भारतीय क्रिकेट संघातील दोन तरुण खेळाडू, हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुल यांनी एका दूरचित्रवाणीवरील केलेल्या वक्तव्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन शिक्षेचा निर्णय होणार असल्याने त्या प्रकरणाच्या तपशिलाबाबत भाष्य करणे उचित होणार नाही. मात्र, यानिमित्ताने प्रसिद्धीच्या झोतात येणाऱ्या क्रीडापटूंनी आपली वर्तणूक सार्वजनिक आयुष्यात कशी ठेवावी, हा विषय चर्चिला जात आहे.
माध्यमांच्या, विशेषकरून सोशल मीडियाच्या या युगात खेळाडूंना एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले जाते. मात्र, एखाद्या अप्रिय घटनेने तेवढ्याच पटकन त्यांची प्रतिमा धुळीस मिळते. टिष्ट्वटरसारख्या गतिमान माध्यमाने एखाद्या बातमीचा क्षणात स्फोट होतो. खेळाडूही त्यांची प्रतिमा जोपासण्यासाठी सतत अशा माध्यमांच्या संपर्कात असतात. त्यामुळे सार्वजनिक आयुष्यात वर्तणूक योग्य राहील यासाठी अशा खेळाडूंनी सतर्क असणे आवश्यक आहे.
यापूर्वीही अनेक जागतिक कीर्तीच्या खेळाडूंना खेळाव्यतिरिक्त गैरवर्तणुकीच्या घटना सार्वजनिक आयुष्यात आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. टायगर वुड्ससारख्या सुप्रसिद्ध गोल्फ खेळाडूचे उदाहरण जगासमोर आहे. प्रसिद्ध खेळाडूंकडे आणि भारतात विशेषकरून क्रिकेटपटूंकडे नवी पिढी ‘आयकॉन’ आदर्श म्हणून पाहते. त्यामुळे त्यांच्यावर विशेष जबाबदारी आहे. चुकीची वक्तव्ये आणि शेरेबाजी कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम करू शकतात. सन २००६ मध्ये क्रिकेट समालोेचक व माजी आॅस्ट्रेलियन टेस्ट फलंदाज डीन जोन्स याला समालोचनादरम्यान दक्षिण आफ्रिकी खेळाडू हशीम आमलाचा उल्लेख ‘अतिरेकी’ असा केल्याबद्दल सेवामुक्त करण्यात आले होते.‘नथिंग सक्सीक्ड्स लाइक सक्सेस...’ असे म्हटले जाते. एकदा यश मिळाले की संपत्तीची दारे खुली होतात, प्रसिद्घी मिळते आणि त्यापाठोपाठ कंपन्याही पुरस्कृत करतात. सध्याच्या वेगवान युगात मिळणारी झटपट प्रसिद्घी आणि संपत्ती काही जणांना अतिरिक्त आत्मविश्वास देऊन जातात. मग एका क्षेत्रातील यश हे सर्वत्र वापरता येते, असा ठाम समज होतो. बहुतेक खेळाडू हे उत्तम वक्ते नसतात; किंबहुना तसे असणे अपेक्षितही नाही. मात्र, यामुळेच सार्वजनिक आयुष्यात बोलताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे.
यामुळेच यशाकडे आणि प्रसिद्घीकडे वाटचाल करणाºया खेळाडूंना सार्वजनिक आयुष्यात वागण्याचे प्रशिक्षण दिले जावे, असा विचार आता मांडला जात आहे. आपल्या जाहीर वर्तणुकीचे कसे आणि कोणते परिणाम आणि दुष्परिणाम होतात, हे त्यांनी लक्षात घ्यावयास हवे. अशा प्रकारची संवेदनशीलता यावी, यासाठी योग्य वेळी समुपदेशन मिळाले तर अनेक अनावश्यक कटू प्रसंग टाळता येतील. अर्थात यासाठी खेळाडूची इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वाची. या प्रक्रियेत त्याचाच सहभाग आणि इच्छाशक्ती महत्त्वाची.सार्वजनिक जीवनातील योग्य वर्तणुकीची देणगी काही खेळाडूंना जन्मजात असते, तर काही ती प्रयत्नपूर्वक मिळवतात. मात्र, काही आपल्या अनुभवातूनच शिकतात. एखादा अनुभव पचवून पुढे जाता येते; मात्र एखादा कारकीर्दच संपवू शकतो. विचार ज्याचा त्याने करायचा आहे.- अॅड. अभय आपटेमहाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष