- किरण अग्रवाल
देशातील श्रीमंतांची संख्या वाढल्याच्या वार्ता अलीकडेच वाचावयास मिळाल्या असल्या तरी, जगण्यासाठी धडपड वा झगडा करावा लागत असलेल्यांची संख्या काही कमी झालेली नाही. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने असंख्य कुटुंबांचे अर्थकारण बिघडवून ठेवले असताना आता रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धामुळे पुन्हा त्यात भर पडू पाहत आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकाही संपल्या आहेत. तेथील निकाल आज घोषित झाले की महागाईचा भडका उडेल; त्यासाठी तयार राहा, असेही सांगितले जात आहे. थोडक्यात, महागाईची मार टळणार नसल्याने सामान्यजनांच्या हलाखीत भरच पडण्याची शक्यता आहे.
युद्ध रशिया व युक्रेनमध्ये सुरू असले तरी त्याचा फटका संपूर्ण जगाला बसणे स्वाभाविक आहे. कारण रशिया हा खनिज तेलाचा सर्वांत मोठा निर्यातदार देश असून, युद्धामुळे खनिज तेलाचे दर वाढले आहेत. युद्धखोर रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेसह जगभरातील काही देशांनी तेथून होणारी तेल आयात थांबविण्याची भाषा चालविली आहे. तसे झाले तर अधिकच पंचाईत होईल. इंधन महागले की पर्यायाने वाहतूक खर्च वाढून सर्वच बाबतींत महागाईचे संकट ओढावेल. युद्धाच्या परिणामी डॉलरही वधारला आहे. शेअर बाजारातही रोज आपटबार फुटत आहेत. एकूणच चहूबाजूने आर्थिक कोंडी होत असून, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणे स्वाभाविक ठरत आहे. त्यामुळेच आगामी काळात इंधन दरवाढीसह इतर महागाईसाठी तयार राहा, असे सांगितले जात आहे.
खरेतर, महागाईसाठी तयार काय राहायचे? कारण ती स्वीकारण्याखेरीज पर्याय तरी कोणता आहे सर्वसामान्यांकडे? कोरोनाचे संकट ओसरत असले तरी या काळात पहिल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात सुमारे ९९ टक्के सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात घट झाली असून, तब्बल १६ कोटींपेक्षा अधिक लोक गरिबीच्या श्रेणीत ढकलले गेले आहेत. अलीकडेच झालेल्या दावोस अजेंडा शिखर परिषदेत ऑक्सफेमने यासंबंधीचा अहवाल सादर केला आहे. कोरोनानंतर उद्योगधंदे पूर्ववत सुरू होत असून, अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे सांगितले जात असले तरी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली व टिकून असल्याचे नाकारता येणारे नाही. सामान्यांचे एकूणच बजेट कोलमडून गेले आहे, त्यातून आलेली निराशेची सय अजून सरलेली नसताना आता युद्धामुळे महागाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागले की महागाईचा भडका उडेल. त्यादृष्टीने अगोदरच साठेबाजी होत असल्याचे दिसून येत आहे. तसेही निकालाअगोदरच काही बाबतींत दरवाढ झालीच आहे. तेल उत्पादक कंपन्यांनीही इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे, त्यामुळे इंधन दरवाढ होणे निश्चित आहे. प्रश्न एवढाच की, ही महागाई स्वीकारून सामान्याने जगायचे कसे? कोरोनामुळे अगोदरच अडचणीत आलेली आर्थिक स्थिती पुन्हा बिकट होऊ घातल्याने अनेकांच्या जगण्या-मरण्याचाच प्रश्न निर्माण होणार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या पुन्हा वाढू लागल्याचे आकडे बोलत आहेत. महागाईने कर्जबाजारीपणा वाढीस लागून त्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतील. महागाई स्वीकारण्यासाठी, म्हणजे जीव देण्यासाठी तयार राहायचे का, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होणारा आहे.