रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळलेल्या घटनेला २ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडीतील तब्बल ३९ प्रवाशांवर काळाने झडप घातली होती. महाराष्ट्रासह देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सर्वच ब्रिटिशकालीन पुलाचे आॅडिट करण्यास सरकारला भाग पडले होते. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत १८० दिवसात नवीन पूल बांधण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे आव्हान केवळ १६५ दिवसात लीलया पेलले. ५ जूनला या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर, कोणतेही काम कठीण नसते याचा जिवंत पुरावा केंद्र सरकारने दिला आहे. सावित्री पूल दुर्घटनेतील २ आॅगस्ट २०१६ हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदविला जाईल. परंतु १८० या मर्यादित दिवसांच्या आधी तो पूल नव्याने बांधून वाहतुकीसाठी खुला करणे हाही दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पूल हा फक्त दोन गावांना जोडत नाही तर, दोन्ही तीरांच्या परिसरांचा शाश्वत विकासाचा तो प्रेरक असतो. त्यामुळे पुलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोकणाचे महत्त्व दिवसागणिक वाढत आहे. मुंबई-गोवा हा महामार्ग देशाची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिणेतील राज्यांना जोडण्याचे काम करतो. या मार्गावरून १९ हजार वाहनांची वाहतूक होते. म्हणूनच एका भरभक्कम आणि वैशिष्ट्यपूर्ण पुलाची निर्मिती आवश्यक होती. गडकरींचे आश्वासक पाऊल आणि सरकारच्या धडक कार्यक्र मामुळे पुलाच्या सर्वच तांत्रिक बाबींना गती मिळाली आणि पुलाची उभारणी द्रुतगतीने झाली. सरकारने ठरवले तर, काहीही करू शकते हे यातून दिसून आले. परंतु देशात आणि राज्यामध्ये मोठ्या संख्येने पूल आहेत, ते केवळ कागदावर, आजही गडकरींच्या धाडसी निर्णयाच्या तेही प्रतीक्षेत आहेत. त्यांचीही तातडीने उभारणी गरजेची आहे. मुंबई-गोवा या चार पदरी महामार्गाच्या कामाला बरीच वर्षे लागली आहेत. त्याकडेही सरकारने लक्ष दिल्यास अपघात रोखता येतील वेळेचीही बचत होणार आहे. गडकरी यांनी याकडेही लक्ष देऊन याचेही काम युद्धपातळीवर करावे, अशी तमाम कोकणवासीयांची इच्छा आहे.
प्रबळ इच्छाशक्तीचा पुरावा
By admin | Published: June 06, 2017 4:26 AM