माजी उड्डयन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे सोनिया गांधी व शरद पवार या दोन्ही पक्षाध्यक्षांशी निकटचे संबंध आहेत. त्या दोघांतील संवाद कायम राखण्याचे काम त्यांनी एवढी वर्षे केले व त्या दोघांचा विश्वासही संपादन केला. एक यशस्वी मंत्री आणि दूरदृष्टीचा कार्यकर्ता अशीही त्यांची ओळख आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत या अनुभवी नेत्याने, येत्या काळात देशातील विरोधी पक्षांनी उभारी घेण्याची आवश्यकता आहे असे म्हटले आहे. त्याचवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनीही एकत्र येणे गरजेचे आहे असे ते म्हणाले आहेत. त्यांचे हे प्रतिपादन जेवढे महत्त्वाचे तेवढीच यासंदर्भातील त्यांची जबाबदारीही मोठी व महत्त्वाची आहे. देशातील भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्याचे व राष्ट्रपतींच्या येत्या निवडणुकीत त्यांचा संयुक्त उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न देशात सुरू आहेत. नितीशकुमार, लालूप्रसाद, ममता बॅनर्जी व फारूख अब्दुल्ला यांच्या या प्रयत्नांना सोनिया गांधी व त्यांचा काँग्रेस पक्षही अनुकूल आहे. सोनिया गांधींनी त्यासाठी स्वत:च अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. अशी भेट घेतलेल्या नेत्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारही एक आहेत. मात्र त्यांच्या भेटीनंतर त्या दोघांनी काही सांगण्याआधीच ‘सोनिया गांधींनी सुचविलेली राष्ट्रपतिपदाची उमेदवारी पवारांनी नाकारली’ अशा आशयाचे कोणताही आधार वा स्रोत न सांगणारे वृत्त माध्यमांमध्ये प्रकाशित झाले आहे. पवारांनी उमेदवारी घेणे वा न घेणे हा त्यांचा व्यक्तिगत आणि वेगळा प्रश्न आहे. खरा प्रश्न सर्व विरोधी पक्षांकडून साऱ्यांना चालणारा एक उमेदवार असावा की असू नये हा आहे. पवारांची मूल्यनिष्ठा संशयातीत आहे. ते समाजवादी व सेक्युलर भूमिका घेणारे आहेत. मोदींनी त्यांच्या कितीही भेटी घेतल्या तरी ते भगवी वस्त्रे कधी परिधान करायचे नाहीत. प्रश्न, त्यांचे आणि काँग्रेसचे विरोधी ऐक्याबाबत एकमत होणे हा आहे आणि हे काम प्रफुल्ल पटेलांवाचून करू शकेल असा दुसरा नेता त्या दोन्ही पक्षात आज नाही. सीताराम येचुरी आणि डावे पक्ष राजी असताना व बिहार, उत्तर प्रदेश व बंगालमधील भाजपेतर पुढारी तयार असताना विरोधी आघाडीत उघडपणे यायचे कोण बाकी राहते? एकटे पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष. प्रफुल्ल पटेल त्याच पक्षाचे वरिष्ठ नेते व पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. विरोधकांनी एकत्र येण्याची व उभारी धरण्याची गरज त्यांना वाटत असेल तर त्यांची पहिली जबाबदारीच पवारांना काँग्रेससोबत आणणे ही ठरते. तसेही या मुलाखतीत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना आज ना उद्या एकत्र यावेच लागेल असे म्हटलेही आहे. भाजपाच्या अलीकडच्या विजयांनी सगळेच पक्ष कोलमडल्यागत झाले आहेत. त्यामुळे उभारी धरण्याची पटेल म्हणतात ती वेळ कोणत्या मुहूर्तावर यायची आहे? सगळे प्रादेशिक पक्ष भाजपाकडून एकेक करून चिरडले गेल्यानंतर की काँग्रेस या दुसऱ्या एकमेव राष्ट्रीय पक्षाने त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे गमावल्यानंतर? देशातील विरोधी पक्षांची एकजूट राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची नाही, त्यांच्या सबलीकरणासाठीही ती महत्त्वाची नाही. तिचे महत्त्व या देशातील लोकशाही निकोप व प्रबळ राखण्यासाठी आहे. भाजपाचे एक घोषवाक्य देश काँग्रेसमुक्त करणे हे आहे. मात्र त्या पक्षाची महत्त्वाकांक्षा तेवढ्यावर थांबणारी नाही. त्याला हा देश पूर्णपणे विरोधमुक्त करायचा आहे. त्यासाठी त्याला काँग्रेससोबत विरोधात जाणारे अन्य प्रादेशिक पक्षही संपवायचे आहेत. नवीन पटनायकांच्या विरोधात त्याने आतापासून चालविलेली मोर्चेबंदी या संदर्भात पहावी अशी आहे. ओडिशाच्या इतिहासात कधीकाळी होऊन गेलेल्या महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या जोरात सुरू करण्याचा त्याचा प्रयत्न केवळ याचसाठी आहे. हीच बाब इतर प्रादेशिक पक्षांबाबतही त्याला करायची आहे. शिवसेनेशी त्याने चालविलेला उंदीर व मांजराचा खेळ त्याच दिशेने जाणारा आहे. शरद पवारांशी बोलणी सुरू ठेवायची आणि त्यांचा पक्ष कायम दुबळा राहील असे प्रयत्न करायचे हाही भाजपाच्या याच राजकारणाचा भाग आहे. विरोधी पक्षांवाचून देशात लोकशाही टिकायची नाही. सरकार पक्षाला पर्याय म्हणून एक विरोधी पक्ष देशातील जनतेलाही सदैव हवा असतो. प्रबळ विरोधक नाहीत म्हणून नाइलाजाने आहेत त्याच सत्ताधाऱ्यांना मते देत राहणे हा लोकशाहीतील जनतेवर लादलेला अन्यायही आहे. तो दूर करण्याची साऱ्या विरोधकांची आता तयारीही आहे. त्यात काँग्रेस सहभागी आहे, डावे पक्ष त्याला राजी आहेत. मात्र या प्रयत्नांना चालना देण्यासाठी देशातील सर्वच पक्षांच्या नेत्यांशी अतिशय व्यक्तिगत पातळीवरून संबंध ठेवणाऱ्या शरद पवारांच्या अनुभवी पुढाकारांची व प्रयत्नांची गरज आहे. साऱ्यांना संभ्रमात ठेवण्याच्या त्यांच्या राजकारणाचे दिवसही आता संपले आहेत. त्या नेतृत्वाचे लखलखतेपण प्रगट होणेही आज गरजेचे आहे. त्याचमुळे जो उपाय प्रफुल्ल पटेल यांनी देशाला ऐकविला आहे तो त्यांनीच अंमलात आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी शरद पवार व सोनिया गांधींना त्यांच्या पक्षासह एकत्र आणण्यात पुढाकार घेणे हे उत्तरदायित्वही त्यांचेच आहे. प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या विनयी व सौजन्यशील व्यवहाराने हे करू शकणारे नेते आहेत.
प्रफुल्लभाई, तुम्हीच पुढाकार घ्या...
By admin | Published: May 31, 2017 12:24 AM