सचोटी, चिकाटी, शिस्त आणि परिश्रम या सर्वच स्तरांवर पुणेकरांच्या मनात ‘चितळे बंधू’ या ब्रँडविषयी एक आदराची, आत्मीयतेची व जिव्हाळ््याची भावना आहे़ पुणेकरांची एक खासियत अशी, की गाण्यातला असो की खाण्यातला; त्यांना दर्जा लागतोच. ‘चितळे बंधू मिठाईवाले’चं स्थान पुण्याच्या खाद्य संस्कृतीत अविभाज्य आहे़, ते या दर्जामुळेच. एरवी चितळ्यांच्या वक्तशीरपणावर चिमटे काढले जात असले तरी चितळ््यांच्या पदार्थांना कुणी नावं ठेवली तर आपल्यावरच हा आरोप आहे असं मानून पुणेकर विरोध करतील. ही आत्मीयता चितळ्यांनी आपोआप मिळवलेली नाही. खरं तर चितळे हे काही मूळचे पुणेकर नाहीत़ कृष्णेकाठी भिलवडीत बी़ जी़ चितळे यांनी आपली दूध डेअरी १९४०मध्ये सुरू केली़ दुसऱ्या महायुद्धाच्या अतिशय प्रतिकूल काळात त्यांनी शेतकऱ्यांकडून दूध घेऊन ते रेल्वेने मुंबईला पाठविण्यास सुरुवात केली़ व्यवसायाच्या वृद्धीसाठी रघुनाथराव आणि त्यांचे बंधू राजाभाऊ चितळे हे पुण्यात आले़ त्यांनी कुंटे चौकात दुकान सुरू करून दूध, चक्का, लोणी यांची विक्री सुरू केली़ त्याच्या जोडीला पेढे आणि बर्फीचाही घाट घातला़ दुधाचे रतीब टाकत असतानाच १९५४मध्ये त्यांनी डेक्कन जिमखान्यावर दुकान थाटलं़ या व्यवसायाला एक आधुनिक रूप देताना त्यांनी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणण्याचा विचार सुरू केला़ जपानमधील प्रदर्शनात राजाभाऊ चितळे यांनी १९७०मध्ये मिल्क पाऊच पॅकिंग मशीन पाहिले़ तोपर्यंत चरवीने दुधाचा रतीब घालण्याची पद्धत होती़ त्याचा ध्यास घेऊन केंद्राच्या अनेक परवानग्या मिळवून हे फ्रेंच मशीन चितळ्यांच्या दारात आले़ अशा प्रकारचे भारतातील हे पहिले मशीन होते़ अत्याधुनिकीकरणातून त्यांनी उद्योजकतेची एक नवी वाट आखून दिली. पॅकबंद दूध पिशवीमुळे भेसळीला वाव राहिला नाही आणि ‘चितळे दूध’ हा ब्रँड बनला़ या साऱ्या प्रवासात भाऊसाहेबांची दूरदृष्टी फार महत्त्वाची ठरली. भाऊसाहेब हे कुमारवयात सुरतेला होते़ खरं तर बाकरवडी हा गुजराथी पदार्थ; पण भाऊसाहेबांनी तिला मराठी अंगरखा चढवला. भाऊसाहेबांनीच गुजरातेतून आचारी आणून मराठी बाकरवडीचा प्रयोग केला़ इतकंच नव्हे, ते स्वत:ही बाकरवडी करायला शिकले़ सुरुवातीला ५०-१०० किलो बाकरवडी दिवसाकाठी बनायची़ डेक्कन आणि सदाशिव पेठेतल्या चोखंदळ पुणेकरांनी पसंतीची पावती दिल्यावर बघता-बघता खप वाढला़ कारागीर वाढविले, तरी मागणी-पुरवठ्याचा मेळ बसेना़ त्यातून सगळ्यांना मिळावी, या हेतूने बाकरवडीचे रेशनिंग सुरू झाले. पुढे तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांची सांगड घालून मशीनवर बाकरवडी तयार होऊ लागली़ नव्या पिढीने तिचे मार्केटिंग करून बाकरवडी जगभर लोकप्रिय बनवली़ पुण्याहून बाहेरगावी जाताना नातेवाईकांना काय घेऊन जायचे असा प्रश्न आता पडत नाही़ आपसुकपणे बाकरवडी आणि तीही चितळ्यांची हे एक समीकरणच झाले आहे़ या साऱ्या प्रवासात भाऊसाहेब दीपस्तंभाप्रमाणे सातत्याने मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. केवळ व्यवसायातच नाही, तर सामाजिक कार्यातही भाऊसाहेबांचा नेहमीच पुढाकार असे़ त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळी, जोशी हॉस्पिटल, चित्पावन संघ, पुणे हार्ट ब्रिगेड आणि मिठाई व दुग्धव्यवसाय संघ यांचे अध्यक्षपद भूषविले़ चिपळूण येथील विंध्यवासिनी देवस्थान व अंबाजोगाई येथील भक्तनिवास यासारख्या अनेक धार्मिक व सामाजिक कार्यांत त्यांचा सिंहाचा वाटा होता़ अनेक सामाजिक संस्थांना भाऊसाहेब चितळे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले़ आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला होता़ त्यामुळेच ‘चितळे बंधू’ म्हटले, की एका मराठी उद्योजक घराण्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही़ भाऊसाहेबांची निरंतर मेहनत आणि चिकाटी नवउद्योजकांना, विशेषत: मराठी तरुणांना निश्चितच स्फूर्ती आणि प्रेरणा दिल्याशिवाय रहाणार नाही़ - विजय बाविस्कर
पुण्याची शान आणि अभिमान
By admin | Published: March 24, 2016 1:18 AM