- वसंत भोसले, संपादक, लोकमत, कोल्हापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्नाटकात रोड शो सुरू झाले आहेत. सुमारे एक डझन केंद्रीय मंत्री सध्या कर्नाटकाचा दौरा करीत आहेत. शिवाय भाजपचे चार मुख्यमंत्री दौऱ्यावर येणार आहेत. हजारो कोटी रुपयांच्या योजनांची तसेच प्रकल्पांची भूमिपूजने होत आहेत.. म्हणजे मुहूर्त ठरला आहे, निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर करायला आता हरकत नाही!
दोन आठवड्यांत पंतप्रधान मोदी यांची बेळगाव, धारवाड आणि मंड्या येथे तीन मोठी शक्तिप्रदर्शने झाली. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पादेखील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपला कोणत्याही परिस्थितीत २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी २०२३ मधील दोन टप्प्यातील विधानसभांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. पुढील महिन्यात कर्नाटकची निवडणूक, या वर्षअखेरीस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. या चार राज्यांत दक्षिण कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दलाचे छोटेसे अस्तित्व वगळता भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना होणार आहे. या निवडणुकांतून पुढील वर्षाच्या राजकारणाचे वळण निश्चित होईल. प्रत्येकी दोन राज्यात सत्ता असलेल्या काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागेल.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा राजकीय प्रवास कर्नाटकातूनच सुरू झाला आहे. त्यांचे हे गृहराज्य आहे. शिवाय राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर ईशान्येकडील छोट्या तीन राज्यांचा अपवाद वगळला तर ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. कर्नाटकातील यशावर काँग्रेसचे भवितव्य आणि २०२४च्या राजकारणाचे वळणही स्पष्ट होणार आहे. कर्नाटकाच्या निकालानंतर काँग्रेसला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपशी थेट सामना करावा लागेल. कर्नाटकात यावेळी भाजपला निवडणूक जड जाईल, असे दिसते. कारण येडियुराप्पा या लोकप्रिय नेत्याला भाजपने हळूहळू बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यांनी भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याचा निर्धार केला असला तरी राज्याचे नेतृत्व ते करणार नाहीत. कारण त्यांनी निवडणुकांच्या राजकारणातून संन्यास जाहीर केला आहे.
विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना जनाधार नाही. सरकारची कामगिरी नेत्रदीपक नाही. नरेंद्र मोदी यांची प्रतिमा, धार्मिक ध्रुवीकरण आणि लिंगायत समाजाने निर्णायक भूमिका घेऊन पाठिंबा दिला तरच भाजप पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे दिसतात. काँग्रेसमध्ये गटबाजी असली तरी एस. सिद्धरामय्या यांचेच नेतृत्व स्वीकारण्याची तयारी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केल्याचे दिसते. दोन्ही नेत्यांनी ‘प्रजा ध्वनी यात्रा’ (प्रजेचा आवाज) काढून संपूर्ण कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. दक्षिण कर्नाटकात काँग्रेसला जनता दलाची डोकेदुखी होईल असे दिसते. मंड्या, बंगळुरू ग्रामीण, कोलार, चित्रदुर्ग, हसन शिमोगा, तुमकूर, म्हैसूर, चामराजनगर आदी जिल्ह्यांत जनता दलाची ताकद आहे. या परिसरात वक्कलिगा समाज मोठ्या प्रमाणात आहे.
तो अनेक वर्षे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना साथ देतो. त्यामुळेच काँग्रेसने डी. के. शिवकुमार या नेत्याला अधिक महत्त्व दिले आहे. त्यांचे संघटन कौशल्यही महत्त्वाचे ठरत आहे. कर्नाटकातील लिंगायत, वक्कलिगा, धनगर, दलित आणि अल्पसंख्याक हे पाच प्रमुख समाज घटक आहेत. दलितांनी काँग्रेसला साथ दिली तर बहुमतापर्यंत जाण्यास काँग्रेसला अडचण येणार नाही. शिवाय बोम्मई सरकारचा कारभार भ्रष्टाचाराने भरलेला आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्यात काँग्रेसला काही प्रमाणात यश आलेले दिसते. या निकालाने त्यानंतरची तीन राज्ये आणि पुढील वर्षातील सार्वत्रिक निवडणुकीची दिशा निश्चित होणार आहे. काँग्रेसला हार पत्करावी लागली तर देशपातळीवर महाआघाडीला देखील आकार मिळण्यात अडचणी येतील. त्यासाठी ही निवडणूक नवे वळण घेणारी ठरेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"