प्रियंकाच्या आगमनामुळे राहुल गांधींची प्रतिमा झाकोळेल या अपप्रचाराला राहुल गांधींनी याआधी मिळविलेल्या मोठ्या विजयांनी कधीचेच उत्तर मिळाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. मोदी आणि शहा, भाजपा आणि संघ या साऱ्यांनी चालविलेल्या कमालीच्या हीन प्रचाराला तोंड देत, राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांत नेत्रदीपक विजय, कर्नाटकात आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीची जाण आणि पुढे राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन हिंदी भाषिक राज्यांत मिळविलेला एकहाती विजय या सा-यांनी राहुल गांधींची प्रतिमा देश व जग यांच्या पातळीवर उंचावली असतानाच त्यांच्या सोबतीला आता त्यांच्या भगिनी व काँग्रेसच्या नव्या सरचिटणीस प्रियंका गांधी आल्या आहेत. राहुल गांधींची जेवढी बदनामी करता आली तेवढीच किंबहुना त्याहून अधिक बदनामी संघ परिवाराने प्रियंकाचीही, त्यांच्या पतीवरून केली. तरीही त्यांचे राजकारणातील आगमन उत्तर प्रदेशाएवढेच सा-या देशात एक आनंद व उत्साहाची लाट उभे करणारे ठरले आहे. प्रियंकाच्या आगमनामुळे राहुल गांधींची प्रतिमा झाकोळेल या अपप्रचाराला राहुल गांधींनी याआधी मिळविलेल्या मोठ्या विजयांनी कधीचेच उत्तर मिळाले आहे. सोनिया गांधींनी प्रियंकांना आजवर राजकारणापासून कौटुंबिक कारणासाठी दूर ठेवले यावरच अनेकांची नाराजी होती. सामान्य माणूस प्रियंकाच्या रूपात इंदिरा गांधींची धडाडी आणि एकूणच प्रतिमा पाहत होता. प्रियंकाने राजकारणात यावे, अशी काँग्रेससकट अनेकांची मागणी होती. राहुल गांधींचे नेतृत्व जोवर स्वबळावर प्रस्थापित होत नाही तोवर त्यांना रोखण्याचा संयम सोनिया गांधींनी बाळगला होता. ते प्रस्थापित झाले असल्याने प्रियंकाच्या राजकारण प्रवेशाला कोणताही अडसर आता उरला नाही. त्या अतिशय देखण्या व आकर्षक आहेत. त्यांच्या वक्तव्यात गांभीर्य व जाण आहे. त्यांच्या मागे राजीव गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोतीलाल नेहरूंसह, गांधीजी व स्वातंत्र्य लढ्याचा सारा वारसा उभा आहे. त्या इतिहासाने व गेल्या काही वर्षांतील त्यांच्या संयत व गंभीर वृत्तीने त्यांना राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीच राष्ट्रीय प्रतिमा लाभली आहे. त्यांचे आगमन आज उत्तर प्रदेशापुरते सीमित असले तरी तसे ते फार काळ राहणार नाही. त्यांना साºया देशातच मोठी लोकप्रियता आहे आणि देशातील अनेक राज्ये त्यांचे स्वागत करायला उत्सुक आहेत. त्यांच्या साध्या आगमनानेही देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. आता मोदींचे सरकार व त्यांचे सूडवादी सहकारी प्रियंकाच्या कुटुंबाविरुद्ध गरळ ओकण्याचे घाणेरडे राजकारण करतील. राहुल गांधी राजकारणात अपयशी ठरल्याने आता प्रियंका यांना राजकारणात उतरवण्यात येत असल्याचे भाजपा नेते सांगत आहेत. ते त्यांच्या पतीच्या मागे मोठा ससेमिराही लावतील. पण हे सारे सुडाचे राजकारण असेल व जनताही ते समजून असेल. राजकारणात पराभव दिसू लागला की सगळे सत्ताधारी तसे वागतात. इंदिरा गांधींच्या मागे शहा कमिशन लावून त्यांचा सूड घेण्याचा जनता पक्षाचा प्रयत्न त्याच्यावरच नंतर उलटला होता. प्रियंकावर कोणताही आरोप नाही. त्यांची प्रतिमा केवळ स्वच्छच नाही तर साºयांना आवडावी अशी आहे. त्यांच्या सरचिटणीसपदाच्या वृत्तानेच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. त्यांच्यामुळे पक्ष वा संघटना नुसती बलवानच होणार नाही तर ती विजयाच्या जवळ जाईल. प्रेरणा देणारे नेतृत्व मिळाले की कार्यकर्तेही अधिक जोमाने काम करतात. राहुल आणि प्रियंका हे अतिशय संयमाने सारे आरोप झेलत प्रत्यक्ष कृतीतून त्यांच्या टीकाकारांना उत्तर देत आहेत. आपला देश तसाही प्रतिमा पूजकांचा आहे. त्यातून त्याला अशी देखणी व स्वच्छ प्रतिमा सापडत असेल तर त्याला ती भावणारीही असेल. आजवरच्या देशाच्या राजकारणात जेव्हा जेव्हा स्वच्छ प्रतिमेचे नेते उतरले तेव्हा तेव्हा जनतेने त्यांना पाठिंबा देण्यात कधीही आपला हात आखडता घेतलेला नाही. प्रियंका आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर देशातील वातावरण ढवळून काढू शकतील. तसा विश्वास सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांना आहे. म्हणूनच सारे काँग्रेस नेतेही निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. तात्पर्य, राहुल गांधींनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. त्याआधी सोनिया गांधींनी त्यांचे प्रगल्भ नेतृत्व देशाच्या लक्षात आणून दिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचे, तरुण, उत्साही, हसरे व एका मोठ्या ऐतिहासिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तित्त्व काँग्रेस व देश यांना प्रेमात पाडणारे असेल व स्त्रियांच्या सबलीकरणाचा तो आणखी एक तरुण व प्रभावी चेहरा असेल.
प्रियंकाच्या आगमनामुळे राहुल गांधींची प्रतिमा झाकोळेल ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 4:11 AM