शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबतच्या संबंधांबाबत खरोखरच संभ्रमावस्थेत आहेत, की ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करीत आहेत, हे कळायला काही मार्ग नाही. भाजपसोबत नेमके कसे संबंध राखायचे, या मुद्यावर ते संभ्रमित असतील, तर शिवसेनेविषयी सहानुभूती बाळगून असलेल्या मंडळींनी त्या पक्षाच्या भवितव्याबद्दल चिंता केलेली बरी; परंतु काही राजकीय समीकरणे मांडून ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करीत असतील, तर मात्र त्यांना राजनीती निपुण नेत्याचा दर्जा द्यायला हरकत नाही. राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून, उद्धव ठाकरे एकीकडे सातत्याने भाजपवर टीकेचे विखारी बाण डागत आहेत आणि दुसरीकडे त्याच पक्षाशी सत्तासोबतही करीत आहेत. पतीपत्नीने दिवसभर कचाकचा भांडायचे आणि रात्री शय्यासोबत करायची, असाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा शिवसेना व भाजपमधील संबंधांचे हे स्वरुप समोर आले आहे. कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे निर्णयाचे जे काही बरेवाईट परिणाम समोर येतील त्याची जबाबदारी शिवसेनेवरही येते; पण कर्जमाफीच्या यशाचे शत-प्रतिशत श्रेय घेतानाच, त्याच निर्णयावरून सरकारवर टीकेचे आसूड ओढणे उद्धव ठाकरे यांनी सुरू केले आहे. कृषी कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आल्यापासून, महाराष्ट्रात तत्त्वत:, सरसकट आणि निकष हे तीन शब्द सातत्याने विनोद निर्मितीसाठी वापरल्या जात आहेत. समाजमाध्यमांमध्ये तर या तीन शब्दांवर बेतलेल्या विनोदांचा अक्षरश: पूर आला आहे. शिवसेना व भाजपमधील सध्याच्या संबंधांचे वर्णन हे शब्द वापरून करायचे झाल्यास, ‘तत्त्वत: सोबत, सरसकट विरोधात!’ असे करता येईल. वास्तविक संधिसाधूपणा हाच राजधर्म बनलेल्या सध्याच्या युगात दोन राजकीय पक्षांनी तब्बल २५ वर्षे युती टिकविणे, हे खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. सर्वसामान्यांसाठी फार काही करून दाखविता आले नसले तरी, २५ वर्षे युतीचा धर्म निभविण्याचे अशक्यप्राय काम शिवसेना व भाजपने करून दाखविले, याचे श्रेय उभय पक्षांना द्यायलाच हवे! दुर्दैवाने मोठा भाऊ कोण, या वादात युतीच्या पारदर्शकतेची काच टिचकली आणि सत्तेच्या चिकट गोंदानेही ती सांधणे शक्य होत नसल्याचे नित्य समोर येत आहे. देशातील राजकीय अवकाश शत-प्रतिशत व्यापून टाकण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना जो मानमरातब मिळाला तोच मलाही मिळायला हवा ही उद्धव ठाकरेंची अपेक्षा, या दोहोतील संघर्षाचा परिपाक म्हणजे शिवसेना व भाजप यांच्या संबंधांमधील कटुता! गत फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी मुखपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये त्यांची ही अपेक्षा स्पष्ट शब्दांमध्ये मांडली होती. मी बाळासाहेबांचा वारसदार असल्याने महाराष्ट्रात मीच सर्वेसर्वा आहे आणि भाजपलाही ते मान्य करावेच लागेल, असे ते तेव्हा गरजले होते. दुर्दैवाने श्रेष्ठत्वाच्या या लढाईत दोन्ही पक्षांना सर्वसामान्यांप्रतिच्या अपेक्षित बांधिलकीचा विसर पडला आहे. राज्यात सत्तांतर होऊन तीन वर्षे उलटल्यानंतर, शेतकऱ्यांसह समाजाच्या इतरही अनेक घटकांमध्ये कमालीची अस्वस्थता व्याप्त आहे. शेतकरी कर्जमाफीमुळे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी लांबणीवर पडल्यास, उद्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्येही असंतोष उफाळणार आहे. विरोधी पक्षांसाठी खरे तर ही पर्वणीच म्हणायला हवी; पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रमुख विरोधी पक्ष मरगळलेल्या अवस्थेतून बाहेर पडायला तयार दिसत नाहीत. त्यामुळेच सत्ताधारीही आम्हीच अन् विरोधकही आम्हीच, अशी भूमिका घ्यायला शिवसेनेचे फावत आहे. किमान लोकसभा व विधानसभेची निवडणूक पार पडेपर्यंत तरी शिवसेनेकडून भाजपवर वाग्बाण डागणे बंद होण्याची शक्यता नाही. भाजपला दोन्ही निवडणुकांमध्ये कमीअधिक फरकाने २०१४ मधील यशाची पुनरावृत्ती करता आल्यास, शिवसेनेला एक तर निमूटपणे भाजपचे मांडलिकत्व स्वीकारावे लागेल किंवा उघडपणे विरोधकाची भूमिका घ्यावी लागेल. त्याच्या उलट घडल्यास, म्हणजे शिवसेना सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरल्यास, भाजपला किमान महाराष्ट्रापुरते तरी शत-प्रतिशतचे स्वप्न बासनात बांधून ठेवून, शिवसेना मोठा भाऊ असल्याचे चुपचाप मान्य करावे लागेल. या दोन शक्यतांपैकी काहीही न घडता, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उसळी घेतली, तर मात्र शिवसेना व भाजपला मोठा भाऊ-छोटा भाऊचा वाद गुंडाळून ठेवण्याचा वा कायमस्वरुपी काडीमोड घेण्याचा पर्याय निवडावा लागेल. थोडक्यात, शिवसेना व भाजपमधील रिकाम्या भांड्यांचा खणखणाट महाराष्ट्रातील जनतेला किमान दोन वर्षे तरी सहन करावाच लागणार आहे. दोन वर्षांनंतर ते एक तर गुण्यागोविंद्याने नांदतील किंवा रीतसर काडीमोड घेतील. तोपर्यंत मात्र ते तत्त्वत: सोबत, पण सरसकट विरोधात असतील. त्यासाठीचे त्यांचे निकष तपासण्याच्या भानगडीत कुणी पडू नये, हेच बरे!
तत्त्वत: सोबत, सरसकट विरोधात!
By admin | Published: June 27, 2017 12:44 AM