शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

पंतप्रधान मोदींनी घेतले पाकिस्तानला थेट शिंगावर!

By admin | Published: August 23, 2016 7:18 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान आणि गिलगिट यांचा जो थेट उल्लेख केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान आणि गिलगिट यांचा जो थेट उल्लेख केला त्याची संभावना माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘साहसवाद’ अशी केली आणि पाठोपाठ माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि कॉँग्रेसचे बोलघेवडे नेते मणिशंकर अय्यर यांनी तर थेट मोदींवर टीकाच केली. परंतु लगेचच कॉँग्रेस पक्षाने स्वत:ला या तिघांच्या वक्तव्यापासून अलग तर केलेच पण त्याही पुढे जाऊन पक्षाच्या प्रवक्त्याने तर असहीे सांगितले की, बलुचिस्तान असो वा पाकव्याप्त काश्मीर तिथे पाकिस्तानची सरकारी यंत्रणा आणि लष्कर अशांतता पसरविण्याचे काम करीत असून तो मुद्दा भारताने उभयपक्षी चर्चेत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील उपस्थित केलाच पाहिजे.कॉँग्रेस पक्षाने दाखविलेल्या या चपळाईलादेखील एक पार्श्वभूमी आहे. भूतकाळात त्या पक्षाच्या काही नेत्यांनी केलेल्या बोलघेवडेपणापायी पक्षाने आपले हात चांगलेच पोळून घेतले आहेत. लोकसभेच्या निवडणूक प्रचारकाळात मणिशंकर अय्यर म्हणाले होते की, ‘मोदी यांना चहाचे दुकान टाकायचे असेल तर त्यांनी ते कॉँग्रेस पक्षाच्या कचेरीबाहेर टाकावे, पण ते कधीही पंतप्रधान होऊ शकत नाही.’ अय्यर यांच्या त्या विधानाने प्रचाराचा सारा नूरच पालटून गेला आणि मोदींनी तो स्वत: अनुकूल बनवून घेतला. त्यामुळेच कदाचित कॉँग्रेसने सबुरीची भूमिका घेतली असावी. ती घेताना आपण प्रत्येकच विषयात मोदींना विरोध करतो असा संदेश जाऊ नये हेही एक कारण त्या सबुरीमागे आहे. कदाचित मोदींनीही कॉँग्रेसची ही बदलती मानसिकता हेरून आपल्या भाषणात पाकचा उल्लेख केला असावा. मोदींनी आपल्या शपथविधीसाठी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण देताना कॉँग्रेसला गाफील ठेवले आणि तसे करताना आपण पाकिस्तानचे मन वळवू शकू असा विश्वास बाळगणाऱ्या आपल्या पूर्वसुरींच्या पंक्तीत स्वत:ला नेऊन बसवले होते. साधारणपणे असे मानले जात होते की, पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती झाल्याने मोदी सरकार पाकिस्तानबाबत अत्यंत कठोर भूमिका घेईल आणि यासंदर्भात वाजपेयी सरकारच्या तुलनेत या सरकारचा पवित्रा वेगळा असेल. परंतु शरीफ यांच्याशी मधुर संबंध प्रस्थापित करून मोदींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये काबूलचा दौरा आटोपून परतताना मोदी वाटेतच लाहोरला थांबले आणि त्यांनी शरीफ यांच्या घरातील मंगलकार्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्यातून मैत्रीच्या माध्यमातून मोदी उभय देशांमधील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र निर्माण झाले. अर्थात तो सारा देखावा होता की त्यामागे मोदींचे मनापासूनचे प्रयत्न होते याबाबत अनेक तर्क-कुतर्क केले जाऊ शकतात. स्वत: मोदी यांनी या संदर्भात असे म्हटले होते की, मी देशाचा पंतप्रधान होण्यापूर्वी मला जगात फारशी ओळख नव्हती. त्यामुळे अल्पावधीत आपल्याला ही ओळख निर्माण करण्याच ेप्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु मोदी यांच्या लाहोरच्या भेटीपाठोपाठच पठाणकोटच्या हवाई तळावर पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला आणि अवघा नूरच पालटून गेला.लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात मोदींनी जी वक्तव्ये केली होती, त्या वक्तव्यांच्या जाळ्यामध्ये तेच जणू गुरफटत चालले होते आणि पाकशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात देशातील त्यांचा पाठिंबा उणावत चालल्याचे त्यांच्या लक्षात येऊ लागले होते. मोदींच्या प्रयत्नांना नवाज शरीफ यांच्याकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळेच कदाचित धाडसाची भाषाच आपल्या पदरात मते टाकू शकते, नवाज शरीफ यांच्याशी घेतलेल्या गळाभेटींनी नव्हे, ही बाब मोदींच्या लक्षात येऊ लागली होती. त्यामुळे पठाणकोटच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर पलटवार करण्याची जणू संधीच ते शोधत होते. ती संधी त्यांना काश्मीर समस्येवर चर्चा करण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत मिळाली. या बैठकीत पीडीपीचे नेते मुझफ्फर बेग यांनी पाकव्याप्त काश्मीरचा आणि खुद्द पाकिस्तानातील काही भागात सुरू असलेल्या अत्ताचारांचा प्रश्न उपस्थित केला. मोदींनी सर्व नेत्यांची वक्तव्ये शांतपणे ऐकून घेतल्यानंतर शेवटी केलेल्या भाषणात ‘खुद्द पाकिस्तानातले काही भाग, बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे पाकिस्तानी यंत्रणा लोकांवर जे अत्याचार करीत आहे त्याबद्दल आतो जगाला उत्तर देण्याची वेळ पाकिस्तानवर आलेली आहे’ असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. स्वातंत्र्यदिनी मोदी काय बोलणार आहेत याचे एकप्रकारे दिग्दर्शनच या विधानाद्वारे केले गेले.मोदींच्या पाकसंबंधी वक्तव्यामुळे राजकीय नूर असा पालटला की, त्यांच्याच पक्षातील त्यांचे कठोर टीकाकार असलेल्या यशवंत सिन्हा यांना मोदींची प्रशंसा केल्यावाचून राहावले नाही. अर्थात भाजपा आणि संघ परिवारामध्ये मोदींची प्रशंसा करणारे यशवंत सिन्हा एकटेच नव्हेत. गोरक्षकांच्या संदर्भात पंतप्रधानांनी जी कठोर भूमिका घेतली त्यामुळे अस्वस्थ झालेल्या संघ परिवारालाही चर्चा पाककडे वळली गेल्याने हायसे वाटले आहे. भाजपाच्या मते गेल्या सत्तर वर्षात भारताने अनेक वेळा नमते घेण्याची भूमिका स्वीकारली पण पाकने कधीही अनुकूल प्रतिसाद दिला नाही. उलट दहशतवादाचा आणि अतिरेकाचा पाकिस्तानने इतका अतिरेक केला की, खुद्द काश्मीरातील गिलानी यांच्यासारख्या फुटीरतावादी नेत्याच्या हातूनही ‘काश्मीरियत’ निसटून गेली. आता तर काश्मीरात भारतीय लष्कर आणि आयएसआय यांच्यात थेट संघर्ष सुरू आहे. १९७१ साली भारताने पाकिस्तानाचा निर्णायक पराभव केल्यानंतर तब्बल वीस वर्षे पाक निमूट होता. पण मुफ्ती मुहम्मद सईद यांच्या कन्येचे अतिरेक्यांनी अपहरण केले तेव्हापासून (१९९०) घातपात आणि अतिरेकी कारवायांना प्रारंभ झाला.पाकिस्तान संदर्भात मोदींनी आता जाहीर केलेली भूमिका अचानक पुढे आलेली नाही. चीन आणि पाकिस्तान यांच्याते गेल्या काही दिवसांपासून जी जवळीक निर्माण होत आहे तिचा या भूमिकेला पदर आहे. वास्तविक पाहाता देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या दोन्ही देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रामाणिक प्रयत्न मोदी यांनी केले. पण दोन्ही देशांनी मोदींना एकप्रकारे तोंडघशीच पाडले. भारताच्या एनएसजीमधील प्रवेशास चीनने जी आडकाठी केली तिच्यामुळे भारतास मोठा धक्का बसला. पाठोपाठ आजवर भारत-पाक संबंधांमध्ये बाळगलेली त्रयस्थाची भूमिका सोडून देऊन चीनने बलुचिस्तानात एक बंदर विकसीत करण्याचे आणि उभय देशांदरम्यान दळणवळण सुकर करण्याचे काम सुरू केले. दळणवळणाचा हा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधूनही जातो हे विशेष. सामान्यत: राजकीय नेते, मुत्सद्दी आणि देशाच्या संरक्षणाशी संबंधित लोक आपल्या मनातील रास्त भावना जाहीरपणे प्रगट करीत नाहीत. पण मोदी हे तसेही वेगळेच आहेत. आपण एक जोखीम पत्करीत आहोत याचीही त्यांना पूर्ण जाणीव आहे पण एखाद्या संकटाचा मुकाबला करायचा तर त्या संकटाला थेट अंगावरच घ्यावे लागते या भूमिकेवर त्यांचा विश्वास आहे.-हरिष गुप्ता(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )