येथेही काँग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या लीलांमुळेच काँग्रेस पक्षाला वारंवार लज्जीत होणे भाग पडत गेले. असे असताना महाराष्ट्रात ज्यांना महाघोटाळे म्हणून संबोधले जाते, ते प्रत्यक्षात महाघोटाळे नव्हतेच, तर ते होते राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे महाषडयंत्र आणि या षडयंत्राचे म्होरके होते तेव्हांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, असे जेव्हां प्रफुलभाई म्हणतात तेव्हां त्यांना त्यांच्या पक्षातील अन्य मंत्र्यांचे तर राहोच पण छगन भुजबळ यांचेदेखील विस्मरण झाले असावे असे दिसते. तरीही पटेल यांच्या या विधानामुळे आपण अन्य काहीही नसले तरी किमान षडयंत्र रचू शकतो आणि ते यशस्वी करुन शरद पवारांसारख्या बलदंड नेत्याच्या पक्षातील बाहुबलींना जेरीसही आणू शकतो, हे वाचल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना नक्कीच गुदगुल्या झाल्या असतील, यात शंका नाही. प्रफुल पटेल यांनी केलेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, राष्ट्रवादीतील काही नेते (येथे पटेल असे वाचावे) पंतप्रधानांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे कारण आपल्या पक्षातील काही मंत्री आणि नेत्यांच्या पूर्वकर्मांमुळे त्यांच्या मनात मोदींविषयी भीती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. अर्थात केवळ नरेन्द्र मोदी एकटेच नव्हेत तर त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखीही काही सदस्यांशी मधुर संबंध प्रस्थापित करण्यासाठी खुद्द शरद पवार कसे प्रयत्नशील असतात ते तमाम महाराष्ट्र बघतच असतो. त्यातून विकास साधून घ्यायचा असेल तर केन्द्रीय सत्तेशी सलोखा असावाच लागतो, हे विधानदेखील पवारांनी अनेकदा केले आहे आणि पवार उगाचच काही बोलत नसतात हे आमचे वाचक जाणतातच. यातील खरा मुद्दा आणखीच वेगळा आणि पवारांच्या या भूमिकेशी साधर्म्य राखणारा आहे. आज काँग्रेस अत्यंत गलितगात्र अवस्थेत असल्याने कोणीही यावे टपली मारुन जावे असे तूर्तासचे तिचे प्राक्तन आहे. ही अवस्था जेव्हां बदलेल तेव्हां पवार-पटेलदेखील बदलतील. वाऱ्याप्रमाणे बदलणे हे त्यांचे मुकद्दर नसते तर पवार सोनियांच्या पक्षाबरोबर कधी जातेच ना !
सत्तेच्या गोंदाअभावी!
By admin | Published: September 14, 2016 4:59 AM