कोणत्याही देशाची शक्ती ही युवकांमध्ये दडलेली असते. या शक्तीला विधायक दिशा दिली तर देशात नंदनवन फुलू शकते व हीच शक्ती विघातक दिशेने गेली तर विध्वंस निश्चित ठरलेला असतो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याच भीतीकडे अंगुलीनिर्देश केला आहे. देशाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये राष्ट्रपतींनी युवा शक्तीच्या विधायक शक्तीला आवाहन केले आहे. हे आवाहन केवळ उपचारापुरते नाही तर गेल्या काही महिन्यापासून देशातील युवकांच्या आंदोलनाची या विधानाला पार्श्वभूमी आहे. जेएनयू, जामियामिलिया इस्लामिया विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ एवढेच नव्हे तर देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या आयआयटीचे विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत आहे. म्हणूनच राष्ट्रपतींनी व्यक्त केलेली चिंता निश्चितच दखलपात्र ठरते.
भारताला युवकांचा देश संबोधले जाते.एवढी युवा शक्ती जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही देशात नाही. ही शक्ती भरकटलेल्या अवस्थेत राहिली तर निश्चित समाजाला व पर्यायाने देशाला घातक सिद्ध होणार आहे. युवावस्थेचा काळ हा आयुष्याला वेगळी दिशा देणारा असतो. या काळात घडलेल्या घटना व घेतलेले निर्णय पुढील वाटचाल निश्चित करते. स्वामी विवेकानंद यांनी युवावस्था ही आयुष्यातील सर्वोत्कृष्ट अवस्था असून भविष्यातील वाटचाल हा काळ ठरवित असतो, असे म्हटले आहे. जगात लागलेले अनेक शोध युवा संशोधकांनी लावले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा जगविख्यात सिद्धांत आयझॅक न्यूटन यांनी मांडला. तेव्हा ते चाळिशीत होते. संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या २१ व्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ लिहून मराठी सारस्वतामध्ये अढळ स्थान निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवघ्या १६ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. पानिपतच्या युद्धानंतर ढासळलेला मराठा स्वराज्याचा ध्वज पुन्हा उंच करून अवघ्या २८ व्या वर्षी श्रीमंत माधवराव पेशवे यांनी जगाचा निरोप घेतला. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शहीद भगत सिंग अवघ्या २४ व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर गेले. जगाच्या इतिहासावर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणाºया व जगातील युवकांसाठी आदर्श ठरलेल्या महामानवांची ही ठळक उदाहरणे आहेत.
या युवा शक्तीचा वापर यापूर्वीही देशात अत्यंत सकारात्मक पद्धतीने झाला आहे. १९२० मध्ये महात्मा गांधी यांच्याकडे स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आल्यानंतर युवकांचा स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग वाढला होता. एवढेच नव्हे तर स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्वच त्यांनी युवकांकडे सोपविले होते. १९२९ मध्ये लाहोरमध्ये रावी नदीच्या काठावर झालेल्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू केवळ ३९ वर्षांचे होते. युवा सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. युवा शक्तीला शिस्तीचे धडे देण्यासही महात्मा गांधी विसरले नव्हते. असहकाराचे आंदोलन सुरू असताना चौरीचौरा येथील पोलीस चौकीवर आंदोलकांनी १९२२ मध्ये हल्ला केला व पोलीस चौकी जाळून टाकली होती. या घटनेने महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन स्थगित केले होते. युवकांनी हिंसेचे अस्त्र हातात घेतल्याने महात्मा गांधी यांंना पीडा झाली होती. या घटनेचा पश्चात्ताप म्हणून त्यांनी उपोषण केले होते. यावेळी काँग्रेसच्या अनेक धुरिणांनी महात्मा गांधी यांच्या निर्णयाचा विरोध केला होता. पण ते निर्णयावर ठाम राहिले व काँग्रेसच्या त्या काळच्या धुरिणांनाही मग त्यांच्या निर्णयाचा आदर करावा लागला.
आज आपल्यात महात्मा गांधी नाहीत. परंतु त्यांनी दिलेले विचारधन व त्यांचे जीवनआदर्श आपल्याजवळ आहेत. आणीबाणी काळात युवकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व युवकांच्या आंदोलनाला लाभले होते. काही वर्षांपूर्वी आसामच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन प्रफुल्लकुमार महंत या विद्यार्थी नेत्यानेच केले होते. या सर्व आंदोलनांची वाटचाल शांततेतून झाली. देशातील युवक आज पुन्हा अस्वस्थ झाला आहे. ही अस्वस्थ तरुणाई या विचार वाटेवरून चालली तरच युवकांच्या मनातील प्रश्नांचे निराकरण शक्य आहे. हीच शक्ती देशाला विकासाचे नवे दालन उपलब्ध करून देईल. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे युवकांना केलेले आवाहन म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे.